Tuesday, February 11, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीसंकुचित मनोवृत्तीपासून मुक्ती

संकुचित मनोवृत्तीपासून मुक्ती

जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै

आम्ही जेव्हा समाजात प्रबोधन करायला जातो तेव्हा असे जाणवते की लोकांचे मन, मेंदू खूप संकुचित झालेला आहे. धर्म, जात, पंथ, संप्रदाय, घराणे या सर्वांमुळे मन इतके संकुचित झाले. वृत्ती संकुचित झाली आणि त्याचा परिणाम भांडण तंटेबखेडे अधिक झाले. युद्धलढाया अधिक वाढल्या म्हणून जीवनविद्येने यावर विचार केला. यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. यावर तोडगा काढला नाही. तर हे जग असेच चालत राहणार. आम्ही जे सांगतो ते लोकांना चटकन पटतेच असे नाही. याचे कारण लोकांचे मन, बुद्धी मघाशी म्हटल्याप्रमाणे अनेक गोष्टींत गुंतलेले आहे.

पूर्वीच्या काळी तर काय द्वैत-अद्वैत, विशिष्ट अद्वैत, द्वैताद्वैत, शुद्ध-द्वैत, शुद्ध-अद्वैत अशा अनेक गोष्टींत गुंतलेले होते आणि अजूनही आहेत. हे मी का सांगतो आहे. परमेश्वर या विषयाचा जसा आपण विचार केला पाहिजे तसा तो केला गेलेला नाही. जीवनविद्येने हा विचार केला. जीवनविद्या काय सांगते आपण समजतो. तो परमेश्वर व खरा परमेश्वर यात जमीन अस्मानाइतके अंतर आहे. आज लोक परमेश्वर म्हटल्यावर मूर्तीकडे जातात.

आपल्या डोळ्यांसमोर निरनिराळे देव येतात आणि जे मूर्तिपूजा मानत नाहीत. त्यांच्या डोळ्यांसमोर काहीच येत नाही. ते काहीतरी कल्पना करतात की कुठे तरी देव आहे व त्याला काहीतरी ते नाव देतात म्हणजे शेवटी ते कल्पनाच करतात. परमेश्वराबद्दल जोपर्यंत ज्ञान मिळत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती अशीच चिघळत जाणार. सुधारणार तर नाहीच, उलट
चिघळत जाणार. यासाठी जीवनविद्येने तोडगा काढला.

जीवनविद्या काय सांगते की परमेश्वर हा आपल्या जीवनाचे मूळ आहे आणि परमेश्वर हा आपल्या जीवनाचे फळही आहे. परमेश्वर हा आपल्या जीवनाचा पाया आहे आणि परमेश्वर हा आपल्या जीवनाचा कळसही आहे. याकडे जर आपण दुर्लक्ष केले तर कुटुंब काय, जग काय, विश्व काय, कुणीच सुखी होणार नाही. कितीही अवतार आले, कितीही संत आले, कितीही प्रेषित आले, कितीही संप्रदाय आले तरी हे जग असेच चालणार. जीवनविद्या परमेश्वराबद्दल सांगते की, परमेश्वर हा आपल्या जीवनांत अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून, आपण परमेश्वराबद्दल आतापर्यंत ज्या कल्पना केलेल्या आहेत त्या बदलल्या पाहिजेत. आज कुणीही या कल्पना बदलायला तयार होत नाही. आज अशी अवस्था आहे की कुणीही या कल्पना मनातून काढून टाकायला तयार नाही. आम्ही असे म्हणतो की, पहिल्या त्या चुकीच्या कल्पना मनातून काढून टाका आणि मग तुम्ही परमेश्वराबद्दल विचार केला तर निश्चित काय ते कळेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -