अॅड. रिया करंजकर
प्रेम कधी कोणावर कसे केव्हा होईल हे सांगता येत नाही. जसे की प्रेमाला उपमा नाही तसेच काहीतरी आजकाल जगामध्ये चालू आहे. प्रेम कधी कोणाचा घात करेल सांगता येत नाही. सुधीर हा सर्वसामान्य माणूस. सुधीर अापल्या दोन मुली, बायको यांच्यासोबत सुखाने संसार करत होता. जे मिळेल त्यात तो आपले घर चालवत असे. सुधीरला गायनाची आवड असल्याने करोके स्टुडिओमध्ये जात होता. तिथे त्याची ओळख रश्मीसोबत झाली. तीही तिथे आपली आवड पूर्ण करण्यासाठी येत होती. दोघांचे आवाज चांगले असल्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली.
रश्मीही आपल्या मुलासोबत पतीसोबत राहत होती. तिचा नवरा चांगल्या हुद्द्यावर कामावर असल्यामुळे घरात सर्व सुखसोयी उपलब्ध होत्या. घरात नोकरचाकर होते. सुधीरचं तिच्याविरुद्ध होतं. तो भाड्याने राहत होता. दोन मुलींपैकी एक मुलगी एअर होस्टेस म्हणून कामाला होती. परिस्थितीशी सर्वसाधारण बेताची होती. सुधीरची बायको सर्वसाधारण घरातील स्त्री जशी असते तशी होती. नेहमी गाण्याच्या ठिकाणी जाऊन सुधीर आणि रश्मी यांच्यात मैत्री वाढत गेली आणि हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली. किती गोष्टी लपवल्या तरी त्या लपत नाही तसेच झाले. दोघांच्याही घरामध्ये यांचे प्रेम प्रकरण समजले. सुधीरच्या बायकोने त्याला समजावून सांगितले तसेच नातेवाइकांनी त्याला समजावलं तरी तो ऐकायला तयार नव्हता. रश्मीच्या घरच्यांनीही तिला खूप समजावले. पतीने तिला समजावलं की जे चाललंय ते थांबवं. समाजात आपली नाचक्की होईल. आपल्या मुलाचे अजून लग्न व्हायचे आहे. त्याला मुलगी मिळेल का असे अनेक प्रकारे रश्मीच्याही नवऱ्याने तिला समजावले. पण त्यांचे आपले प्रेम प्रकरण चालूच होते.
दोघांनी वयाची पन्नाशी पार केलेली होती. त्या दोघांना काहीच वाटत नव्हतं पण त्यांच्या घरातल्या लोकांना मात्र समाजात कसे वावरायचे याची चिंता लागून होती आणि तो दिवस येऊन ठेपलाच. सुधीर आणि रश्मी यांनी आपापली घरं सोडून दोघेही पळून गेली. दोघांच्याही घरच्यांना धक्काच बसला होता. हे दोघं पळून जातील असं वाटलं नव्हतं. कारण दोघांनाही मोठी मुलं होती आणि आपल्या मुलांना, संसाराला सोडून जातील असे नातेवाइकांना वाटले नव्हते. रश्मीच्या नवऱ्याला आणि सुधीरच्या बायकोला असे वाटले होते की, कधी ना कधी लोक सुधारतील आणि यांच्या नात्यांमध्ये अंतर येईल. पण तसे झाले नाही. त्या गोष्टी वेगळ्याच घडल्या. रश्मीने तिच्या नावावर असलेलं दुकान विकलं होतं आणि ते पैसे घेऊन आणि घरातले दागिने घेऊन ती सुधीरबरोबर पळून गेली. रश्मीच्या नवऱ्याला दुकान आणि दागिने गेल्याचे दुःख नव्हते पण आपल्या पत्नीने असे का केले ते समजत नव्हते. सुधीर हा काहीच कामधंदे नसलेला माणूस होता. तो हिला काय देऊ शकणार होता. रश्मीचा नवरा एक चांगला ऑफिसर होता. आपल्या घरात कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. तरीही ती काही न करणाऱ्या माणसाबरोबर कशी पळून गेली.
तिला नेमकं कोणत्या गोष्टीची कमतरता भासली हे मात्र तिच्या नवऱ्याला समजत नव्हते. सुधीरच्या बायकोने व रश्मीच्या नवऱ्याने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आणि पोलिसांनी रश्मी आणि सुधीरला पोलीस ठाण्यात हजर केले त्यावेळी दोन्हींकडचे कुटुंब हजर झाले. मी त्यांना परत घरी या असं सांगू लागले. समाजात नाचकी होत आहे याची जाणीव करून दिली. दोघेही पन्नाशी पार केलेले होते. संसार व्यवस्थित चालू होता तरीही दोघांनी असा निर्णय का घेतला. ज्या वयात मुलांची लग्न लावून द्यायची होती. स्वतः मात्र पळून गेले होते आणि आपल्या कुटुंबाला मात्र समाजाला तोंड देण्यासाठी मागे ठेवलं होतं. दोन्ही कुटुंबांच्या सदस्यांची समाजामध्ये नाचक्की होत होती. दोघांचेही घटस्फोट झाले नसले तरी समाजात नवरा-बायको म्हणून राहू शकतात का या अनेक प्रश्नांचा विचार या दोघांनी केला नाही. फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार त्यांनी केला.
(सत्यघटनेवर आधारित)