ठाणे : मी दाऊदचा भाऊ, माझं कोण काय वाकडं करणार असं म्हणणा-या अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला (Iqbal Kaskar) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जोरदार दणका दिला आहे. इकबाल कासकरचा ईडीने जप्त केलेला ठाण्यातील फ्लॅट आता ईडीने ताब्यात घेतला आहे. ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे २०१७ साली इकबाल कासकर विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ही प्रॉपर्टी खंडणीच्या माध्यमातून बळकावण्यात आली होती. दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर आणि त्यांच्या इतर साथीदारांवर मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने कारवाई केली होती.
या कारवाईत ठाण्यातील घोडबंदर रोडवर असलेल्या कासकरच्या फ्लॅटवर ईडीने जप्ती आणली होती. तो फ्लॅट आता ईडीने ताब्यात घेतला आहे. याबाबतची नोटीस देखील इडीने फ्लॅटच्या दारावर लावली आहे. घोडबंदर येथील कावेसर मधील नियोपोलीस टॉवरमध्ये कासकरने हा फ्लॅट घेतला होता. याची किंमत ७५ लाख इतकी आहे. २०१७ साली इकबाल कासकरने हा फ्लॅट बिल्डर सुरेश मेहता आणि त्याची फर्म दर्शन इंटरप्रायजेसला धमकावून घेतला होता.
Narayan Rane On Nanar Refinery : नाणार प्रकल्प होणार? नारायण राणेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
याबाबत ठाणे गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी शाखेत गुन्हा दाखल होता. खंडणी, धमकावणे, मनी लॉन्ड्रिंग आणि विविध गुन्ह्यांमध्ये इकबाल कासकर सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ईडीने कासकरचा जो फ्लॅट सील केलाय, त्यात कासकरच्या परिवाराने १५ दिवसांपूर्वी सील तोडून घरात प्रवेश केला होता, अशी माहिती इमारतीच्या सदस्यांनी दिली.
इकबाल कासकर आणि त्याचे सहकारी मुमताझ शेख आणि इसरार सईद यांनी अनेक व्यापा-यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे जमा केले होते. तसेच त्यांची संपत्ती बळकावली होती. मुमताज शेखच्या नावावर प्रॉपर्टी करण्यासाठी बिल्डरवर दबाव टाकण्यात आला होता. खंडणीप्रकरणी तपास यंत्रणेने PMLA अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे.