जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै
जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे की, हे जग निसर्ग नियमांवर चालते व निसर्ग नियमांना अनुसरून जे जीवन जगतात ते सुखी होतात व निसर्ग नियमांना जे लाथाडतात ज्यांच्यावर निसर्गनियमांकडून लाथा खाण्याचे प्रसंग येतात. जीवनविद्येची उपासनेची व्याख्या ही वेगळी आहे. निसर्गनियमांना अनुसरून जीवन जगणे म्हणजे उपासना.
निसर्गनियमांना अनुसरून जीवन जगणे म्हणजे देवाची उपासना व निसर्गनियमांना लाथाडून जीवन जगणे म्हणजे परमेश्वराची प्रतारणा. किती सोपे आहे. प्रत्येक माणसाने निसर्गनियमांना अनुसरून जीवन जगले की, परमेश्वराची उपासना झाली व जग सुखी झाले. परमेश्वराशी आपला जो संबंध येतो तो निसर्ग नियमांच्याद्वारे येतो, थेट येत नाही. इथे प्रकाश पडलेला आहे. या प्रकाशाचा आपल्याशी संबंध येतो तो इलेक्ट्रिसीटीमुळे. पण इलेक्ट्रिसीटीला आपण पाहू शकत नाही.
सांगायचा मुद्दा असा की, परमेश्वर हा विषय इतका सोपा असूनही लोकांनी तो कठीण करून टाकलेला आहे. परमेश्वर आणि त्याचे निसर्गनियम हे महत्वाचे आहेत. परमेश्वर कुणावरही कृपा करत नाही किंवा कोप करत नाही मग तो कुठल्याही जातीधर्माचा, राष्ट्राचा असो हे पहिले लक्षांत ठेवले पाहिजे. हे सगळे जग निसर्ग नियमांवर चाललेले आहे.
परमेश्वर कृपा करतो किंवा कोप करतो हे लोक सांगतात तेव्हा त्यांचे हसूच येते. मला तुम्ही सांगा अनंत कोटी ब्रह्माण्डनायक हा शब्द लक्षांत घ्या. एक कोटी, दोन कोटी, शंभर कोटी नाहीतर अनंत कोटी ब्रह्माण्डाचा नायक. अनंत कोटी ब्रह्माण्डात जिथे पृथ्वीला स्थान नाही, आशिया खंडाला स्थान नाही तिथे माणसाला काय स्थान आहे व माणूस म्हणजे खिजगणतीचा पाला. झाडावर किती पाने असतात त्यातले एक पान गेले तर झाडाला कुठे कळते तसे माणूस हा प्राणी देवाच्या खिजगणतीतसुद्धा नाही, म्हणून परमेश्वर कृपा करतो, कोप करतो या म्हणण्याला काय अर्थ आहे. तो कृपा करतो व कोप करतो या माणसाने केलेल्या कल्पना आहेत व आपण या कल्पनेच्या आहारी गेलेलो आहोत.
माणसाचा परमेश्वराशी संबंध येतो तो निसर्गनियमांद्वारे, हे निसर्गनियम व माणूस जे कर्म करतो ते कर्म, यांचा संगम झाला की, त्यातून नियती निर्माण होते व ही नियती माणसाचे नशीब निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. इतके हे सोपे व सरळ आहे. लोकांनी हे कोडे कठीण करून ठेवलेले आहे. इतके कठीण केलेले आहे की, ते सुटता सुटत नाही. जीवनविद्येने हे सगळे स्पष्ट करून सांगितलेले आहे. आता ही जीवनविद्या स्वीकारायची की, नाकारायची हे कुणी ठरवायचे. हे तुम्ही ठरवायचे आहे, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.