Monday, February 10, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखElection 2024: आज कौल जनतेचा...

Election 2024: आज कौल जनतेचा…

अभय गोखले

आजवरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात जास्त ७१ जागा मिळाल्या आहेत. याचा अर्थ महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागा लक्षात घेता (२८८) त्या जागांपैकी १/४ जागाही शरद पवार यांच्या पक्षाला कधी जिंकता आलेल्या नाहीत. त्याच्या तुलनेत पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी विधानसभेच्या एकूण २९४ जागांपैकी २००च्या वर जागा स्वबळावर आपल्या तृणमूल काँग्रेस या पक्षाला जिंकून दिल्या आहेत. ओडिशामध्ये नवीन पटनाईक यांनी तर विधानसभेच्या एकूण १४७ जागांपैकी १०० च्या वर जागा अनेकदा आपल्या पक्षाला जिंकून दिल्या आहेत. आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी, तेलंगणात के. चंद्रशेखर राव यांनी स्वबळावर आपल्या पक्षाला सत्ता मिळवून दिली आहे. त्या तुलनेत शरद पवार यांची आजवरची कामगिरी बघितली, तर शरद पवार यांना महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेता का म्हणतात याबद्दल कुणालाही आश्चर्य वाटेल.

शिवसेना उबाठाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेना उबाठाला मोठा पराभव पत्करावा लागला होता. या निवडणुकीत शिवसेना उबाठाला ४०च्या वर जागा मिळाल्या नाहीत तर, शिवसेना उबाठा समोर मोठे संकट उभे राहू शकेल. कोकणात आणि मुंबईमध्ये शिवसेना उबाठाने आपला जनाधार मोठ्या प्रमाणात गमावला आहे, ही गोष्ट लोकसभा निवडणुकीत पुरेशी सिद्ध झाली आहे. त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत झाल्यास शिवसेना उबाठाला कमी जागा मिळतील आणि महाविकास आघाडीत ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले जातील. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी जर सत्तेवर आली तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्या तर ओघानेच त्यांचा मुख्यमंत्री होईल.

निवडणुका संंपल्या; आता विकासावर बोला!

एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट हा लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठापेक्षा चांगला होता. जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत शिवसेना उबाठापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. सर्वच एक्झिट पोल्सनी भाजपा पहिल्या क्रमांकावर राहील, असा अंदाज वर्तवला आहे. आता भाजपा शंभरी पार करणार का ते पाहावे लागेल. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाल्याने काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने, त्यांचा किती फटका काँग्रेसला बसेल ते पाहावे लागेल. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करण्यात आला, ही गोष्ट लपून राहिलेली नाही. त्याचे नुकसान आघाडीतील सर्वच घटक पक्षांना सोसावे लागेल. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला कुणीच गंभीरपणे घेतलेले नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे सुनील तटकरे हे निवडून आल्याने त्यांच्या पक्षाची लाज शाबूत राहिली. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे २० उमेदवार निवडून आले, तर त्यांनी खूप काही कमावले असे म्हणावे लागेल. जे उमेदवार निवडून येतील ते स्वतःच्या ताकदीवर विजयी होतील, अशी शक्यता दिसून येत आहे.

शेवटी मतदार हा राजा आहे. कोणी कितीही अंदाज वर्तवले तरी, मतदारांच्या मनात काय आहे, या गोष्टीला सर्वात जास्त महत्त्व आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरयाणा या राज्यात एक्झिट पोल्सचे अंदाज मतदारांनी खोटे ठरवले होते. १९७७ साली आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लोकसभा निवडणुकांत मतदारांनी काँग्रेसला चांगलाच धडा शिकवला होता. उत्तर भारतात काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. इतकेच नव्हे तर इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांना त्या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा मतदार हुशार आहे, कुणाचा केव्हा करेक्ट कार्यक्रम करायचा हे मतदाराला चांगलेच ठाऊक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -