बारामतीत अजित पवारांची भावनिक साद
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर बारामती दौऱ्यावर असून ते गावभेटी घेत आहेत. यावेळी स्थानिक नागरिकांना अजित पवारांना भावनिक आवाहन करत आहेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) साहेबांना या वयात धक्का बसेल, म्हणून तुम्ही सुप्रिया सुळेंना मतदान केले. साहेबांचा विचार करून त्यांना निवडून दिले. मला आता मतदान करा आणि खुश करा. मी खुश म्हणजे साहेब खुश. त्यामुळे या निवडणुकीत तुम्ही मला मतदान करा, असे आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी बारामतीमधील विकासकामांवर भाष्य केले. ते म्हणाले की, बारामतीमध्ये हजारो कोटी रूपयांचे कामे चालू आहे. बारामतीत आरोग्याबाबत अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. राज्यात दोन कोटी ३० लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले आहेत. बारामतीमध्ये एक लाख २१ हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. ही योजना सुरू ठेवण्यासाठी महायुतीच सरकार आणावे लागेल. गरीब वर्गाची परिस्थिती चांगली करण्यासाठी देखील योजना सुरू केल्या आहेत. पुढे वीज सौरऊर्जा पद्धतीने दिली जाणार असल्याचा शब्द अजित पवार यांनी दिला.
अजित पवार नेमके काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले की, सर्व योजना सुरू ठेवण्यासाठी घड्याळाचे बटण दाबा. शरद पवार यांच्यानंतर काम करणं अवघड होत. पण मी विकासकामात आणखी भर घातली आहे. शेतीसाठी आता वीज रात्री नाही, तर दिवसा देणार आहे. जास्तीत जास्त सौरऊर्जा प्रकल्प राबण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांनी दिवसभर काम केल्यानंतर रात्री निवांत झोपायचं. यासाठी प्रयत्न करत आहोत, असं अजित पवार म्हणाले आहेत.
अजितदादा म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत तुम्ही कोणतं बटण दाबलं? हे तुम्हाला माहित आहे. शरद पवार यांना त्रास होवू नये, म्हणून सुप्रिया सुळेंना मतदान केले. आज तुम्ही मला मतदान करा. शरद पवार १९६७ ते १९९०मध्ये आमदार राहिले. मी त्यानंतर आमदार झालो. आतापर्यंत खूप विकास केला आहे. अजून विकास करायचा आहे,असेअजित पवार बारामतीतील गावदौऱ्यात म्हणाले.