Friday, February 14, 2025

मानवधर्म

पल्लवी अष्टेकर

आपल्या भारत-भूमीला अपार संत परंपरा लाभलेली आहे. वेद काळातील ऋषीमुनी व मध्ययुगातील संत यांनी सर्वांचे कल्याण व मंगल चिंतले. समाजात सद्भावना, सद्विचार टिकून राहावेत यासाठी संत स्वतः श्रमत असतात. प्रामुख्याने संतांच्या विचारांत तात्विक वेगळेपणा आढळत नाही. ईश्वरभक्ती हा संतांचा आत्मा असतो. संत रामदास यांचा जन्म रामनवमी दिवशी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जांब या गावी झाला. त्यांना वयाच्या पाचव्या वर्षी मारूतीरायांचा अनुग्रह झाला. समर्थांच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत व आईचे नाव राणूबाई ठोसर. श्री रामदासांचा काळ इ. स. १६०८ ते १६८२. संत रामदासांचे मूळ नाव नारायण. त्यांना एक मोठा भाऊ होता, त्याचे नाव गंगाधर. राणूबाईंनी पती निधनानंतर आपल्या दोन्ही मुलांना नेटकेपणाने सांभाळले.

लहानपणी नारायण पुरात पोहणे, झाडावरून उड्या मारणे, घोड्यावर रपेट करणे इ. गोष्टींत तरबेज होता. एकदा नारायण लपून बसला व काही केल्या सापडेना. अखेर आईला तो एका फडताळ्यात सापडला. आईने त्याला विचारले की, “इथे तू काय करत होतास?’’ तेव्हा नारायणाने उत्तर दिले की, “चिंता करितो विश्वाची” आणि खरोखरच नारायण विश्वाची चिंता करू लागला. त्याकाळी विवाह लवकर होत. वयाच्या बाराव्या वर्षी आईच्या आग्रहामुळे नारायण लग्नाला तयार झाला. पण ‘शुभमंगल सावधान’ हे शब्द ऐकताच त्याने बोहल्यावरून पळ काढला. नारायण लग्न मंडपातून बाहेर पळाले ते सावधान होऊनच. तेथून पायी चालत येऊन त्यांनी पंचवटीस येऊन रामाचे दर्शन घेतले व टाकळी येथे दीर्घकाळ, बारा वर्षे तपश्चर्या केली. तप:श्चर्येच्या कालावधीत ते पहाटे उठून सूर्यनमस्कार घालत. ते ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या मंत्राचा ते जप करीत असत. समर्थ रामदासांनी या मंत्राचा जप तेरा कोटी वेळा केला. समर्थ दुपारी केवळ पाच घरी भिक्षा मागून ते नैवेद्य श्रीरामास दाखवित. त्यातील काही भाग पशूपक्ष्यांना ठेवून उरलेला भाग स्वतः ग्रहण करीत. याकाळात समर्थांनी वेद, उपनिषदे, प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला. व्यायाम, उपासना व अध्ययन या तीनही गोष्टींना त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण स्थान होते. घरदार सोडून समर्थांनी रामाची उपासना केली. अनुष्ठानाखेरीज सामर्थ्य नाही व सामर्थ्याखेरीज लोकांच्या उपयोगी पडून त्यांची दुःखे नाहीशी करणे अशक्य आहे हे समर्थांनी पुरेपूर जाणले होते.

या काळात परकीय आक्रमणाने अवघा महाराष्ट्र त्रासलेला होता. जनतेला आपली दैनंदिन नित्यकर्मे करता येत नव्हती. १२ वर्षांच्या तीव्र तपःश्चर्येनंतर समर्थांना आत्मसाक्षात्कार झाला असे म्हणतात. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांनी १२ वर्षे भारताचा दौरा चालू ठेवला. तीर्थयात्रेवर असताना ते श्रीनगरला आले. तिथे त्यांची भेट शीख गुरू हरगोविंदजी महाराजांशी झाली. त्यांनी समर्थांना धर्मरक्षणासाठी सशस्त्र होण्याचे मार्गदर्शन केले. स्वराज्य स्थापन करून जनतेला राज्यकर्त्यांच्या अत्याचारापासून मुक्त करणे हे त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय केले. या प्रयत्नात त्यांना श्री शिवाजी महाराजांसारख्या कर्तव्यदक्ष व कर्तबगार शिष्याचा लाभ झाला व स्वराज्य स्थापनेचे स्वप्न त्यांच्या हयातीतच साकार होण्याचे भाग्य लाभले. समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्तीची व बुद्धीची देवता आहे, त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा विचार त्यामागे होता. समर्थांनी लोकांना उद्देशून सांगितले,

|धिर्धरा धिर्धिरा तकवा |
|हडबडूं गडबडूं नका |
|केल्याने होत आहे रे |
|आधी केलेचि पाहिजे |

राजकीय राजवटीत जेव्हा हिंदुस्थानी जनता भयभीत झाली होती, तेव्हा समर्थांनी आपल्या खणखणीत वाणीने वरील श्लोक सांगितले. समाजातील भीषण स्थिती, दैत्याचा परमावस्था, स्वराज्याच्या कल्पनेचा अंतरी विश्वास नाही, पशूप्रमाणे सर्व जीवन चाललेले. समाजाला कोणी वाली, त्राता नाही असे सर्व पाहून समर्थांचे अंतःकरण द्रवले. समर्थांनी रामाची उपासना केली. आपल्या सामर्थ्य, बळाने अखिल राष्ट्र संघटित केले. समर्थ समाजसेवेकरिता, राष्ट्र हिताकरिता व स्थैर्याकरिता तळमळणारे होते. समर्थांनी हरिकथा निरूपण, धर्मकारणाला धरून राजकारण या साधनांनी संप्रदायाला स्थैर्य आणले. समर्थ रामदासांच्या जीवनात भाकड व चुकीच्या कल्पनांना जीवनात स्थान नव्हते. समर्थांनी सांगितलेला ‘जय जय रघुवीर समर्थ’ हा मंत्र जनमानसाच्या तोंडी कायम राहिला.

समर्थांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी निकटचा संबंध होता. शिवाजी महाराज समर्थ रामदासांना आपले गुरू मानीत. शिवाजी महाराज समर्थांच्या कार्याने प्रेरित झाले होते. समर्थांनी आपल्या १२ वर्षांच्या तपःश्चर्येनंतर भारतभ्रमण केले. संपूर्ण भारत देश ते फिरले. त्यांनी प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. समर्थांनी अकरा मारूतींची स्थापना केली. त्यांनी ‘दासबोध’ व ‘मनाचे श्लोक’, ‘करूणाष्टके’ या महान ग्रंथांची रचना केली. आपल्या श्लोकांतून लोकशिक्षणाचा मार्ग समर्थांनी अवलंबिला. त्यातले काही श्लोक-

|अनुदिन अनुतापे तापलो रामराया |
परमदीन दयाळा नीरसी मोहाच्या |
|अचपल मन माझे नावरे आवरीता |
|भजनरहित रामा सर्वही जन्म गेला |
|रघुपति मति माझी आपुलीशी करावी |
|सकल त्यजुनि भावे कास तुझी धरावी ||

समर्थांच्या मते, नाती-गोती, मोह, स्वार्थ, भोगवाद, चैन, विलास, मौज-मजा ही सारी अशाश्वत सुखे आहेत. आपल्या मनाचा वारू कोठेही भरकटत जातो. समर्थांनी जगाचे माया रूप जाणून ब्रम्हाला परमोच्च स्थान दिले.
समर्थांच्या ‘मनाच्या श्लोकांतील’ आठवा श्लोक-
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी |
मना सज्जना हेचि क्रिया धरावी |
मना चंदनाचे परी त्वां झिजावे |
परी अंतरी सज्जना नीववावे ||

याचा अर्थ असा की, ‘हे मना, जीवनामध्ये अशी कामे करावीत की मृत्यूनंतरही मागे कीर्ती उरावी. लोकांसाठी स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवावा आणि सज्जन लोकांना समाधान द्यावे’. अशा प्रकारचे जीवन समर्थ जगले. १६०३ मध्ये वयाच्या ७३ व्या वर्षी महाराष्ट्रातील सज्जनगड येथे त्यांनी समाधी घेतली. हा दिवस ‘दासनवमी’ म्हणून ओळखला जातो. दास नवमीला येथे लाखो भाविक लोक दर्शनाला येतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -