परभणीत पूर्णा ताडकळस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचा अपमान करण्यात आला. यानंतर परभणी जिल्ह्यात घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान आंबेडकरी अनुयायांनी रस्ता रोको करत काही भागांत दगडफेक केली. तसेच टायर जाळले. यावेळी पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर होते. संतप्त वातावरण पाहता परभणीमधील इंटरनेटची सुविधा खंडित करण्यात आली. त्या ठिकाणी जमावबंदी जाहीर करण्यात आली. हिंसक घटनांमुळे अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. मुळात राष्ट्रपुरुषांची स्मारके, प्रतिमा, त्यांच्या संदर्भातील वास्तू यांचे प्राणपणाने जतन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. आजच्या काळात राष्ट्रपुरुषांच्या कार्याची, विचारांची आपण कधीही बरोबरी करू शकत नाही, त्यांच्याइतकी वैचारिक उंची आपण गाठू शकत नाही, त्यांचे कार्य लौकिकअर्थाने अलौकिक असेच असते. पण समाजातील विघातक अपप्रवृत्ती, नराधम मात्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी, समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी, समाज व्यवस्थेमध्ये वादंग पसरविण्यासाठी असे कृत्य करून असुरी आनंद मिळवत असतात, पण ही एकप्रकारची विकृती असते.
या विकृतांच्या असुरी आनंदाची प्रचलित समाजव्यवस्थेला फार मोठी किंमत मोजावी लागते, झालेली हानी भरून निघते, पण समाजामध्ये निर्माण झालेली तेढ, भावनिक जखमा भरून निघण्यास अनेक वर्षे निघून जातात. भारतीय समाज हा संवेदनशील व भावनाशील आहे. त्यातच भारतामध्ये विविधतेतून एकता हे पालूपद वारंवार आळविले जात असले तरी हे वाक्य सुभाषित म्हणून केवळ भिंतीवरच आजच्या काळात शोभून दिसते. विविध जातीधर्मियांचा भारतात समावेश असला तरी भारतीय समाज आजही जाती-धर्माच्या चौकटीतच अडकला आहे व त्या बंधनातच विखुरला गेला आहे. त्या जातीधर्माच्या चौकटी तोडून तो आजही देशाचा, देशाच्या अखंडतेचा विचार करत नाही, ही वास्तविकता असली तरी खऱ्या अर्थांने ती एक शोकांतिकाच आहे. राष्ट्रपुरुषदेखील आज आम्ही भारतीयांनी जातीधर्मात वाटून घेतले आहे. त्यामुळे राष्ट्रपुरुषदेखील जातीधर्माच्या चौकटीत बंदिस्त झाले आहेत.
भारताची राज्यघटना ज्यांनी लिहिली, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेदेखील मागासवर्गीय समाजाच्या एक-दोन जातीपुरतेच सीमित झाले असल्याचे वातावरण आज निर्माण झाले आहे. मुळातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व जीवनपट पाहता प्रत्येक भारतीयांचे या विचारपर्वाचे देव्हाऱ्यांमध्ये देवाबरोबर पूजन केले पाहिजे, त्यांचे स्मरण केले पाहिजे. पण त्यांनाही जातीच्या वेष्टनाचा विळखा पडल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजच्या समाजाला समजू शकले नाहीत. महात्मा जोतिबा फुले हे माळी समाजाचे, छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजाचे, लोकमान्य टिळक हे ब्राह्मण समाजाचे असे त्या त्या समाजाचे, जातीचे लेबल महापुरुषांना लावण्यात आले. मुळात महापुरुषांना जाती-धर्माच्या चौकटीमध्ये अडकवून ठेवण्याचा तुम्हा-आम्हाला कोणी अधिकार दिला? महापुरुषांच्या स्मारकांची विटंबना, त्यांच्याशी संबंधित साहित्याची अथवा वास्तूची विटंबना ही नक्कीच संवेदनशील व अक्षम्य बाब आहे. अशी निंदनीय घटना करणारा विकृत कोणत्याही जातीचा-समाजाचा असो, त्याला कदापी माफी मिळू नये. अशा घटना घडवून आणण्यामागे कोणाचे तरी षडयंत्र असते. समाजात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा, जातीय दंगली व्हाव्यात, जाती-जातींमध्ये वाद निर्माण व्हावेत, हा हेतू अशा घटना घडवून आणण्यामागे त्या अपप्रवृत्तींचा असतो. त्यांच्या याच कुटिल खेळीला आपण बळी पडतो, हे आजवर विविध घटनांमध्ये दिसून आले आहे आणि यातूनच त्या विकृत नराधमांचा हेतू साध्य होतो.
मुळातच अशा घटना घडल्यानंतर सर्वप्रथम आम्ही भारतीयांनी थंड डोक्याने अशा घटनांचा आढावा घेऊन शोध घेतल्यास त्या नराधमांना धडा शिकविणे अवघड जाणार नाही. अहिंसा करून अशा घटनांची भरपाई होणे शक्य आहे का? याचाही आज थंड डोक्याने विचार करण्याची वेळ आली आहे. अशा घटना घडताच आपण संयम व सहनशीलता गमावून बसतो व त्यातूनच उद्रेक जन्माला येतो. जमावाला डोके नसते आणि रागाला विचार करता येत नाही. अशाच घटनांना यातून खतपाणी नकळत घातले जाते. राष्ट्रपुरुषांची स्मारके पुन्हा उभारली जातील, पण समाजव्यवस्थेचे रागाच्या भरात झालेले नुकसान पुन्हा भरून येणे शक्य नाही. राष्ट्रपुरुषांच्या कार्याचे व विचारांचे संवर्धन झाल्यास आपला समाज नजीकच्या काळात नक्कीच सुजलाम सुफलाम होईल. मुळातच राष्ट्रपुरुषांचे कार्य, त्यांचा जीवनपट आजही अनेकांना माहिती नसतो. केवळ तो कोणीतरी मोठा माणूस आहे आणि आपल्या समाजाचा आहे व अशा घटनांतून आपल्या समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा विचार डोक्यात ठेऊन समाज रस्त्यावर उतरतो. मुळातच राष्ट्रपुरुषांना विशिष्ट जातीधर्माच्या चौकटीत बंदिस्त करण्याचे पातक आम्ही करत आहोत.
नराधम एकदा कृत्य करतो; परंतु राष्ट्रपुरुषांना, त्यांच्या कार्याला, जीवनपटाला विशिष्ट जातीधर्माच्या चौकटीत बंदिस्त करण्याचे पातक आम्ही वर्षानुवर्षे करत आहोत. आम्हीही तितकेच दोषी आहोत. मुळात परभणीत घडलेली घटना ही पहिलीच नाही. महाराष्ट्रात नव्हे तर देशातही अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. ११ जुलै १९९७ रोजी मुंबईतील घाटकोपरमधील रमाबाई नगरामध्ये घटनाकारांच्या स्मारकाच्या झालेल्या विटंबनेची फार मोठी किंमत मुंबईला चुकवावी लागली आहे. अशा घटना घडणे निंदनीय आहे. अशा घटनांना पायबंद बसणे काळाची गरज आहे. घटना घडल्यावर उद्रेक न करता शांतपणे विचार करून संयम दाखविल्यास गुन्हेगारांना धडा शिकविणे सोप्पे जाते व समाजाचे नुकसानही टळते.