Monday, February 17, 2025
HomeदेशMaharashtra CM : दिल्लीत ठरणार महाराष्ट्राचा कारभारी

Maharashtra CM : दिल्लीत ठरणार महाराष्ट्राचा कारभारी

अमित शहांसोबतच्या चर्चेनंतर होणार चित्र स्पष्ट

मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळाल्यानंतर महायुतीचा सरकार स्थापनेचा मुहूर्त अद्याप अनिश्चित होता. मात्र मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आज दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची रात्री उशिरा बैठक होत असून त्यात राज्य मंत्रिमंडळाचा चेहरा (Maharashtra CM) निश्चित करण्यात येईल आणि येत्या रविवारी नव्या सरकारचा शपथविधी होईल.

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचा निवडणूक निकाल लागून पाच दिवसांचा कालावधी लोटला तरी राज्यात सरकार अजून सत्तेवर आलेले नाही. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या पारड्यात भरभरुन दान केलेले असतानाही मुख्यमंत्री अद्यापि महायुतीकडून जाहीर झालेला नाही. मुख्यमंत्रीपदाचा तिढा दिल्लीतच सुटणार असून महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे दिल्लीला रवाना झाल्याने दिल्ली दरबारी महाराष्ट्राचा कारभारी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Vinod Tawde : विनोद तावडे ‘गेमचेंजर’! अमित शाहांसोबत रात्रीच्या बैठकीत नेमकी कोणती खलबतं झाली?

राजधानी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी गुरुवारी रात्री ९ नंतर दिल्लीत बैठक आहे. बैठकीत ठरेल पुढे काय करायचं. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र रात्री अमित शाह यांना भेटणार आहोत. महाराष्ट्रातील जबाबदारी कशी पार पाडायची त्यावर चर्चा होईल. मंत्रिमंडळ कसे असेल यावर चर्चा होईल. त्या चर्चेतून अंतिम स्वरूप येईल, अशी माहिती दिली. त्यातूनही महाराष्ट्राच्या कारभारी पदावर दिल्लीतच शिक्कामोर्तब होणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

‘काळजीवाहू’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा आदेश मान्य करायचे ठरवल्यानंतर मुख्यमंत्री भाजपाचा होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. परंतु मुख्यमंत्री कोण होणार? हे कोडे अजूनही सुटलेले नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विनोद तावडे यांना बुधवारी रात्री दिल्लीला आमंत्रित केले. अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यात मुख्यमंत्री पदावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष करून राज्यात मराठा आंदोलन पेटलेले असताना बिगर मराठा चेहरा मुख्यमंत्री पदी विराजमान केल्यास, त्याचा भाजपाला फायदा किंवा तोटा कशा पद्धतीनं होईल, यावर या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी रात्री भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेत त्यांच्यासोबत बैठक केली. अमित शहा यांनी विनोद तावडे यांच्याकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. एकीकडे राज्यात मराठा आंदोलन पेटलेले असताना दुसरीकडे मुख्यमंत्री पदावर राज्यात बिगर मराठा नेता विराजमान केल्यास त्याचा भाजपाला फायदा किंवा तोटा होऊ शकतो का? याबाबत चर्चा झाली.

भाजपा नेते व माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पक्षश्रेष्ठींच्या निर्णय प्रक्रियेवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, भाजप नेहमीच नवीन नेतृत्व शोधण्यावर भर देतो आणि त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवते. राजस्थान आणि मध्यप्रदेशसारख्या राज्यांमध्ये भाजपने नवीन प्रयोग राबवले. मात्र, महाराष्ट्रात असे प्रयोग होणार का, याबाबत मी काही सांगू शकत नाही. ते पुढे म्हणाले, निवडणूक निकालांवर सखोल चर्चा होत असून पक्षाच्या केंद्रीय समितीत विविध विषयांवर निर्णय घेतले जातात. आमचे नेते कोणाला मंत्रीपद द्यायचे, यावर योग्य वेळी निर्णय घेतील. चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर भाजपा नवीन चेहऱ्याचा शोध घेत असल्याची चर्चा नव्याने सुरु झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -