एकेकाळी क्रिकेट विश्वात सगळ्यांच्या तोंडी या दोन खेळाडूंची नावं होती, ती म्हणजे दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे शिष्य सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या दोघांची. एक उजवा तर दुसरा डावखुरा फलंदाज. दोघेही प्रतिभावान आणि ताकदीचे खेळाडू. भारताच्या क्रिकेटचे उज्ज्वल भविष्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. विनोद कांबळी भारतीय संघाकडून खेळताना आठवणीत राहील अशी इनिंग खेळत असे. त्यामुळे तो सर्वांच्या लक्षात राहिलाही. पण कालांतराने खेळापेक्षा जास्त सगळ्यांच्या लक्षात राहिला तो त्याच्या अनेक कॉन्ट्रवर्सिजमुळे. क्रिकेट विश्वात दोघांची इंट्री झाली. पण आज सचिन भारतरत्न आहे, तर विनोद कांबळी साधा खेळाडूही उरला नाही. जगण्यासाठीही त्याला धडपड करावी लागते आहे.
सीमा पवार
क्रिकेट विश्वातील एका गुरूचे दोन शिष्य. हे दोघेही आपल्या गुरूचे आणि लोकांचे आवडते. हे दोघेही आपल्या क्षेत्रात प्रतिभावान होते. पण त्यातला एक पुढे जावून आपल्या अभूतपूर्व कर्तृत्वाने क्रिकेटचा देव झाला, तर दुसरा मात्र आज दोन वेळच्या अन्नालाही मुकला. त्याची त्या दिवशी ती अवस्था पाहिल्यानंतर ‘कोण होतास तू’ असंच त्याला म्हणावं लागेल. कारण त्या दिवसानंतर अनेकजण त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत. अनेकांनी त्याला ट्रोलही केलंय. सध्या सोशल मीडियावर या दोन मित्रांचा एक व्हीडियो व्हायरल होतोय. त्यामुळे सगळीकडे या दोघांबद्दल अनेक चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. हे दोघे म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. यांचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांच्या प्रतिकृतीच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी हे दोघे व्यासपीठावर एकत्र आले. सचिन मात्र नेहमीप्रमाणे फीट अॅण्ड फाईन दिसत होता. पण कित्येक वर्षांनी अशाप्रकारे लोकांच्या समोर आलेला विनोद कांबळी मात्र त्या स्टेजवर स्वत:लाच शोधत होता. कोणाच्या तरी आधाराने उभा असलेला विनोद कांबळी त्याचे हात थरथरत होते. बोलतानाही त्याची जीभ जड झाली होती. तिथे बसलेले सगळे त्याचे सहखेळाडू होते. पण आज तो कोणाचाच नव्हता.
त्या दिवशी अनेकांना त्याची दया आली. तिथे उपस्थित असलेला सचिन तेंडुलकर आपल्या एकेकाळच्या जीवलग मित्राला भेटायला त्याच्याजवळ गेला. त्यावेळी विनोदने त्याचा हात हातात घेतला. जणूकाही एक केविलवाण्या नजरेने तो त्याच्याकडे पाहत होता आणि त्याने आपल्याजवळ थांबावं असंच काहीसं त्याची नजर त्याला सांगत होती. पण कार्यक्रम थांबेल म्हणून सचिन परत आपल्या जागेवर गेला. यावेळी तिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते. इतरही अनेक दिग्गज खेळाडू होते. या संपूर्ण प्रकारानंतर सगळ्यांच्या नजरा विनोद कांबळीवर खिळल्या होत्या. त्याला त्याच्या आचरेकर सरांच्या आठवणी सांगण्यासाठी माईक देण्यात आला. मात्र काहीही न बोलता ‘सर जो तेरा चकराये’ या गाण्याचं एक कडवं म्हटलं. पण ते बोलत असताना त्याच्या त्या आवाजात त्याचं गेलेलं करिअर, त्याच्यापासून दुरावलेली माणसं आणि एकूणच त्याची आजची अवस्था असं बरंच काही लपलं होतं. एकेकाळी क्रिकेट विश्वात या दोन खेळाडूंनी आपले स्थान पक्के केले. सचिनपेक्षाही एक पाऊल पुढे असलेला विनोद कांबळी अशी चर्चा असताना नेमकं असं काय झालं, त्याच्यासोबत असं काय घडलं, त्याची अशी अवस्था का झाली? याबाबत अनेक समज-गैरसमज आणि चर्चांना उधाण आले.
सचिन आणि विनोद ही जोडी १९८३ मध्ये क्रिकेटक्षेत्रात उतरली. विनोद कांबळी याचं वय होतं १०, तर सचिनचं वय होतं ११. मुंबई, दादरमधील शांताश्रम शाळेचे विद्यार्थी. रमाकांत आचरेकर हे त्यांचे प्रशिक्षक. क्रिकेटसाठी खेळाडूंची निवड करताना विनोद कांबळीची निवड झाली. पण सचिन तेंडुलकरची निवड झाली नाही. मात्र सचिनचे बंधू यांनी आचरेकरांशी बोलून सचिनला एक संधी द्यावी अशी विनंती केली. त्यानंतर मिळालेल्या संधीचा फायदा घेत सचिनने दाखवलेली फटकेबाजी खूप वेगळी होती. आंतरशालेय क्रिकेटमधून मुंबईत या दोघांनी आपला एक दबदबा निर्माण केला होता. सचिनने मैदानावरील सरावात कधीही खंड पडू दिला नाही. यश, पैसा, प्रसिद्धी मिळत असतानाही एक शिस्तबद्ध खेळाडू होता, तर याउलट विनोद कांबळी मैदानावर धुवांधार बॅटिंग करत कौतुक मिळवलं की सुसाट सुटायचा. त्याचं स्वत:वर नियंत्रण नसायचं, मित्रांबरोबर पार्ट्या करण्यात आनंद लुटायचा. मात्र मैदानात तुम्हाला चांगला खेळ दाखवायचा असेल तर तुम्हाला तुमचा फिटनेस, रात्रीची पुरेशी झोप गरजेची आहे. विनोद इथेच चुकला, असं मागे एकदा अजित वाडेकर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. विनोद कांबळीने भारतीय कसोटी क्रिकेट संघात पदार्पण केलं. सुरुवातीला अडखळलेल्या विनोद कांबळीने १९९३ साली लागोपाठ झालेल्या कसोटी सामन्यात दोन शतकं झळकावली. पुन्हा एकदा संपूर्ण जगाला आपल्या खेळाचे कौतुक करण्यास त्याने भाग पाडलं. आत हा काही थांबत नाही, असा विचार करण्याआधीच विनोद कांबळीने पुन्हा तेच केले. विनोद कांबळीला ते यशही पचवता आलं नाही. कांबळीच्या खेळातलं सातत्य हरवलं होतं. त्याला संघात जागा मिळणं कठीण झालं होतं. आता क्रिकेट क्षेत्रात अनेक मुलं प्रवेश करत होती. त्याच्यामागून आलेली मुलं क्रिकेटमध्ये झळकू लागली. त्यामुळे कांबळी अधिकच स्वत:मध्ये राहू लागला. विनोद कांबळीने भारतासाठी एकूण १०४ एकदिवसीय, तर १७ कसोटी सामने खेळले. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी ३.५६१ धावा केल्या. यात टेस्ट कसोटीमध्ये चार शतकं, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन शतकांचा समावेश आहे.
विनोद कांबळीने १९९१ मध्ये भारतासाठी पदार्पण केले, तर २००० मध्ये त्याने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. पण त्याचबरोबर सचिनने मात्र खेळाला कुठेही गालबोट लागू न देता यशस्वी होत राहिला आणि सचिन आहे मग आपण जिंकणारच असा विश्वास लोकांमध्ये निर्माण केला. तो विश्वास मात्र कांबळीने गमावला होता. पिचवर टिकून राहण्याची गरज असताना त्याचा विकेट पडत असे. ऐककाळी शेन वॉर्नच्या चेंडूवर एका ओवरमध्ये २० रन करणारा विनोद कांबळी होता. १९९६च्या वर्ल्ड कपमध्ये स्पीनरला वन डाऊन, टू डाऊन ते थ्री डाऊन खेळत त्याने एशियन पिचवर आपला दबदबा निर्माण केला. ब्रायन लाराशी त्याची तुलना करण्यात आली. लेफ्ट हँडेड तसेच हाय बॅक लेफ्ट पंच करत शॉट मारणं अगदी तसंच. १९९६ मध्ये हिडन गाडर्नवर श्रीलंकेबरोबर सेमी फायनलला पराभूत झालेला भारतीय संघ, पण नाबाद राहिलेला कांबळीला हा पराभव जिव्हारी लागला होता. न्यूझीलंड आणि आॅस्ट्रेलियाच्या बॉलर्सनी कांबळीची कमजोरी पकडली होती. त्यात दादा आणि राहुल द्रवीड यांचे आगमन संघात झाले होते. त्यांच्या येण्याने आणि खेळामुळे कांबळीच्या संघातलं स्थान कमी केलं होतं. म्हणूनच तुमच्यातली शिस्त ही नेहमीच तुमच्या यशाचा एक महत्त्वाचा भाग असतो. पण सगळ्याच गोष्टी नशिबावर सोडणाऱ्या कांबळीला अनेकदा माघार घ्यावी लागली. क्रिकेटच्या पिचपासून दूर जात कांबळीने बॉलिवूड स्टार्स आणि पार्ट्याच्या फ्लॅश लाइट्समध्ये अधिक वेळ घालवला. विनोद कांबळीची बॅटिंग म्हणजे, ‘उनके स्ट्रोक मे नजाकत थी, उतके शॉट मे ताकद थी, टायमिग गझब की थी’, असं कोणीतरी म्हटलं… इतकं संगळं असूनही सचिनसारखे यश का पदरात पडलं नाही. पराभव पचवता आला पाहिजे. अपयशाचं खापर दुसऱ्यावर न फोडता स्वत:मधले दोष स्वीकारायला हवेत. तेच कांबळीच्या बाबातीत झाले नाही. संघात असे इतरही अनेक खैळाडू होते. या प्रत्येकाने एका अपयशानंतर पुन्हा एकदा कम बॅक केले आहे. पण नव्वदमधला हा डावखुरा फलंदाज. राजाचा रंक होण्यास त्याच्यासह अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या.