तुमची आर्थिक समृद्धी रोखणाऱ्या सवयी

Share

प्रत्येक व्यक्ती निश्चित हेतूने गुंतवणूक करीत असते. या हेतूमध्ये अनेकदा आपल्याला खरंखुरं आर्थिक स्वातंत्र्य मिळावं, खर्च करताना पैसे आपल्या मर्जीनुसार करता यावेत अशी त्यांची अपेक्षा असते. कोणतीही गुंतवणूक स्वतः न करता अनपेक्षितपणे काहीजण श्रीमंत बनतात. त्यांच्याकडे केवळ भरपूर पैसे आहेत म्हणून आपण त्यांना श्रीमंत असे म्हणू शकतो, समृद्ध नव्हे. असलेले पैसे योग्य रीतीने गुंतवणूक करून वाढवता आले किंवा त्यात भर घालता आली नाही तरी निदान ते सांभाळता येईल एवढे किमान कौशल्य आपल्याकडे असेल, तर आर्थिकदृष्ट्या आपण खरोखरच समृद्ध झालो असे म्हणता येईल. हा मार्ग वाटतो तितका सोपा नाही. त्यात अनेक अडथळे आहेत. आपल्या अनेक आर्थिक सवयी या आपल्याला मध्यमवर्गातच ठेवतात अथवा त्याकडे ढकलतात, त्यांचा थोडक्यात आढावा घेऊ या.

उदय पिंगळे

कोणतेही निश्चित आर्थिक ध्येय नसणे – अनेक व्यक्ती अशा आहेत त्यांच्यापुढे कोणतेही आर्थिक ध्येय नसते. त्यामुळे बचत किंवा त्यापुढे जाऊन गुंतवणूक करावी असे त्यांना वाटतच नसल्याने त्यांना समृद्धी सोडाच श्रीमंतही होता येत नाही. तेव्हा आर्थिक दृष्टीने समृद्ध व्हायचं असेल तर आपले उद्दिष्ट असणे आणि ते पूर्ण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्वतःच्या आर्थिक उद्दिष्टांना प्राधान्य न देणे-काही व्यक्ती अशाही आहेत ज्यांच्याकडे निश्चित आर्थिक उद्दिष्ट आहे; परंतु त्यांचा प्राधान्यक्रम गरजा आणि चैन यासाठी खर्च करण्याकडे आहे. त्यामुळे ते पुरेशी गुंतवणूक करू शकत नाहीत, आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकत नाहीत. फारच थोडे लोक उद्दिष्टांवर लक्ष ठेवून प्रथम बचत अथवा गुंतवणूक करतात. मिळालेल्या पैशाचे नियोजन करून गुंतवणूक केल्यास, राहिलेले पैसे परिस्थितीनुसार खर्च कसे करायचे ते आपोआप समजत जाईल.

अनावश्यक कर्ज घेणे – आर्थिक क्षेत्रातील स्पर्धेमुळे सध्या कुणालाही सहज कर्ज उपलब्ध होत आहे. त्यासाठी कोणतेही तारण ठेवावे लागत नसल्याने, अनेकदा अनावश्यक कारणांसाठी कर्ज घेतले जाते. स्वतःला राहण्यासाठी घर, उच्च शिक्षण, व्यवसायाची वृद्धी यासाठी घेतलेले कर्ज हे आवश्यक कर्ज म्हणता येईल. घर आणि उच्च शिक्षण हे गरजेचे; परंतु आता आवाक्यातील नसलेले त्यामुळे कर्ज घ्यावे लागणे अपरिहार्य आहे. व्यवसाय वृद्धीसाठी घेतलेल्या/ कर्जातून भविष्यात उलाढाल होईल, वाढीव परतावा मिळू शकतो म्हणून ते कर्ज आवश्यक कर्ज समजावे. याउलट चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी घेतलेले कर्ज अनावश्यक म्हणता येईल. अनेकदा यासाठी हप्ता (EMI) किती पडेल हे सांगितले जाते. त्याकडे पाहून कर्ज खूप क्षुल्लक वाटू शकते. यासाठी व्याज द्यावे लागते. वरचेवर सहज उपलब्ध असणारे कर्ज घेतल्यास “कर्ज फेडण्यासाठी नवे कर्ज” अशी परिस्थिती निर्माण होऊन तुमची वाटचाल दिवाळखोरीकडे सुरू होते. पुरेसा राखीव निधी नसणे – अचानक काही आर्थिक संकट आलं, जसे मोठे आजारपण, अपघात, नोकरी जाणे अशा परिस्थितीत काही नियमित खर्च हे करावेच लागतात. त्यांना पर्याय नसतो. स्वतःकडे ६ ते १२ महिने खर्चास पुरेल एवढा निधी असेल आणि तो सहज काढून घेता येत असेल तर तो उपयोगी पडतो. नाहीतर अधिक व्याजदराने कर्ज घ्यावे लागते. उधार उसनवारी करावी लागते. असा निधी निर्माण करून आपली आर्थिक स्थिती मजबूत राहते. कुणाकडे हात पसरावे

लागत नाहीत. उत्पन्न, खर्च, मालमत्ता, दायित्व किती ते माहिती नसणे – कोणतेही आर्थिक उद्दिष्ट नसलेल्या व्यक्तीना या गोष्टी माहिती नसतात. याचा वेळोवेळी आढावा घेऊन त्याप्रमाणे गुंतवणूक निर्णय घेण्याची सवय असल्यास त्यातील अनावश्यक गोष्टी टाळता येतात. आवश्यक तरतुदी/धोरणात्मक बदल करता येतात. आर्थिक नुकसान करणाऱ्या महाग सवयी – अपवादात्मक प्रसंगीच क्षम्य असलेल्या आणि अलीकडे सर्रास अंगवळणी पडलेल्या काही सवयी उदा. हॉटेलिंग करणे, तत्काळ कोट्यातून प्रवास तिकीट काढणे, शेवटच्या क्षणी सहलीस निघणे, आयत्या वेळी विमानाचे तिकीट काढणे, बाहेर खाणे, ब्रॅण्डेड वस्तूच खरेदी करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याऐवजी खासगी वाहतुकीचा वापर करणे, सुजाण ग्राहक हा नेहमी जागृत असायला हवा. त्याने योग्य दर्जा आणि वाजवी किंमत (स्वस्त नव्हे) यांचा स्वतः नियमित शोध घ्यावा आणि नियोजन करावे. अगदीच नाईलाज असेल तरच अन्य पर्याय आजमावेत.

गुंतवणूक न करता केवळ त्यांच्या संधी शोधत बसणे – गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असताना विशिष्ट पर्यायाची वाट पाहण्यासाठी अनेकजण आपले पैसे तसेच बचत खात्यात ठेवतात. त्यामुळे गुंतवणूक न होता नुकसानच होते. फार काळ पैसे तसेच गुंतवणूक न करता ठेवण्याऐवजी आपल्याकडे एकच पर्याय नसून अन्य पर्यायही माहिती असायला हवेत.
कर आकारणी सवलती संबंधित माहिती नसणे – भांडवल बाजाराशी संबंधित अनेक गुंतवणूक प्रकार आहेत, त्यावर करसूट आणि सवलतीच्या एकसमान दराने कर आकारणी होते. अनेकांना हे माहिती नसल्याने ते आपली गुंतवणूक अन्य प्रकारात करून त्यावर कर देतात. प्राथमिक आर्थिक विषयांची कमी माहिती – आर्थिक संबंधात अशा अनेक प्राथमिक गोष्टी म्हणजे उद्दिष्ट, अंदाजपत्रक, देखभाल खर्च माहीत असतील तर योग्य पर्याय गुंतवणूकदार निवडू शकतात. उदा. घर, गाडी विकत घेणे याऐवजी भाड्याने घेणे. असलेले घर/ गाडी बदलून मोठे घर, अालिशान गाडी घेण्याचे फायदे / तोटे हे माहीत असेल तर योग्य तोच खर्च केला जातो. सहज सुचलेल्या या यादीत अनेक गोष्टींची अजूनही भर टाकता येईल. बऱ्याच जणांना त्या कंजूषपणा दर्शविणाऱ्या वाटतील. आवश्यक असेल तर त्या नक्की कराव्यात त्यासाठी मागे-पुढे पाहू नये. हा समतोल साधत राहिल्यासच आपण सुजाण गुंतवणूकदार बनून आपल्या संपत्तीत भर घालू शकतो.

mgpshikshan@gmail.com

Recent Posts

Pahalgam Terror Attack: प्रविण तरडेवर कोसळला दुःखाचा डोंगर, पहलगाम हल्ल्यात गमावला जीवलग मित्र

पुणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठी अभिनेता…

23 minutes ago

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारताची घुसखोरी विरोधात कठोर मोहीम!

चकमकीत दोन अतिरेकी ठार, १० किलो IED आणि शस्त्रसाठा जप्त बारामुल्ला : जम्मू काश्मीर येथे…

32 minutes ago

पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला कशी देणार प्रतिक्रिया, गुरुवारी बिहारमध्ये कळणार

दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…

50 minutes ago

१० कोटींचा बँक घोटाळा! वरिष्ठ मॅनेजर, उद्योजक व एजंटला ५ वर्षांची शिक्षा

मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…

1 hour ago

Sachin Tendulkar: “हल्ल्याच्या बातमीने धक्काच बसला…” पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट

मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…

2 hours ago

Mumbai BMW hit and run case : गाडी थांबवता आली असती, पण माणुसकी हरवली…

वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…

2 hours ago