नवी दिल्ली: देशभरातली एकूण ९९४ संपत्तींवर वक्फने अवैधरित्या अतिक्रमण केले असल्याची माहिती सोमवारी केंद्र सरकारने संसदेत दिली. यामध्ये एकट्या तामिळनाडूमध्ये सर्वाधिक ७३४ अशा संपत्ती आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष(मार्क्सवादी)चे नेते जॉन ब्रिटास यांच्या प्रश्नावर उत्तर देताना अल्पसंख्याक मंत्रालयाने ही माहिती दिली. देशात वक्फच्या अधिनियमांतर्गत ८७२,३५२ स्थावर आणि १६,७१३ स्थावर नसलेल्या मालमत्ता नोंदणीकृत आहेत.
केंद्राने संसदेत दिली माहिती
अल्पसंख्यांक मंत्रालयाचे मंत्री किरेन रिजीजू यांनी एका प्रश्नावरील उत्तरादरम्यान सांगितले, माहितीनुसार ९९४ संपत्तींवर वक्फने अवैधरित्या ताबा घेतल्याची माहिती मिळाली आहे. देशभरातली एकूण ९९४ संपत्तींपैकी तामिळनाडूमध्ये सर्वाधिक ७३४ संपत्ती आहेत ज्यांच्यावर वक्फचा अवैधरित्या ताबा आहे. यानंतर आंध्र प्रदेशात १५२, पंजाबम्ध्ये ६३, उत्तराखंडमध्ये ११ आणि जम्मू-काश्मीरमध्ये १० अशा संपत्ती आहेत.
२०१९ नंतर वक्फला एकही जमीन मिळालेली नाही
केंद्रीय नागरी तसेच शहरी मंत्रालयाने सोमवारी राज्यसभेत सांगितले की केंद्र सरकारद्वारे २०१९ नंतर वक्फ बोर्डाला कोणतीही जमीन देण्यात आलेली नाही. २०१९ पासून आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारकडून वक्फ बोर्डाला दिलेल्या जमीनीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्रालयाने सांगितले की राज्य सरकारांनी दिलेल्या जमिनीबाबतचा कोणताही डेटा नाही आहे. दरम्यान, जोपर्यंत नागरी आणि शहरी बाबतीतील मंत्रालयाचा सवाल आहे तर २०१९ नंतर भारत सरकारकडून वक्फ बोर्डाला कोणतीही जमीन उपलब्ध करण्यात आलेली नाही.