मुंबई: राज्यातील कडाक्याचा थंडीचा जोर कमी होत चालला असून वर्षाच्या शेवटी राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याच्या शक्यता आहे. पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा २ ते ४ अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मराठवाडा ते मध्य महाराष्ट्रात २६ ते २८ डिसेंबरदरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच वर्षाच्या अखेरीस वादळी वाऱ्यासह गारपीटही होणार असल्याचीही शक्यता आहे.
Maharashtra : राज्यातील ३६ पैकी १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांसाठी चुरस
या ठिकाणी कोसळणार पावसाच्या सरी
मध्य तसेच पश्चिम भारतात पुढील २४ तासांत तापमान वाढण्यास सुरूवात होणार आहे. त्यानुसार २६ आणि २७ डिसेंबरला पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याची तीव्रता मध्य तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात असणार आहे.
२६ डिसेंबरला हवामान विभागाने धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे तर २७ डिसेंबरला नाशिक, पुणे, जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, अमरावती, नंदुरबार, बुलढाणा, वाशिम, अकोला या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे.