निवडणूक आयोग ‘ॲक्शन मोड’वर, १४ राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये ५५८ कोटी रुपये रोख, मोफत वस्तू, दारूचा मोठा साठा, ड्रग्ज आणि मौल्यवान वस्तू जप्त
महाराष्ट्रातून २८० कोटी रुपये तर झारखंडमधून १५८ कोटी रुपये जप्त
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुका तसेच पोटनिवडणुकांमध्ये मतदारांना प्रलोभन देण्याची प्रकरणे रोखण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील यंत्रणांनी केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत ५५८ कोटी रुपये मूल्यांची रोकड, मोफत वाटपासाठी आणलेल्या प्रलोभनपर वस्तू, मद्य, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू जप्त केले आहेत. निवडणुका जाहीर झाल्यापासून केवळ महाराष्ट्र राज्यात केलेल्या कारवाई अंतर्गत सुमारे २८० कोटी रुपये मूल्याचा माल जप्त केला गेला आहे. तर झारखंडमधूनही आतापर्यंत आणखी १५८ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात ७३.११ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे, तर ३७.९८ कोटी रुपयांची दारू आणि ३७.७६ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने ९०.५३ कोटी रुपयांचे मौल्यवान धातू आणि ४२.५५ कोटी रुपयांच्या मोफत वस्तू जप्त केल्या आहेत.
झारखंडमध्ये १०.४६ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ७.१५ कोटी रुपयांची दारू आणि ८.९९ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने ४.२२ कोटी रुपयांचे मौल्यवान धातू आणि १२७.८८ कोटी रुपयांच्या मोफत वस्तू जप्त केल्या आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यापूर्वी सर्व अधिकाऱ्यांना निवडणुकीत कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाबाबत आयोगाची ‘झिरो टॉलरन्स’ राखण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी अनेक एजन्सींना अवैध दारू, ड्रग्ज, मोफत वस्तू आणि रोख रक्कम यांचे वितरण आणि हालचाली रोखण्यासाठी संयुक्त पथके तयार करण्यास सांगितले. नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, उत्पादन शुल्क आयुक्त आणि अंमलबजावणी एजन्सी या दोन्ही निवडणुकांना तोंड देणारी राज्ये आणि त्यांच्या शेजारची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, राजीव कुमार यांनी आंतरराज्यीय सीमेवरील हालचालींवर कडक नजर ठेवण्यावर भर दिला आहे.
दोन्ही राज्यांमध्ये यंदा होत असलेल्या निवडणुकांमध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत एकत्रित जप्तीचे प्रमाण ३.५ पटीने वाढले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात १०३.६१ कोटी रुपये मूल्याचा मुद्देमाल तर झारखंडमध्ये १८.७६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला होता.