महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेसाठी ६५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. मतदान संपल्याबरोबर विविध वाहिन्यांचे, वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोलचे सर्व्हे जाहीर होण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्याची विधानसभेची लढत प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि महायुतीतच झाली. बसपा, सपा, मनसे, बच्चू कडूंचा प्रहार, स्वाभिमानी, स्वराज्य, वंचित बहुजन आघाडी अशा विविध लहान-मोठ्या पक्षांनीदेखील निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. सध्याचे राजकीय वातावरण पाहता कोणत्याही एका पक्षाला लोकसभा निवडणुकीत अथवा त्या त्या राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळविणे अवघड आहे. त्यामुळे युती, आघाड्या करून सत्ता मिळविणे अथवा सत्तेच्या जवळपास जाणे शक्य होत असते.
महाराष्ट्रातही महायुतीमध्ये भाजपा, शिंदे गटाची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांचा समावेश आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना या तीन पक्षांचा समावेश आहे. महाविकास आघाडी व महायुतीमध्ये अन्य लहान-मोठ्या सहयोगी पक्षांचा समावेश आहे. एक्झिट पोलच्या सर्व्हेमध्ये राज्यामध्ये पुन्हा महायुती सत्तेवर येणार असल्याचा दावा केला जात आहे. एक- दोन सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नक्की सत्ता कोणाची येणार, कोणाचे किती आमदार निवडून येणार, हे शनिवारीच स्पष्ट होणार. एक्झिट पोलचा सर्व्हे म्हणजे निवडणूक निकाल नव्हे, तो एक अंदाज असतो. अनेकदा सर्व्हे खरे, तर अनेकदा खोटेही ठरतात. मागे झालेल्या जम्मू-काश्मीर व हरियाणाच्या निवडणुकीमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाची तर हरियाणामध्ये काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा दावा एक्झिट पोलने केला होता. मात्र निवडणूक निकाल लागल्यावर सर्व्हे खोटे असल्याचे उघड झाले. हरियाणामध्ये भाजपाची सत्ता आली, तर जम्मू-काश्मीरची सत्ता भाजपाला मिळाली नाही. त्यामुळे सर्व्हेचे अंदाज काहीही सांगत असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती शनिवारी स्पष्ट होणार.
मागील विधानसभा निवडणूक निकालानंतर घडलेल्या राजकीय घडामोडी पाहता महाविकास आघाडीतील एक घटक आणि महायुतीमधील एक घटक एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची शक्यताही राजकीय क्षेत्रांत व्यक्त केली जात आहे. कोणाचे किती आमदार जास्त निवडून येतात आणि मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी कोण किती महत्त्वाकांक्षी आहे, यावरही सत्तेची समीकरणे बदलू शकतात. निवडणुका लढेपर्यंत एकत्र असणारे पक्ष मतमोजणीनंतर सत्तासंपादन करताना एकत्र असतीलच याची कोणी खात्री देऊ शकत नाही. मागील सभागृहाने तीन राज्य सरकारे पाहिली आहेत. त्यामुळे आज आपल्यासोबत असणारा उद्या असेलच याची खात्री देता येत नाही. २०१९ सालची निवडणूक भाजपा आणि तत्कालीन एकसंध शिवसेनेने एकत्र लढविली. काँग्रेस-राष्ट्रवादीने निवडणूक एकत्रित लढविली; परंतु निकाल लागताच शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा दावा केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या देवेंद्र फडणवीसांसोबत सत्तेमध्ये सहभागी झाली. त्यानंतर शरद पवारांनी अशा सरकारविषयी नाराजी व्यक्त करताच अजित पवार बॅकफूटवर आले. त्यानंतर शिवसेनेने सत्तेसाठी व मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाची साथ सोडत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची संगत धरत महाविकास आघाडीची सत्ता आली. पुढे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड करत सत्तेतून बाहेर आले. यावेळी अपक्ष १० आमदारांनीही त्यांना साथ दिली. त्यामुळे शिंदे-फडणवीसांचे सरकार सत्तेवर आले.
मागील पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रीय जनतेने तीन सरकारे पाहिली. तीन सरकारमध्ये काही मंत्र्यांचे चेहरे मात्र कायम राहिल्याने सरकारे याच लोकांसाठी बदलली आहेत काय, असा उपहासात्मक प्रश्नही राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. एक्झिट पोलने महायुतीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचे आणि महाविकास आघाडीला सत्ता मिळणार नसल्याचे संकेत देऊनही महायुतीकडून जल्लोष साजरा केला जात नाही आणि महाआघाडीकडे निराशा पसरलेली नाही. जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांबाबतच्या एक्झिट पोलच्या सर्व्हेबाबत उलटेच फासे पडल्याने महाविकास आघाडी व महायुती सर्वेच्या अंदाजाकडे फारशा गांभीर्याने पाहत नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्गाचे मतदान महायुतीलाच झाले असल्याचे महायुतीकडून सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षांनी दिलेले उमेदवारही महत्त्वाचे असतात. अलीकडच्या काळात पक्षाला पाहून मतदान करण्याचे दिवस इतिहासजमा झाले. त्यामुळे चांगले उमेदवार देणे, हा त्या पक्षांसाठी मतदारसंघामध्ये जमेची बाजू
ठरणार आहे.
बुधवारी मतदान संपले. शनिवारी मतमोजणी होणार आहे. उमेदवारांनी मतदारसंघामध्ये २० ते २२ दिवस जंग जंग पछाडले होते. मतदारसंघातल्या प्रत्येक मतदारांशी संपर्क व सुसंवाद साधण्यासाठी जीवाचे रान केले होते. मात्र मतदान संपताच अवघ्या काही मिनिटांमध्ये एक्झिट पोलचे निकाल जाहीर होत असतात. पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मतदान संपल्यावर अंदाज बांधण्यासाठी एक-दोन तासांचा कालावधी जातो. मतदारसंघातील प्रत्येक यादीचा अंदाज घेऊन निकालाबाबतचा संभाव्य अंदाज बांधला जातो. ज्यांनी मतदान प्रक्रिया राबविताना मतदारांशी संपर्क केला, त्यांना काही अवधी लागतो. मात्र निवडणूक निकालाबाबत सर्व्हे जाहीर करणारे घटक मात्र अवघ्या काही सेकदांमध्ये कसा अंदाज व्यक्त करू शकतात? याबाबत गौडबंगाल कायम आहे. मतदान झाले आणि सआता निकाल येणे बाकी असल्याने निवडणूक लढविणारे घटक व त्यांचे कार्यकर्ते ‘गॅस’वर आहेत. निकाल जाहीर होण्यास अजून काही तासांचा कालावधी असला तरी निकालाबाबत सर्वांना कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. त्यातच बहुमतापासून काही पावलांवर समीकरणे अडखळल्याने सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची रसद आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे निवडून येण्याची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधण्यास महाविकास आघाडीच्या तसेच महायुतीच्या घटकांनी सुरुवात केली आहे. निवडणूक निकाल लागण्यापूर्वी मतदारसंघातील आघाडीवरूनच सत्ता संपादनाचा कल स्पष्ट होणार आहे. सत्तेबाबत महाविकास आघाडी व महायुती दोघेही आशावादी आहेत. अपक्षांच्या पाठिंब्याची गरज लागल्यास त्यांचीही दोन्ही घटकांना मनधरणी करावी लागणार आहे.