कोकणात तर निवडणूक जाहीर कधी झाली आणि मतदान कधी झाले तेच कळले नाही, अशा वातावरणातही निवडणूक पार पडली आहे. उर्वरित महाराष्ट्रात निवडणुकीत अनेक बऱ्या-वाईट घटना घडल्या असल्या तरीही आपल्या कोकणात अत्यंत शांततेच्या आणि सलोक्याच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. कोकणातील उमेदवारांचे भवितव्य मतांच्या रूपाने ईव्हीएम मशीनमध्ये लॉक करण्यात आलेे. त्यामुळे आता कोकणातील विकासावर बोला, असा आवाजही काहीसा ऐकू येत आहे.
माझे कोकण – संतोष वायंगणकर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी कालच म्हणजे २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका कशा पद्धतीने पार पडल्या हे महाराष्ट्रातील जनतेने अनुभवले आहे. महाराष्ट्र राज्य विकासाच्या बाबतीत पुढे कसे नेता येईल यावर राज्यातील अशा महत्त्वपूर्ण असणाऱ्या निवडणुकीत चर्चा होणे अपेक्षित होते; परंतु निवडणुकीतील उमेदवारांनी आपण आजवर विकासकामांमध्ये योगदान काय दिलंय आपण कोणत्या पद्धतीने आपल्या भागाचा, मतदारसंघाचा विकास करणार आहोत याविषयी जनतेसमोर मांडणे हे अपेक्षित होते; परंतु विकास प्रक्रियेवर काहीही न बोलता विरोधी पक्षांकडून, विरोधी नेत्यांकडून वैयक्तिक स्वरूपाची टीका करण्यात आली.
या निवडणुकीत कोकणातील वातावरण हे अतिशय छान होते. मात्र शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख, उबाठाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे, शरद कोळी, शिवसेना उबाठाचे युवानेता आदित्य ठाकरे यांची भाषणे ही पातळी सोडून झाली. या निवडणुकीत राणेंवर वैयक्तिक टीका करण्यात आली. खालच्या पातळीवर टीका करायची आणि समोरच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची माथी भडकवायची जेणेकरून वातावरण कशारितीने बिघडविता येईल, असा प्रयत्न शिवसेना उबाठाकडून सतत करण्यात आला; परंतु अॅक्शनला रिअॅक्शन न देता त्याला संयमीत राहण्याने आपोआपच चोख उत्तर उबाठा सेनेला मिळाले. यामुळे शिवसेना उबाठा गटाच्या हाती काहीच लागले नाही.निवडणुकीत सगळी चर्चा आणि भाषणे ही महायुतीकडून विकासावरच होत राहिली. भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघाच्या विकासाचा प्लॅनच जनतेसमोर मांडला. मालवण शहरातील अरूंद रस्ते, तिथली भौगोलिक स्थिती या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांनी यूटुबर्सना दिलेल्या मुलाखतीतून मालवण शहराला रिंग रोडणे कशा पद्धतीने जोडले जाऊ शकते, वाहतूक कोंडीचे प्रश्न कसे निकाली निघू शकतात याचा खास प्लॅन सांगितला गेला. कोकणातील विकासाच्या बाबतीत अशा पद्धतीने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून विकासाचा मॅप सादर केला गेला पाहिजे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ मतदारसंघ आहेत. या आठही विधानसभा मतदारसंघात या अशा पद्धतीने त्या-त्या मतदारसंघातील जनतेसमोर विकास प्रक्रियेची मांडणी आवश्यक होती. सत्ताधारी भाजपा महायुती उमेदवारांकडून ते सादर करण्यात आले. नोव्हेंबर २०२४ मधील या विधानसभा निवडणुकीने अनेकार्थाने एक आगळ्या-वेगळ्या पद्धतीने निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. या निवडणुकीत जाहीर प्रचार सभांचे प्रमाण कमी होऊन थेट जनतेशी संवाद साधत प्रचार करण्यावर भर देण्यात आला आहे. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उबाठा गट आणि भाजपा, शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा महायुती आघाडीतील घटक पक्ष यांच्यातील ही
निवडणूक आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेनेतील पक्ष संघटना फुटीनंतरची महाराष्ट्रातील राजसत्ता कोणाच्या हाती सोपवावी त्याचा निर्णय करणारी तसेच या निवडणूक निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीतील वर्चस्व ठरवणारी ही निवडणूक आहे. पक्षीय वर्चस्व आणि महत्त्वपूर्ण स्थान ठरवणारी ही निवडणूक आहे. कोणत्याही पक्षाने, नेत्याने, गाव पुढाऱ्यांनी गावाला आणि ग्रामस्थांना गृहीत न धरता गावातील प्रत्येक ग्रामस्थ मतदार हा तितकाच महत्त्वाचा आहे. हे दर्शवणारी ही निवडणूक आहे. महाराष्ट्रातील पत्रकार, राजकारणी, समाजकारणी अशा राज्यातील सर्वच घटकांना नवीन काही शिकवणारी अशी ही निवडणूक आहे. एकीकडे विविध राजकीय पक्षाचे स्थान निश्चित होत असताना निवडणुकीत निवडणूक लढविणारे उमेदवार निवडून आल्यानंतर पुढील पाच वर्षांत आपल्या भागासाठी खरोखरीच काही करू शकतील का? याचा विचारही आता मतदार करू लागले आहेत. केवळ मतदारांशी गोड बोलून, भेटत राहूनही चालत नाही. जनतेला विकास दाखवावा लागतो. जनतेला विकासकाम काय केले हे सांगावे लागते. जनतेचाही त्यावर विश्वास बसावा लागतो. याचे कारण फेख नॅरेटीव पसरवण्यासाठी समाजमाध्यमांवर काही टीम कार्यरत असतात. हा अनुभवही गेल्या वर्षभरातील निवडणुकांनी दाखवून दिला आहे. यामुळे यावेळची ही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच अनेक गोष्टींचे धडे देणारी आहे. कोकणातील ही निवडणूक एकीकडे सतत कोसळत राहणारा पाऊस मागील आठवडाभर कोकणातील हा पाऊस थोडाफार कमी झाला आहे. या अशा पावसाळी वातावरणात निवडणूक पार पडली. दिवाळीच्या सणामध्येच निवडणुकीची आचारसंहिता आणि उत्साहाचे वातावरण याच उत्साही वातावरणात निवडणूक पार पडली आहे. कोकणात तर निवडणूक जाहीर कधी झाली आणि मतदान कधी झाले तेच कळले नाही, अशा वातावरणात ही निवडणूक पार पडली आहे. उर्वरित महाराष्ट्रात निवडणुकीत अनेक बऱ्या-वाईट घटना घडल्या असल्या तरीही आपल्या कोकणात अत्यंत शांततेच्या आणि सलोक्याच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग या कोकणातील निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य मतांच्या रूपाने ईव्हीएम मशीनमध्ये लॉक करण्यात आले आहे. २३ नोव्हेंबर शनिवारी निवडणूक निकालाने महाराष्ट्रात सत्ता कोणाची येईल हे निश्चित होईल.