Saturday, October 25, 2025
Happy Diwali

Weather Forecast : उत्तर भारतात गारा पडणार, देशात थंडीचा जोर वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

Weather Forecast : उत्तर भारतात गारा पडणार, देशात थंडीचा जोर वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली : हवामान विभागाच्या अंदाजानुसार शुक्रवारी उत्तर भारतात गारा पडण्याची आणि देशात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या तीन राज्यांतील निवडक भागांमध्ये गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडील भागात शुक्रवारी गारा पडण्याची शक्यता जास्त असल्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागरावरून येत असलेल्या वाऱ्यामुळे मध्य भारतात आणि दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात शुक्रवारपर्यंत पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे थंडीचा जोर वाढेल, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात वेगवेगळ्या भागात अधूनमधून पाऊस पडत आहे. या पावसामुळे वातावरणातील गारवा वाढला आहे. आता हवामान विभागाने दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात शुक्रवारपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

पुढील दोन - चार दिवस पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश ही राज्य धुक्याच्या चादरीमुळे झाकोळली जातील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दाट धुके असल्यास नागरिकांनी महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. बाहेर पडल्यास शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय निवडून प्रवास करावा; असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दाट धुके आणि थंडीची लाट यामुळे राजधानी दिल्लीत पारा घसरला. सकाळच्या वेळेत दृश्यमानतेचे प्रमाणही कमी झाले होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास दिल्लीत दृश्यमानता शंभर मीटरपेक्षा कमी होती. कर्तव्य पथ, जनपथ, द्वारका, इंडिया गेट या भागांमध्ये सकाळी तापमान दहा अंश से. पेक्षा कमी होते.

Comments
Add Comment