Tuesday, January 14, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यसिंधुदुर्ग जिल्ह्यात गवारेड्यांची दहशत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गवारेड्यांची दहशत

वनविभाग हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा एक विभाग असून त्या विभागाजवळ वनीकरण आणि वन्यजीव व्यवस्थापनाची मोठी जबाबदारी असते. तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गवारेड्यांच्या दहशतीचा विचार करता वनविभागाने गवारेड्यांचा बंदोबस्त करावा. जेणेकरून गवारेड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ते दूर करण्यासाठी मदत होईल. तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गवारेड्यांची दहशत कायमची थांबवण्यासाठी आता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी स्थानिक जनतेची मागणी आहे.

रवींद्र तांबे

कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गसौंदर्याने नटलेला असून १९९९ साली आपल्या भारत देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. अशा या जिल्ह्यात गवारेड्या अगोदर हत्तींनी धुमाकूळ घातला होता. आता तर गवारेड्यांची दहशत गावागावात वाढत आहे. त्यामुळे एकटा दुकटा शेतकरी सुद्धा कामानिमित्ताने जंगलात जाण्यासाठी घाबरत आहे. तेव्हा वन विभागाने गवारेड्यांना आळा घालणे आवश्यक आहे. मागील दहा वर्षांचा विचार करता आकडेवारी उपलब्ध नसली तरी दिवसेंदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात गवारेड्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता तर रस्त्यावरील वाहनांना सुद्धा धडक देऊ लागले आहेत. ही घटना मागील पंधरा दिवसांतील, देवगड तालुक्यामधील शिरगांव राकसघाटी येथील आहे. इळये गावचे नागरिक अभिषेक मिराशी हे कामानिमित्त इनोव्हा गाडीने नांदगावच्या दिशेने जात असताना अचानक गाडीला धडक दिल्याने कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. तसेच याच परिसरात बाबल्या पवार आपल्या दुचाकीवरून जात असताना त्याच्या दुचाकीला धडक देऊन त्याला पण गंभीर जखमी केले होते. तसेच आठ महिन्यांपूर्वी प्रकाश गोगटे यांच्या पण गाडीला धडक दिली होती. त्यात बरेच गाडीचे नुकसान गोगटे यांचे झाले होते. इतकेच काय मागील महिन्यात सुद्धा एका दुचाकीवाल्याला जखमी केल्याची घटना आहे. तसेच चार वर्षांपूर्वी भिरवंडे खलांतरवरची वाडीतील शेतकरी विलास सावंत यांच्या लावणीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. त्यामुळे आता वन विभागाने गाफील राहून चालणार नाही. त्यावर कायमचा तोडगा काढणे गरजेचे आहे. अशा घटनांमुळे स्थानिक नागरिक भीतीच्या वातावरणात वावरत आहेत. तेव्हा ही बाब जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या गवारेड्यांच्या वावरामुळे कुडाळ, कणकवली व वैभववाडी तालुक्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान झाले आहे. मी, कणकवली शहरातील एस. एम. हायस्कूलमध्ये इयत्ता ९वीमध्ये (१९८५-८६) असताना स्काऊट गाईडचा कॅम्प दाजीपूर येथे २५ व २६ डिसेंबर, १९८५ रोजी गेला होता. त्यावेळी कांबळी सरांच्या मार्गदर्शनाखाली दाजीपूरच्या अभयारण्यात गवारेडे पाहण्यासाठी गेलो होतो. मात्र एकाही गवारेड्याचे दर्शन झाले नाही. आता मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावोगावी गवारेडे पोहोचले आहेत. त्यामुळे रानावनात जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका आहे. गवारेडे गावात येण्याची अनेक कारणे असतील. कोण सांगतात पाण्यासाठी गावात येतात. जंगलतोड झाल्याने व गावातील सड्यावरील शेती नागरिक करीत नसल्यामुळे जंगली जनावरे लोकवस्तीकडे येऊ लागली आहेत. असे असले तरी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोक्याचे आहे. मागील काही प्रसंग घडल्याने गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशावेळी वन विभागाने पुढे येणे गरजेचे आहे. अशा घटनांमुळे जास्त तणाव शेतात मोलमजुरी करणाऱ्या कामगारांमध्ये तसेच गावच्या पोलीस पाटील यांच्यावर येतो. यासाठी वनविभागाने पंचनामे करत बसण्यापेक्षा आता नागरिकांच्या जीवाची काळजी घेणे आवश्यक आहे. तेव्हा असे असले तरी नागरिकांनी आपली आपणच काळजी घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, त्यासाठी खालील बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागेल.

गवारेडा हा झाडांची पाने, गवत, झाडांचे कोंब आणि विविध प्रकारची फळे खातात. तसेच ते कळपाने राहतात, तेव्हा जिल्ह्यातील ज्या गावात त्यांचा वावर असेल त्या ठिकाणच्या नागरिकांनी वनविभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. त्यासाठी स्थानिक नागरिकांनी सतर्क राहून सावधगिरी बाळगावी. नागरिकांनी गवारेडा कुठे असेल, कोणत्या डोंगरात असेल याच्या शोधात जाऊ नये. जरी वावरत आता कमी झाला असे समजून एकटे शेतमळ्यात जाऊ नये. ज्याठिकाणी गवारेड्यांचा कळप दिसेल त्या परिसरात फटाके वाजवू नयेत. तसेच आरडाओरडा करू नये. शक्यतो संध्याकाळनंतर घराच्या बाहेर पडू नये. जायचे झाल्यास मोठा प्रकाश असणारी बॅटरी सोबत घ्यावी. आपल्या परिसरात गवारेडे आढळले, तर तत्काळ वन विभागाला कळविण्यात यावे. ज्या मार्गाने गवारेडे जात असतील त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करू नये.

जर शेतीचे गवारेड्याकडून नुकसान झाल्यास त्याची नुकसानभरपाई वनविभागाकडून मिळू शकते याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. त्यासाठी वनविभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल. आपल्या विभागातील वनविभागाने कार्यालयातील दिलेला फोन, अधिकाऱ्यांचा मोबाईल नंबर तसेच १९२६ या त्यांच्या फोनवर तत्काळ अचूक माहिती द्यावी. म्हणजे त्यांना कारवाई करणे सोपे जाईल. यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या मनातील भीती दूर होऊन जिल्ह्यामधील गवारेड्यांची दहशत कमी होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -