शिबानी जोशी
जेव्हा एखाद्या व्यक्तीचं अंतर्मन आणि बाह्य शरीर दोन्हीही स्वच्छ, निर्मळ आणि सुंदर असतं तेव्हा त्या व्यक्तीला आपण अंतर बाह्य बॅलन्स, संतुलित व्यक्ती असं म्हणतो. तसंच आपलं घर ही केवळ आतून रंगरंगोटी करून स्वच्छ, सुंदर नाही तर त्याचं बाह्यरूपही सुंदर आणि टिकाऊ असेल तर ते घर अधिक काळ टिकू शकतं आणि अंतरबाह्य सुंदरही दिसू शकत. घर, इमारती, मोठमोठे प्रकल्प अंतरबाह्य सुंदर, टिकाऊ करण्याच काम आनंद शेट्ये यांच्या रंगशलाका या कंपनीमार्फत मुंबईमध्ये गेले ३२ वर्षे सुरू आहे. पूर्वी आपल्याला घराला आतून रंगरंगोटी करायची असेल, तर आपण एखाद्या रंगाऱ्याला ऑर्डर देत असू. याच असंघटित व्यवसायाला थोड संघटित आणि व्यावसायिक रूप आणण्याचं काम आनंद शेट्ये यांनी केलं आहे. रंगशलाका या त्यांच्या कंपनी मार्फत कोणत्याही इमारतीचं आतून व बाहेरून रंगरंगोटी करणं, वॉटरप्रूफिंग करणं, स्ट्रक्चरल ऑडिट करणं, सौरऊर्जा प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्लंबिंग अशी सर्व कामे रंगशलाकामार्फत केली जातात.
आनंद शेट्ये यांनी सुरुवातीच्या काळात सिव्हिल इंजीनियरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर अनेक बिल्डर्सकडे काम केलं होतं. मुंबईतील बांधकाम व्यवसाय हा १९८० सालानंतर खूपच भरभराटीला आला. जागोजागी इमारती उभ्या राहू लागल्या होत्या. यात काम करत असताना यांच्या लक्षात आलं होतं की, इतक्या मोठ्या प्रमाणात नुसत्या इमारती बांधून चालणार नाही, तर त्यांचं रिपेरिंग, रखरखाव करण्यासाठी आणखी कोणत्यातरी वेगळ्या माणसांची गरज लागणार आहे. स्वतः उद्योजक व्हायचं असं ही त्यांचं स्वप्न होतं; परंतु स्वतः बिल्डर बनणं आर्थिकदृष्ट्या परवडणार नव्हतं. हीच अचूक संधी साधून आनंद शेट्सये यांनी स्वतःची रंगशलाका ही कंपनी १९९२ साली स्थापन केली. या उद्योगाला खूप मोठ्या भांडवलाची गरज नव्हती. सुरुवातीला आनंद शेट्ये यांनी घरातल्या अंतर्गत रंगकामापासून सुरुवात केली. त्याकाळी आपण एखाद्या रंगाऱ्याला ऑर्डर देत असू. अगदी बिल्डर्स सुद्धा रंगकामाला फारसं महत्त्व देत नसेत. इमारत तयार झाली की, चुना लावण्याचे काम बिल्डर करत असत. एका ग्राहकानं आमच्या घराला हा चुना नको, रंग हवा आहे अशी मागणी त्यांच्याकडे केली आणि त्यांनी त्या घराला पहिल्यांदा रंग लावून दिला, तिथून त्यांच्या कंपनीची सुरुवात झाली. अनुभव असल्यामुळे प्लंबिंग, सिव्हिल वर्कसह रंगकाम करून द्यायला त्यांनी सुरूवात केली. आज मुंबईतल्या अनेक मोठमोठ्या इमारतींवर रंगशलाका असा बॅनर आपल्याला दिसतो. जेव्हा एखादा उद्योजक सर्विस इंडस्ट्रीमध्ये काम करत असतो. तेव्हा त्याचा थेट ग्राहकांशी संबंध येत असतो आणि घर हे तर “अन्न, वस्त्र, निवारा”या आपल्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. त्याशिवाय घर हा प्रत्येक माणसाचा विक पॉइंट असतो. त्यामुळे ग्राहकाच्या मनासारखं घर करून देण खूप महत्त्वाचं असत. आपण दर्जेदार आणि चांगलं काम केलं की, माऊथ पब्लिसिटीनं आपल्याला ग्राहक मिळत जातात. कामात कसलंही कॉम्प्रोमाइज करत नाही आणि गुणवत्ता, वेळ पाळल्यामुळं एकाने दुसऱ्याला सांगूनच अनेक काम शेट्ये यांना मिळाली आहेत. अगदी रिपीट कस्टमर ही खूप आहेत. आमचा प्रत्येक ग्राहक हा आमचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे असं ते मानतात.
भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बांधकाम क्षेत्राचा १२ टक्के हिस्सा आहे. त्यातील पेंट इंडस्ट्रीमध्ये सध्याचा घडीला ६३ हजार कोटी रुपये रुपयांची उलाढाल होते. ही आकडेवारी केवळ पेंट निर्मितीची आहे. त्यानंतर पेंटशी निगडित व्यवसायाची उलाढाल काही लाख कोटींमध्ये जाते. त्यामुळे या उद्योगातील संधीविषयी बोलायचं झालं तर एक साधं उदाहरण ते देतात. आपल्या घराशेजारी एखादी दहा मजल्याची नवीन इमारत उभी राहत आहे. या ठिकाणी टूबीएचकेचे १०० फ्लॅट आहेत. मुंबईमध्ये अशा फ्लॅटला रंगाला अंदाजे एक लाख रुपये खर्च येतो. असे शंभर फ्लॅट म्हणजे एक कोटी रुपये आणि त्या इमारतीचा बाह्य रखरखाव एक कोटी रुपये असा सरळ सरळ दोन कोटी रुपयांचा बिझनेस एका इमारतीतून मिळू शकतो. आज मुंबई पुण्यामध्ये हजारो इमारती एकाच वेळेस उभ्या राहत आहेत. त्यामुळे या क्षेत्रामध्ये किती प्रकारच्या संधी आहेत, याचा अंदाज आपण लावू शकतो. अर्थात मोठमोठे टॉवर्स उभे राहत असल्यामुळे या उंच इमारतींना रंग लावणे, प्लंबिंग करणं हे खूपच रिस्क, कौशल्याचं काम आहे आणि या क्षेत्रात असे कुशल कामगार मिळणं हे सुद्धा एक आव्हान निर्माण झालं आहे. पण तंत्रज्ञानातही खूप मोठा फरक पडत आहे. पूर्वी बांबू लावून बाह्य काम केलं जायचं. आता क्रेन्स, लाईफ जॅकेट्स आहेत. ते अतिशय सुरक्षित असतात. त्यामुळे काम आव्हानात्मक असलं तरी तंत्रज्ञानाने त्याचं सुलभीकरण सुद्धा खूप केलं आहे असं शेट्ये सांगतात. अर्थात आपला प्रत्येक कामगार सुरक्षित असावा यासाठी कटाक्षाने बाजारात येणारी प्रत्येक अपग्रेड टेक्नॉलॉजी ते विकत घेतात. पूर्वीच्या रंगाऱ्याच्या जमान्यात हे क्षेत्र असंघटित होतं, आता ही या क्षेत्रात खूप सक्षम कायदे नाहीत; पण प्रत्येक उद्योजकानं आपल्या कामगारांच्या सुरक्षिततेची व्यवस्था निर्माण केली, तर काहीच प्रश्न निर्माण होत नाहीत असं शेट्ये यांनी सांगितलं. थोडक्यात कोणत्याही उद्योगात कालानुरूप बदल घडवत राहणं आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत राहणं हे गरजेचे आहे तरच आपण स्पर्धेत टिकू शकतो असे अनुभवाचे बोल शेट्ये मांडतात.
आत्तापर्यंत रंगशलाकातर्फे ८००० इमारती तसेच ३०० मोठ्या प्रकल्पांना रंगकाम करून देण्यात आले आहे. २०० कामगार आहेत. त्यामुळे शेट्ये यांचा आठ हजार ग्राहकांशी नक्कीच थेट संबंध आला. घर हा प्रत्येकाचा विक पॉइंट असतो. प्रत्येकाच्या बारीक सारीक अपेक्षाही असतात. त्याविषयीचे काही अनुभव आनंद शेट्ये यांनी सांगितले. ते म्हणाले की, धंद्यामध्ये उतार-चढाव असतातच नफा तोटा आहे पाहायला लागतो. एके ठिकाणी त्यांना तोटा सहज करावा लागला. त्यावेळी त्यांच्या ओळखीच्या एका गुजराती गृहस्थांनी सांगितलं की, या ठिकाणी तुझा सिंगल फायदा झाला. डबल फायदा झाला नाही, त्यांना आश्चर्य वाटलं सिंगल फायदा कसा झाला. त्यावर पक्का व्यापारी असलेला गुजराती गृहस्थ म्हणाला सिंगल फायदा म्हणजे अनुभव आणि डबल फायदा म्हणजे अनुभव आणि आर्थिक लाभ यातला तुला अनुभव मिळाला आहे. तूला या व्यवहारात काहीच मिळालं नाही असं समजू नकोस आणि त्या गुजरातीचा व्यापार आहे.
आनंद शेटे हे मुळचे तळ कोकणातले. तिथेही त्यांनी रोजगारनिर्मिती केलीय, त्याशिवाय आपल्या अनुभवातून इतरांना कन्सल्टंट म्हणून ते काम करत असतात. आपल्या अनुभवांवर त्यांनी “नसते उद्योग” नावाचं पुस्तकही लिहिले आहे. त्यामुळे लगेचच मी त्यांना प्रश्न केला की, सध्याची मराठी आव्हान स्वीकारणारी काही मराठी मुलं तरी उद्योग क्षेत्राची निवड करत आहेत. त्यांनी कोणता उद्योग सुरू करावा, भांडवल, विपणन कसे करावे याविषयी काय सल्ला द्याल? यावर ते म्हणाले की, या उद्योगात प्रचंड मोठ्या संधी उपलब्ध आहेत. २०३० पर्यंत जवळजवळ ६० कोटी जनता ही शहरी भागात राहणारी असेल आणि या लोकांच्या बांधकामाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भरपूर मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कारण नुसती इमारत किंवा घर बांधून चालत नाही, तर त्याचा मेंटेनन्स आहे दीर्घकालीन ठेवावा लागतो. आज त्यांच्याकडेही अनेक सिव्हिल इंजिनियर शिकायला येतात आणि अनुभव घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. भांडवलाबद्दल बोलायचं तर या क्षेत्रात अजून तरी खूप मोठं भांडवल लागत नाही. काही गोष्टी तुम्हाला भाड्यानेही मिळू शकतात, काही गोष्टी तुम्ही आऊट सोर्स करू शकता.
आणखी एक महत्त्वाचं म्हणजे एखाद्या क्षेत्रावर सातत्याने लक्ष केंद्रित करून काम करणं महत्त्वाचं आहे. थोडा काळ एक उद्योग, नंतर दुसरा उद्योग असं केलं तर आपण “जॅक ऑफ ऑल ट्रेन्स किंग ऑफ नन” होतो. मार्केटिंग आणि सेल्स संबंधी बोलायचं तर आमचं क्षेत्र म्हणजे रंगारी असा एक समज होता; पण त्याचं त्यांनी ब्रॅण्डिंग केलं. रंगशलाकाची ब्रोशर तयार केली आहेत. एकदा एका बिल्डरकडे गेलो असता त्याच्यासमोर मी माझं ब्रोशर ठेवलं, त्या बिल्डरला सुद्धा आश्चर्य वाटलं तो म्हणाला अरे एका पेंटिंग कॉन्ट्रॅक्टरचं ब्रोशर मी आज पहिल्यांदाच पाहतो आहे. आम्ही आकर्षक ब्रोशर तयार करतो; परंतु तुम्ही ब्रोशर तयार केलं आहे? त्यावर शेट्ये म्हणाले की, मी काय काय सेवा विकतो हे कळल पाहिजे, त्यामुळे धंद्यामध्ये व्यावसायिकता, दर्जा राखा असं ते सांगतात. शेट्ये यांचा व्यवसायच घराघरात रंग भरण्याचा आहे. त्यामुळे रंगतदार अनुभवानी त्यांचं कार्य व अनुभव विश्व भरून गेलं आहे.
joshishibani@yahoo. com