मुंबई : देशभरात सातत्याने महागाई (Inflation) वाढत चाललल्याचे चित्र दिसून येत आहे. खाद्य तेल, डाळी, भाजीपाला, फळे, साबण, पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदी अशा गरजेपयोगी वस्तूंसह प्रवासही महागला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची मोठी झळ बसत आहे. आता ही महागाई घर बांधकामावरही येत आहे.
काही महिन्यांपूर्वी सळईच्या दरात प्रति टन १५०० ते २००० रुपये वाढ झाली होती. त्यानंतर आता बांधकाम व्यवसायातील प्रमुख साधन सामग्री असलेल्या सिमेंटच्या दरातही वाढ झाल्याचे (Cement Price Hike) पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना घर खरेदी करणे किंवा घर बांधणे यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे.
Pune Crime : आठवीतील मुलीला चौथा महिना! आमिष दाखवून आरोपीचे १२ वर्षीय मुलीसोबत शारीरिक संबध
पाच महिने सिमेंटच्या किंमती स्थिर राहिल्यानंतर आता सिमेंटच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पावसाळी मोसमानंतर बांधकाम क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. तसेच मोठ्या पायाभूत प्रकल्पांमध्येही सिमेंटची मागणी कायम असल्याने या महिन्यात सिमेंटच्या किमतीत वाढ झाली.
काय आहेत सिमेंटचे दर?
- पश्चिम भारतात ५० किलो सिमेंटच्या पोत्याच्या किमतींमध्ये ५ ते १० रुपयांची वाढ झाली असून, सध्याच्या किमती ३५० ते ४०० रुपयांदरम्यान आहेत.
- उत्तर भारतात दिल्लीसह अनेक भागांमध्ये पोत्यामागे २० रुपयांनी वाढ झाली असून किमती ३४० ते ३९५ रुपयांदरम्यान आहेत.
- दक्षिण भारतातही पोत्यामागे ४० रुपयांपर्यंत किंमत वाढली आहे. त्यानुसार दक्षिण भारतात प्रति सिमेंट पोत्याचे दर ३२० रुपयांवर पोहोचले आहेत.
- पूर्व भारतातही सिमेंट बॅगची किंमत ३० रुपयांनी वाढली आहे.
दरम्यान, इनक्रेड इक्विटीजच्या अहवालातील अंदाजानुसार, २०२५च्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारचा भांडवली खर्च अजून वाढणार आहे, त्यामुळे सिमेंटच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पण वाढीव उत्पादन क्षमतेमुळे मोठ्या प्रमाणावर दरवाढ नको, अशी मागणी आताच उद्योगातून सुरू झाली आहे. (Cement Price Hike)