
पोलिसांची असेल करडी नजर; टवाळखोर, हुल्लडबाजांवर होणार कारवाई!
मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईला 'थर्टी फर्स्ट'चे (Thirty First Party) वेध लागले आहेत. ३१ डिसेंबरला हॉटेल व रेसॉर्टमध्ये पार्ट्या होतात. या विनापरवाना पार्ट्या व जल्लोषावर पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासनाची (एफडीए) करडी नजर असणार आहे. उद्या नाताळ पासून सर्वत्र सेलिब्रेशनला सुरूवात होणार असून त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंगळवारपासूनच जय्यत तयारी सुरु केली आहे. त्यासाठी शहरातील सर्व महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून यासाठीचा फौजफाटा सज्ज करण्यात आला आहे.
सध्या सोशल मीडियावर ‘थर्टी फर्स्ट’ आणि नववर्ष स्वागताच्या तयारीबाबत चर्चा सुरू झाली आहे. तरुणाईकडून हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये पार्ट्यांचे नियोजन केले जात आहे. यावर्षी मार्गशीर्ष सोमवारी संपणार असून मंगळवारी ‘थर्टी फर्स्ट’ आल्याने मांसाहारी खवय्यांमध्ये देखिल मोठा उत्साह संचारला आहे.
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण परिसरातील हॉटेल्स सजले आहेत. मोठ्या हॉटेलपासून साध्या हॉटेल्सनाही आकर्षक रोषणाई केली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही हॉटेल चालकांनी डीजे, लाइव्ह गाण्यांचे शो आयोजित केले आहेत. तरुण-तरुणींना विशेष सवलत दिली जात आहे. ग्रामीण भागात ढाब्यांवर, जंगलात, शेतात रात्रीपर्यंत पार्ट्या केल्या जातात. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यानुसार गुरुवारी पहाटेपर्यंत हा बंदोबस्त राहणार आहे. त्यामुळे ‘थर्टी फर्स्ट’चा प्लॅन करत असाल तर जपून करा, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
३१ डिसेंबरला नववर्षाच्या स्वागतासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी केली जाईल. त्यानुसार वाहतूक शाखेची पथकेही तैनात करण्यात येतील. मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. रात्री आठपासून पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून तपासणी करण्यात येईल. मद्यपी चालक, टवाळखोर व हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. यासह आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व आस्थापना, व्यवस्थापन, मॉल्स, दुकाने, उपहारगृहांमध्ये वेळेची मर्यादा पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे. पोलिस ठाणेनिहाय नाकाबंदी राहणार असून, वाहतूक शाखेचे पोलिसही तैनात असतील. मद्यपी चालकांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. वाहनांचे हॉर्न, सायलेन्सर तपासणी केली जाईल.

मुंबई : आंतरजातीय विवाह करणाऱ्या प्रत्येक जोडप्यास शासनाकडून ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. जिल्ह्यात सन २०२२-२३ या वर्षातील प्राप्त झालेल्या ...
तसेच या पार्ट्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे. फूड सेफ्टी ऑफिसरकडून हॉटेल्सची तपासणी केली जाणार असून अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. कमी दर्जाचे, बनावट आणि असुरक्षित अन्नपदार्थ आढळल्यास त्या हॉटेल चालकांवर कारवाई केली जाणार आहे.
अनेक जण नववर्षाच्या जय्यत तयारीलाही लागले आहेत. अनेकांनी हॉटेल, ढाबे बुकिंगही केले आहेत, तर अनेकांनी मोकळ्या मैदानात, सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक लावून नविन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी, मोकळ्या जागेत पार्टी करण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असून, विनापरवानगी पार्ट्या केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
हॉटेलमध्ये कॉलेजचे विद्यार्थी, आयटीमध्ये काम करणाऱ्या तरुण-तरुणी फोन करून विविध ऑफर्सची माहिती घेत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्सने मेन्यूवर सवलती व विशेष पॅकेजची व्यवस्था केली आहे.
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, टेंन्ट मालकांनी जादा कर्मचारी नेमावे, क्षमतेपेक्षा जादा नागरिकांना प्रवेश देऊ नये. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने तेथे येणाऱ्या प्रत्येकाचे आधार कार्ड क्रमांक, गाडी क्रमांक यांची नोंद ठेवण्याचे काम करण्याची गरज आहे. नववर्षाचा जल्लोष करा, परंतु कायद्यात राहून सर्व कामे शांततेत करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कुठेही अनुचित प्रकार घडणार नाहीत, यासाठी सर्वांनी खबरदारी घेण्याची आवाहन पोलिसांनी केले असून नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई होईल असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.