सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीविरोधात जबरदस्त हल्लाबोल केला आहे. आमच्या योजना महाविकास आघाडीने ढापल्याचा आरोप शिंदे यांनी केला. मुंबईतील बीकेसी मैदानावर एक दिवसापूर्वी महाविकास आघाडीने योजनांचा पाऊस पाडला. महिला मतदारांना आपल्या बाजूने आणण्यासाठी योजनांची घोषणा केली. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर चांगलेच तोंडसूख घेतलंय. महाविकास आघाडी हे प्रिंटिंग मिस्टिकवाले असल्याचा टोला सुद्धा यावेळी त्यांनी हाणला.
महाविकास आघाडीला खुलं आव्हान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी त्यांच्या दोन, सव्वा दोन वर्षाच्या कालावधीचा आढावा घेत, महाविकास आघाडीला खुलं आव्हान दिलं आहे. आमचे गेल्या सव्वा दोन वर्षातील काम आणि महाविकास आघाडीचे अडीच वर्षातील काम समोर ठेवा. त्यांनी काय काय केले, त्यांनी काय निर्णय घेतला हे त्यांनी सांगावे. आमच्या कामात त्यांनी किती अडथळा आणला. खोडा घातला ते सांगावे, मी त्यांना खुलं आव्हान देत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आमच्या योजना ढापल्या
आम्ही अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली. त्यांनी अगोदर विरोध केला. या योजनेविरोधात महाविकास आघाडीतील नेते हायकोर्टात गेले आणि आता तेच ही योजना पळवत आहेत. तेच आता आम्हाला फॉलो करत आहेत. सर्व योजना आमच्या टॉप आहेत. ते आता आमच्या सर्व योजना कॉपी करत आहेत. मतदार राजा हुशार आहे. हा सर्व प्रकार त्यांना कळत असल्याचा चिमटाचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढला.
आम्ही लाडक्या बहिणीप्रमाणेच लाडक्या शेतकरी बांधवांसाठी कर्ज माफी केली. आमच्या मागे मागे आता महाविकास आघाडी येत आहे. ते आमची कॉपी करत आहे. त्यांनी आमच्या योजनांची कॉपी केली आहे. लोकांना माहिती आहे, हे काहीच देणार नाहीत. ते लोक प्रिंटिंग मिस्टेकवाले आहेत. राजस्थान, कर्नाटक, हिमाचलमध्ये त्यांनी योजना सुरु केल्या. पण पुढे त्यांच्याकडे पैसा उरला नाही. तेव्हा त्यांनी केंद्राकडे पैशांची मागणी केली.
लाडक्या बहिणींच्या खात्यात आम्ही अगोदरच पैसे जमा केले आहेत. आम्ही डिसेंबरपर्यंतची तरतूद केली. अगोदरच बहिणींच्या खात्यात योजनेचा हप्ता जमा केला. आचारसंहिता लागणार हे आम्हाला माहिती होते. महाविकास आघाडीच्या या अपप्रचाराला आमच्या बहिणी बळी पडणार नाहीत. त्या आम्हाला निवडून देतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.