पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईसह संभाजी नगर, पनवेल आणि नवी मुंबईत आपल्या प्रचारसभा घेतल्या. आपल्या भाषणात मोदी यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार तोफा डागल्या. ते साहजिकच होते कारण याच दोन पक्षांनी भाजपाला फेक नरेटिव्ह सेट करून काही अंशी लोकसभा निवडणुकीत मात दिली होती. त्यामुळे मोदी यांनी आपल्या सभांमध्ये काँग्रेसलाच लक्ष्य केले आणि त्याचे कारणही असेच होते की, काँग्रेसच्या फेक नरेटिव्हमुळेच भाजपाचा पराभव झाला नाही तरीही त्यांना अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या. काँग्रेसवर जोरदार टीका करताना मोदी म्हणाले की, काँग्रेस व्होट बँक पॉलिटिक्समध्ये उत्कृष्ट आहे पण गरिबांचा शत्रू म्हणून कायम राहिला आहे. मोदी यांनी काँग्रेसच्या काळात दिलेल्या गरिबी हटावच्या घोषणा दिल्या होत्या, याचा संदर्भ देऊन सांगितले की, काँग्रेसने इतकी वर्षे ही घोषणा दिली पण गरिबी कमी झालीच नाही. पनवेलमध्ये बोलताना मोदी यांनी काँग्रेसवर गरिबांचे शोषण केल्याचा आरोप केला पण काँग्रेसने आपली चुकीची घोषणा दिली की गरिबी हटाव. पण यामुळे गरीबच हटले पण देशात गरिबी तशीच राहिली.
काँग्रेसने गरिबांच्या नावाखाली गरिबांना शोषित ठेवले आहे, असा आरोप मोदी यांनी केला. आता एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी उरला असताना मोदी यांनी काल छत्रपती संभाजीनगर, पनवेल आणि नवी मुंबई येथे अनेक प्रचार सभा घेतल्या. मोदी यांची ही सभा भाजपाची लोकप्रियता दाखवून देणारी होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आता महायुती आणि महाविकास आघाडी दोन आघाड्यांतच होणार आहे हे स्पष्ट झाले आहे. शिवाजी पार्क येथे मोदी यांच्या सभेला जोरदार गर्दी होईल, असा अंदाज होता आणि त्याप्रमाणेच घडले. अपेक्षेप्रमाणे सभेला प्रचंड गर्दी झाली आणि त्यात मोदी यांनी उबाठा यांच्यावर प्रचंड टीका केली. मुंबई पोलिसांनी असंख्य बंधने लोकांवर लादली होती आणि ती बंधने झुगारूनही लोक प्रचंड संख्येने सभेसाठी आले. यातच मोदी यांच्या सभेचे यश दिसून येते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सभेला उपस्थित होते, पण अजित पवार आणि त्यांच्या गटातील काही कार्यकर्ते या सभेला नव्हते. त्यावरून लोकांमध्ये प्रचंड चर्चा होत होती. मुंबईच्या सभेत मोदी यांनी उद्धव यांना टोला लगावला की, त्यांनी आपल्या पक्षाचा रिमोट कंट्रोल काँग्रेसकडे दिला आणि त्याचा गैरफायदा काँग्रेसने घेतला.
मुंबई हे आत्मसन्मानाचे शहर आहे पण एकाच शहराचा रिमोट कंट्रोल काँग्रेसकडे देण्यात आला. या मोदी यांच्या विधानाने उपस्थितांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. कारण उबाठा यांनी मुख्यमंत्री असतानाही शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो असे सांगून स्वतःच मुख्यमंत्री बनले याची सल प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याच्या मनात आहे हे मोदी यांच्या भाषणावरून दिसले. मोदी यांची ही महाराष्ट्रातील मुंबईची अखेरची सभा होती. त्यावरून त्यानी सर्व भात्यातील बाण काढले हे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आणि त्याला उत्तर द्यायला विरोधकांकडे काहीच नव्हते. पंतप्रधान म्हणाले की, विरोधक सावरकरांचा अपमान करतात आणि आंबेडकरांना विरोध करतात आणि त्यांनी लिहिलेले संविधान लागू करण्यास विरोध करतात आणि काश्मीरमध्ये ३७०साठी प्रस्ताव ठेवतात. विरोधकांच्या कृत्याचा पाढा वाचून मोदी म्हणाले की, काँग्रेस देशाप्रती कर्तव्य विसरून गेला आहे. मुंबईच्या विविध विकासकामांविषयी ही त्यांनी माहिती दिली. त्यावेळी त्यांनी उबाठा सरकारवर जोरदार टीका केली. मोदी यांच्या सभेत लोकांना जिंकून घेण्याची ताकद होती. त्यामुळे त्यांनी अशी नावे घेतली की, आजही महाराष्ट्रीयांना ती पूजनीय वाटतात. त्यांचे नाव लहुजी वस्ताद आणि सिद्धिविनायक. दुसरीकडे मविआवर प्रखर टीका करताना मोदी म्हणाले की, त्यांचे सरकार असताना अनेक प्रकल्प अडवून ठेवले होते. काँग्रेसच्या शहजाद्यांकडून ठाकरे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढायला सांगा.
हिंदुहृदयसम्राट असे म्हणायला लावा. ते म्हणू शकणार नाहीत अशी मोदी यांनी टीका केली. मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. त्याचीही आठवण मोदी यांनी करून दिली. मोदी यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद होता आणि त्याचीच धडकी विरोधकांच्या उरात भरली असेल. कारण मोदी यांची ही शेवटचीच प्रचारसभा होती. मोदी यांच्या सभांमध्ये जसे संवादात्मक विचार माडले जातात तसेच कालही होते. त्यामुळे लोक त्यांच्या सभांमध्ये तल्लीन होऊन गेलेले दिसले. मोदी यांच्या सभांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आणि त्या तुलनेत ठाकरे यांच्या सभांना फारच कमी प्रतिसाद मिळत आहे हेही वास्तव आहे आणि ते स्वीकारायला हवे. मोदी यांनी लोकांना अनेक बाबींनी आपले म्हणणे पटवून दिले आणि ते लोकांना पटलेही असे दिसत होते. त्यांच्या सभांनी महायुतीत चैतन्य निर्माण झाले आहे, हे मात्र निश्चित.