भारताचे नवीन न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. न्या. संजीव खन्ना यांनी (दि.११ नोव्हेंबर) भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्या. खन्ना यांना सहा महिने आणि एक दिवस इतका कालावधी मिळणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजे २०२५ साली १३ मे रोजी ते निवृत्त होतील. त्यांनी नुकतीच राष्ट्रपतींच्या समोर शपथ घेतली आहे. नव्या न्यायमूर्तींविषयी खूप अपेक्षा आहेत. मावळते न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्याविषयी लोकांकडून काही टिपण्या येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नव्या न्यायमूर्तींकडून काही अपेक्षा असणे गैर नाही. चंद्रचूड यांना मोठा कालावधी मिळाला होता. दोन वर्षांपेक्षा अधिक काळ ते या पदावर होते. गेल्या काही वर्षांमध्ये एवढा मोठा कालावधी कोणालाही मिळाला नव्हता तो त्यांना मिळाला. काही वादग्रस्त निर्णयही त्यांनी दिले आहेत. तारतम्य असलेले न्यायाधीश अशीच प्रतिमा त्यांची होती आणि त्या लौकिकाला साजेसा कारभार त्यांनी केला असे म्हणायला हरकत नाही. पण तरीही त्यांचे काही निर्णय वादग्रस्त ठरले यात काही शंका नाही. अलीकडच्या एका भाषणात त्यांनी आपण न्यायमूर्ती म्हणून काही निर्णय देत असतो पण लोकांना तो न्याय नको असतो असे त्यांनी म्हटले होते. लोक त्या न्यायदानावर टीका करण्याची शक्यता असते. वास्तविक शंभर टक्के न्याय मिळेल असे कधीच नसते. उलट न्यायपालिकेत जो मिळतो त्याला न्याय असे म्हटले जाते असे एक प्रसिद्ध वचन आहे. त्यामुळे न्यायमूर्तींनी आपल्याला सर्वांनी चांगले म्हणावे अशी अपेक्षा करणे सर्वस्वी चूक आहे. प्रत्येक न्यायाधीशाला िटका सहन करावी लागते. आपल्या समोरच्या पुस्तकातून न्याय दिला, तर त्यावर टीका होणारच हे गृहीत धरलेले असते. न्या. चंद्रचूड यांच्याशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निकाल दिले गेले. त्यांचाही उल्लेख त्यांनी केला आहे. त्यात एका खटल्याचा संबंध रामजन्मभूमी खटल्याच्या निकालाशी होता. परमेश्वराने सुचवलेल्या बुद्धीनुसार आपण निर्णय दिला असे चंद्रचूड यांनी म्हटले आहे. तसे आता संजीव खन्ना यांनी त्याच मार्गाने वाटचाल करायला हवी अशी अपेक्षा बाळगणे वावगे नाही.
संजीव खन्ना यांच्याकडून लहान कालखंडात मोठ्या अपेक्षा बाळगणे फार होईल. चंद्रचूड यांच्यानंतर संजीव खन्ना सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून असलेल्या लहानशा कालखंडात फार मोठ्या अपेक्षा न बाळगताही असे म्हणता येईल की, त्यांच्याकडून फार नसले तरीही त्यांनी दिलेले काम चांगल्या प्रकारे पार पाडावे. मुळात न्यायदान हे फार महाग झाले आहे. त्याकडे न्यायमूर्तींनी दुर्लक्ष करू नये. ही सर्वसामान्यांची रास्त अपेक्षा झाली. आपल्या देशातील सर्वांसाठी सारखा असलेला न्याय हा फार महाग आहे. न्यायासाठी काही जणांनी आत्महत्या केल्या आहेत. कारण वकिलांची फी परवडत नाही म्हणून इतक्या क्षुल्लक कारणावरून लोकांनी आपले जीवन संपवले आहे, त्याकडे न्या. खन्ना यांनी लक्ष दिले तर बरे होईल. लाखो रुपये वकिलाची फी देऊन धनाढ्यांना आपल्याकडे न्याय मिळाल्याची उदाहरणे आहेत. पण कित्येक लोक वकिलांची फी देणे परवडत नाही म्हणून न्याय नाकारल्याची उदाहरणेही आहेत.
ज्या इसमाला वकिलांची फौज उभी करणे परवडत नाही त्याला न्याय मिळूच शकत नाही, अशी परिस्थिती आपल्याकडे आहे. ती बदलली पाहिजे. या बाबतीत सरन्यायाधीश न्या. खन्ना काही ठोस पावले उचलणार असतील तर त्यांचे नाव न्यायपालिकेच्या इतिहास अजरामर होईलच पण गरीब लोक त्यांना दुवेही देतील. केवळ आर्थिक कुवत नसल्यामुळे हजारो लोक न्यायापासून वंचित आहेत. त्यांचे कितीतरी आशीर्वाद खन्ना यांच्यामागे असतील. न्यायदानाच्या क्षेत्रातील एक नेहमीच चर्चेला येणारा विषय म्हणजे देर है मगर अंधेर नही. भारतातील न्यायव्यवस्था ही वेळखाऊ आहे. कितीतरी खटले असे आहेत की, ज्यांचा निकाल बापाच्या हयातीत लागला नाही तर पोराच्या हयातीत त्याला न्याय मिळालाय अशीही स्थिती आहे. विविध वरिष्ठ न्यायालयांमध्ये शेकडो खटले अजूनही प्रलंबित आहेत आणि त्यांच्यामुळे भारतीय न्यायव्यवस्था बदनाम झाली आहे. या हजारो खटल्यांचा निपटारा कसा करावा या विवंचनेत प्रत्येकजण असला तरीही सर्वोच्च न्यायालय हतबल आहे. त्याला काही उपाय सापडत नाही. न्यायमूर्ती पी. एन. भगवती यांनी लोकन्यायालयांची संकल्पना राबवली. खन्ना यांच्याकडेही असेच काही उपाय असतील तर त्यांनी ती राबवावी. यामुळे भविष्यात खटले जलदगतीने निकालात निघून लोक न्यायालयास धन्यवाद देतील.
न्या. खन्ना यांच्यासमोरचे हे एक मोठे आव्हान आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जो काही निकाल देतात त्यावर चर्चा होऊ शकते. पण त्यावर शंका घेता येत नाही. त्यांच्या हेतूवर शंका घेता येत नाही. ही स्थिती लक्षात ठेवूनच न्या. खन्ना यांनी न्यायदानाच्या क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करता येतील अशा पद्धतीने निकाल आणि तेही झटपट दिले तर त्यांचे नाव तर होईलच. पण त्यांचा लौकिकही वाढेल. पण तसे करताना सरकारच्या कार्यक्षेत्रात अकारण हस्तक्षेप केला जाणार नाही, याची ही खबरदारी त्यांना घ्यावी लागेल. कारण मग पुन्हा राजकीय वादात पडण्याचे कारण उरणार नाही. संजीव खन्ना यांना थोडा काळ मिळाला आहे पण त्यांनी आपल्या थोड्या काळात आदर्श प्रस्थापित करावा हेच त्यांच्या कार्याचे अनमोल योगदान ठरेल. संजीव खन्ना हे आदर्श न्यायमूर्ती होतील यात काही शंका नाही. त्यांनी वाद टाळावेत आणि त्यांनी आपल्या कायक्षेत्रात जे येतील त्यावर कायद्यानुसार निकाल द्यावेत, ही अपेक्षा बाळगता येईल.