दिल्ली: राजधानी दिल्ली आणि सभोवतालच्या परिसरात वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने आज, शुक्रवारपासून प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर केलीय. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी गुरुवारी रात्री ट्विटरवर (एक्स) यासंदर्भात पोस्ट केली होती. आपल्यासंदेशात मुख्यमंत्री म्हणाल्या की, वाढत्या वायू प्रदूषणाची समस्या पाहता पुढच्या
आदेशापर्यंत दिल्लीतील इयत्ता पाचवीपर्यंतच्या सर्व शाळा बंद राहणार आहेत.
या दरम्यान विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठल्यानंतर केंद्रीय प्रदूषण निरीक्षणसंस्था सीएक्यूएमने आज (शुक्रवार) पासून दिल्ली-एनसीआरमध्ये जीआरएपी-3 अंतर्गत निर्बंध लादले आहेत. दिल्लीतील हवेची गुणवत्ता सलग दुसऱ्या दिवशीही 'गभीर' श्रेणीत राहिली. ज्यामुळे अधिकाऱ्यांना हवा प्रदूषण रोखण्यासाठी कडक पावले उचलावी लागली. दिल्लीत आज (शुक्रवार) पासून अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.