Thursday, March 27, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनChhagan Bhujbal : भुजबळांचे तिसरे बंड...

Chhagan Bhujbal : भुजबळांचे तिसरे बंड…

स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर

डिसेंबर १९९१. नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू होते, तेव्हा काँग्रेसचे सरकार होते. अविभाजित शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निवड केली, हेच नेमके छगन भुजबळांचे (Chhagan Bhujbal) दुखणे होते. त्यांची मानसिकता व अस्वस्थता शरद पवार यांनी नेमकी हेरली व त्यांना शिवसेनेतून बाहेर येण्याचा मार्ग दाखवला. शिवसेनेत आक्रमक काम करूनही आपल्या मनासारखे होत नाही आणि दुसरीकडे शरद पवारांसारखा दिग्गज नेता आपल्या पाठीशी उभा आहे ही भावना भुजबळांमध्ये तीव्र बळावली व त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विरोधातच बंडाचा झेंडा फडकवला. तेव्हा शिवसेनेचा मुंबईत जबरदस्त दबदबा होता. शिवसेनाप्रमुखांना आव्हान देणे सोपे नव्हते. शिवसैनिकांचा रोष काय असतो हे भुजबळांना चांगले ठाऊक होते. पक्षाच्या अठरा आमदारांना आपल्या बंडात बरोबर घेण्याची त्यांची तयारी झाली. (नंतर प्रत्यक्षात बारा आमदार आले) सभागृहातून भुजबळ हे त्यांच्या साथीदार आमदारांसह अचानक बेपत्ता झाले. ते सर्व कुठे गेले याची शोधाशोध सुरू झाली. त्यांच्या बंडाने शिवसेनाप्रमुखही जाम भडकले होते. त्या सर्व बंडखोर आमदारांची नागपूर जवळ असलेल्या पाटबंधारे विभागाच्या अतिथिगृहात व्यवस्था केली होती. तिथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तिथे कुणीही पोहोचू शकणार नाही अशी दक्षता घेण्यात आली होती. तिथे भुजबळांसह सर्व अस्वस्थ होते. शिवसेनेत बंड करून आणि शिवसेनाप्रमुखांना आव्हान देऊन मुंबईत राहणे हे सोपे नाही, हे सर्वांनाच ठाऊक होते. एकदा तरी बाळासाहेबांनी मला छगन म्हणून हाक मारावी असे स्वत: भुजबळ काकुळतीला येऊन सांगत होते, पण शिवसेनाप्रमुखांनी त्यांचा फोनही घेतला नाही आणि त्यांच्याशी शब्दही बोलले नाहीत. मग मात्र काँग्रेस पक्ष आणि शदर पवारांचे छत्र याशिवाय त्यांच्यापुढे कोणताच पर्याय उरला नाही. पुढे शिवसेनाप्रमुखांनी त्यांना लखोबा म्हणून कायमचे संबोधले पण काँग्रेसने मंत्रीपदाच्या मखरात बसवल्यावर भुजबळही शिवसेनाप्रमुखांना टी. बाळू असे उपहासात्मक बोलू लागले. ज्यांनी त्यांना दोन वेळा महापौर, आमदार केले त्यांच्याशीच भुजबळांनी पंगा घेतला. शिवसेनाप्रमुखांना बऱ्याच वर्षांपूर्वीच्या भाषणाबद्दल अटक करण्याचाही आराखडा रचला. ज्यांनी त्यांना मोठे केले, त्यांनाच जेलमध्ये पाठवायला भुजबळ आतुर झाले होते. पण न्यायालयानेच केस पहिल्या फटक्यात फेटाळून लावली.

आज तेहतीस वर्षांनंतर हेच भुजबळ, जहाँ नही चैना, वहाँ नही रहेना… असा सूर आळवत आहेत. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात आणि आज अजितदादा पवारांच्या विरोधात ते तोफा डागत आहेत. तेव्हा विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद मिळाले नाही म्हणून आणि आता महायुतीच्या नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले नाही म्हणून ते आक्रोश करीत आहेत. तीन दशकांपूर्वी त्यांनी बंड केले तेव्हा शरद पवारांची ताकद त्यांच्या पाठीशी होती. जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वालाच त्यांनी आव्हान दिले तेव्हा अजितदादांचे वलय आणि भाजपाचे संरक्षक कवच त्यांच्याबरोबर होते. आता भुजबळांनी अजितदादांच्याच विरोधात बंडाचा झेंडा फडकवला आहे, पण त्यांच्या पाठीशी नेमके कोण आहे, हे गूढ आहे. आपल्याला मंत्री करावे म्हणून स्वत: देवेंद्र फडणवीस आग्रही होते असे ते वारंवार सांगत आहेत. तसेच हम एक है तो सेफ हैं… अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवडणुकीतील आवडती घोषणा देत आहेत. त्यांना भविष्यात कोणाकडून काय किंमत मिळेल हे ठाऊक नाही पण अजितदादांना त्यांनी डोकेदुखी निर्माण केली आहे.

छगन भुजबळ ७७ वर्षांचे आहेत. ते मूळचे नाशिकचे. लहानपणीच आई-वडिलांचे कृपाछत्र गेल्यामुळे ते मुंबईला आले. गेल्या पन्नास वर्षांच्या त्यांच्या राजकीय जीवनातील हे त्यांचे तिसरे बंड आहे. जेव्हा त्यांच्या मनाविरुद्ध घडते किंवा त्यांना पाहिजे ते मिळत नाही, तेव्हा ते समता परिषदेची ढाल पुढे करतात. लहानपणी ते भायखळ्याच्या मंडईत भाजी विकायचे. वीर जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून त्यांनी इंजिनीअरिंगचा डिप्लोमा घेतला. तरुण वयात शिवसेनाप्रमुखांची शिवाजी पार्क मैदानावरील भाषणे ऐकून ते प्रभावीत झाले. १९७३ मध्ये ते मुंबई महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक झाले तेव्हापासून त्यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. १९८५ मध्ये ते माझगावमधून आमदार म्हणून निवडून आले. माझगावमधून दोन वेळा आमदार झाले, दोन वेळा महापौर झाले पण बाळासाहेबांनी मनोहर जोशींना विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपदी नेमल्याने त्यांचे बिनसले. मग पुढचा प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार व अजित पवार यांच्यासोबत सुरू झाला.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ३९ मंत्र्यांचा दि. १५ डिसेंबरला नागपूर अधिवेशनाच्या पूर्व संध्येला शपथविधी झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांना संधी मिळाली. पण त्यात भुजबळ यांचे नाव नाही, त्यानंतर भुजबळांचा संताप सुरू झाला. शरद पवारांच्या पक्षात छगन भुजबळांना खूप महत्त्व दिले गेले. प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्रीपद त्यांना मिळाले. ओबीसी नेता म्हणत ते नेहमीच वलंयाकित राहिले. पण मनी लॉँड्रिंगच्या आरोपावरून ईडीकडून झालेली चौकशी, दोन वर्षे जेल, शिवाय भ्रष्टाचाराच्या आरोपावरून न्यायालयात सुनावणी चालूच आहे. भुजबळ हे भाजपाच्या रडारावर अनेक वर्षे होते. त्यांचा पुतण्या समीरने बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सुहास कांदे या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली तेव्हापासून शिवसेनाही भुजबळांवर नाराज आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे चिरंजीव पंकज याची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली. स्वत: छगन भुजबळांनी येवल्यातून निवडणूक लढवली. समीरने नांदगावमधून लढवली.

भुजबळांची नाराजी व संताप त्यांच्या समर्थकांमध्ये पोहोचल्यावर त्यांचा राग अजितदादांवर निघाला. काही ठिकाणी तर अजितदादांच्या फोटोला जोडो मारा आंदोलन झाले. मंत्रीपद मिळाले नाही म्हणून असे आंदोलन प्रथमच महाराष्ट्रात बघायला मिळाले. अखेर भुजबळांना सांगावे लागले की, पेटवापेटवी करायची नाही, जोडे माराे करायचे नाही, शिविगाळ करायची नाही… लाडक्या बहिणींप्रमाणेच महायुतीच्या मोठ्या यशात ओबीसींचा वाटा मोठा आहे, असे भुजबळ आवर्जून सांगत आहेत. मला मंत्रीपदाची हाव नाही, रास्ता मेरा है, मी रस्त्यावर लढाई लढणार, असे ते म्हणत आहेत. कोणाच्या विरोधात व काय पाहिजे म्हणून ते लढणार आहेत?

समीर भुजबळांचा पराभव करून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार सुहास कांदे भुजबळांच्या विरोधात बेधडक बोलतात. ते म्हणतात – महायुतीत कोणी नाराज नाही. फक्त भुजबळ नाराज आहेत. लोकसभेत त्यांनी गद्दारी केली, विधानसभेत त्यांच्या पुतण्याने गद्दारी केली. दोन्ही निवडणुकांत त्यांनी महायुतीच्या विरोधात काम केले. त्यांना त्यांच्या गद्दारीचे फळ मिळाले आहे…

आपल्याला राज्यसभेवर जायचे होते, तेव्हा सुरुवातीला सुनेत्रा पवार यांना पाठवले, नंतर नितीन पाटील यांना पाठवले, म्हणजे त्यांना शब्द दिलाय, मला मंत्रीपद तर नाहीच आणि म्हणतात राज्यसभेवर जा, अरे भुजबळ म्हणजे काय खेळणं आहे का? असे उदविग्न सवाल ते स्वत: विचारत आहेत. मला मंत्रीपदावरून वगळण्यामागे हेतू काय, असे ते वारंवार विचारत आहेत…

आपल्याला मंत्री करा असे प्रफुल पटेल, देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितले होते मग का केले नाही, असा प्रश्न त्यांना पडला आहे. पण आता भुजबळ काय करणार? जाणार कुठे? ओबीसींचा एल्गार पुकारण्याची भाषा करतात, मनोज जरांगेंना अंगावर घेतल्याचे बक्षीस मिळाल्याचे सांगतात. आपण कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, पुढे आणखी संकटे येतील, तुम्ही हिम्मत ठेवा असे ओबीसी समाजाला आवाहन करतात. मला राज्यसभेवर पाठवायचे होते मग विधानसभेला उभे केलेच कशाला, असा प्रश्न ते अजितदादांना विचारतात. कसला वादा, कसला दादा, असे विचारून थेट अजितदादांना खलनायक ते ठरवतात.

तेहतीस वर्षांपूर्वी बारा आमदार बरोबर होते, आज भुजबळांच्या बरोबर कोण आहे? वयाच्या ७७ व्या वर्षी लढण्याची त्यांची ऊर्मी असली तरी ते कोणाविरोधात लढणार? सत्तेला लाथ मारून ते बाहेर जातील का? हम एक है तो सेफ है, अशी घोषणा देऊन ते भाजपाच्या जवळ जाऊ इच्छितात का? ज्या भाजपाने त्यांच्यावर ढिगभर भ्रष्टाचाराचे आरोप केले, तो पक्ष त्यांना जवळ घेईल का? समाजासाठी नव्हे, तर स्वत:ला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून ते टाहो फोडत आहेत, हे लोकांना कळत नाही असे त्यांना वाटते का?

भुजबळ म्हणतात – कब तक सहे एक अपमान हम, सुनते सुनते दिल ही थक जाता है, जब वार हो स्वाभीमान पर हर बार, तो सब का अंत हो जाता है… चूप कर क्या मिलता है आखिर, दिल का दर्द ही चढता है, और फिर उठानी पडती है आवाज, जब पानी सर के उपर चढ जाता है…

[email protected]
[email protected]

PM Modi : पंतप्रधानांच्या हस्ते होणार मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -