Tuesday, March 18, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखCongress : काँग्रेसची नौटंकी की, आंबेडकरांवरील बेगडी प्रेम

Congress : काँग्रेसची नौटंकी की, आंबेडकरांवरील बेगडी प्रेम

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हयात असताना, जेवढा त्रास काँग्रेसने दिला, तेवढा त्रास त्यांना कोणीही दिला नव्हता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा राजकारणात पराभव करण्यासाठी, त्यांना सभागृहात येण्यापासून रोखण्याचे काम काँग्रेसने केले. देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अशी अनेक उदाहरणे देता येतील, त्यात डॉ. आंबेडकरांचा पदोपदी अपमान सहन करावा लागला होता. त्याच काँग्रेसकडून आता डॉ.आंबेडकरांचा उदो उदो सुरू आहे. यामागे डॉ. आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग आपल्या पाठिशी यावा ही काँग्रेसची सुप्त भूमिका आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान धोक्यात आल्याचा अपप्रचार करून, सत्ताधारी भाजपाला बदनाम करण्याची कोणतीही संधी काँग्रेसने सोडली नाही. आता, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याची तोडमोड करून, दलितांच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. शहा यांच्या भाषणाचा काही भाग दाखवून राजकीय मुद्दा तयार केला आहे. मात्र देशातील जनतेला काँग्रेसचा हा हेतू चांगलाच माहिती आहे. काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना पद्मश्री किंवा पद्मविभूषण दिला नाही.

काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पराभूत करणारे काजरोळकर यांना १९७० मध्ये पद्मभूषण देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला होता. जवाहरलाल नेहरूसुद्धा आंबेडकरांच्या विरोधात प्रचार करायला गेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेचे सदस्य होऊ दिले नाही. त्यांना कायदामंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. काँग्रेसने त्यांना भारतरत्नही दिला नाही. काँग्रेसने डॉ.आंबेडकरांचे एकही स्मारक उभारू दिले नाही, हे आंबेडकरी जनतेला ठाऊक आहे. डॉ. आंबेडकरांच्या राजीनाम्याच्या प्रतीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंवर आरोप केले होते. त्यांचा संसदीय समितीत समावेश नव्हता. त्यांना कायदा मंत्रालयात कामही करू दिले नाही. अनुसुचित जाती-अनुसुचित जमातीला योग्य संरक्षण दिले जात नसल्याने डॉ. आंबेडकर नाराज होते. फक्त मुस्लिमांनाच सर्व सुविधा देण्यात आल्या, असे आरोप या पत्रातून करण्यात आले होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणात काँग्रेसने कशा प्रकारे डॉ. आंबेडकर यांना सावत्रपणाची वागणूक देण्याचा प्रयत्न केला हे सांगण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्यांनी एक क्लीपचा व्हीडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून आंबेडकरी जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांविषयी द्वेषाची भावना निर्माण व्हावी असा प्रयत्न काँग्रेससहीत विरोधक काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत. आता त्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजीनामा हवा आहे. त्यासाठी देशभर आंदोलन पेटविण्याची रणनिती आखली जात आहे. दुसऱ्या बाजूला लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दलित समाजाची सहानुभूती मिळविण्यासाठी परभणी दौरा आयोजित केला, असा आरोप केला जात आहे. महाराष्ट्रात बीड आणि परभणीतील घटनांमुळे वातावरण तापले आहे. १० डिसेंबर रोजी परभणीत आंबेडकरांच्या स्मारकाची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर दगडफेक झाली. यामध्ये पोलीस कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी याच्या मृत्यू प्रकरणानंतर १२ दिवसांनी राहुल गांधी परभणीत पोहोचले. राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. विरोधी पक्ष नेते पदावरील व्यक्तीला देशातील कोणत्याही ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे; परंतु महाराष्ट्रातील दौऱ्यात राहुल गांधी यांनी परभणीतील मृत्यू प्रकरणातील कुटुंबीयांना भेट दिली. सोमनाथची हत्या झाली, कारण तो दलित होता आणि संविधानाचे रक्षण करत होता, असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला होता. मात्र बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करावे असे राहुल गांधी यांना वाटले नाही. राहुल गांधी यांच्या दौऱ्यानंतर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली. त्यामुळे काँग्रेसने डॅमेज कंट्रोल साधण्यासाठी त्याच दिवशी खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बीडमध्ये जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. मात्र राहुल गांधी यांच्या दौऱ्यातून विशिष्ट समाजाला आपलेसे करण्याचा हेतू होता हे लपून राहिलेले नाही.

पोलिसांकडून छळ नाही, सोमनाथला श्वास घ्यायला त्रास होत होता, त्यात त्याचा कोठडीत मृत्यू झाला, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले होते. सोमनाथला श्वासोच्छवासाचा त्रास आणि इतर आजार होते. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, त्याने कोणत्याही प्रकारच्या पोलीस अत्याचाराची तक्रार केलेली नव्हती. राहुल गांधी केवळ राजकीय कारणासाठी येथे आले होते. लोकांमध्ये द्वेष निर्माण करणे हे त्यांचे काम आहे. सोमनाथच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले तरीही विरोधकांकडून सुर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्रात वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न काही संघटना आणि राजकीय पक्षांकडून केला जात आहे. जसे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाचे भांडवल करून काँग्रेसकडून देशभर बेगडी प्रेम दर्शविण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांचा परभणी दौरा म्हणजे नौटंकी होती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केंद्रात आणि राज्यात बहुमताचे सरकार असल्याने, विरोधी पक्षाला आता तसे विषय कामाचे राहीले नाही. त्यामुळे घडलेली घटना दुर्दैवी असली तरी त्यावर राजकारण करायचे एवढंच काम आता बाकी राहिले आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. अशा नौटंकी प्रकारला ते थारा देणार नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -