दीपावली हा खरोखरीच हिंदू धर्मियांमध्ये सणाचा राजा मानला जातो. या सणाला राजा का म्हणून संबोधले जाते, याचे उत्तर बाजारपेठेतील गर्दीवरून सहज पाहावयास मिळत आहे. महागाईच्या नावाने सर्वसामान्य शंखनाद करत असतानाही बाजारपेठेमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी कमालीचा उत्साह गर्दीमध्ये पाहावयास मिळत आहे. दिवाळीच्या फराळासाठी जिन्नस खरेदी करताना किराणा दुकानात, वेगवेगळे फटाके खरेदी करण्यासाठी फटाका मार्केटमध्ये, बहिणी, आई, पत्नी, मुली व घरातील अन्य महिलांसाठी साड्या खरेदी करण्यासाठी साडी मार्केटमध्ये, घरातील अन्य सदस्यांसाठी कपडे खरेदी करण्यासाठी कापड मार्केटमध्ये ओसडूंन वाहणारी गर्दी पाहिल्यावर या देशातील महागाई गायब झाली असून स्वस्ताई अवतरल्याचा भास होत आहे. सोन्या-चांदीचा दर गगनभरारी घेत असला तरी सराफांच्या दुकानांमधील गर्दी पाहिल्यावर कितीही महागाई झाली तरी सोन्या-चांदीची आवड व आकर्षण कदापिही कमी होणार नसल्याचे पुन्हा एकवार स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत, अविकसित भागापासून विकसित परिसरापर्यंत दिसणारी रोषणाई, घरा-दारांवर, आवारातही होणारा विजेचा झगमगाट पाहिल्यावर कोणाच्याही चेहऱ्यावर तणाव पाहावयास मिळत नाही. उलटपक्षी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद व समाधानाची एक वेगळीच झलक पाहावयास मिळाली.
दिवाळीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत दिवाळी पहाट या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही त्याच उत्साहाने करण्यात आले होते. निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे राजकीय लोकांनी हात आखाडता घेतला असला तरी आयोजकांनी पदरमोड करून दिवाळी पहाटचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमांनाही दरवर्षीच्या तुलनेत गर्दीचा आलेख उंचावलेला होता. शाळांना सुट्टी लागल्यामुळे क्रीडांगणावर मुलांची गर्दी जमली आहे. उपनगरात क्रीडांगणे छोटी होत असली तरी त्या छोट्याशा क्रीडांगणावरही क्रिकेट व फुटबॉल हे खेळ उत्साहाने खेळताना मुले पाहावयास मिळत आहेत.
महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकारने काही महिन्यांपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्यास सुरुवात केली असली तरी महाराष्ट्राच्या भूमीवर बहीण-भावाच्या प्रेमाला पुरातन काळापासून महत्त्व असल्याचे दाखले पाहावयास मिळत आहेत. भावा-बहिणीच्या प्रेमालाही महागाईमुळे कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण झाले नाहीत. भाऊबीजेनिमित्त बहिणीला ओवाळणी देण्यासाठी भाऊराया हात आखडता घेत नसल्याने पेशवाई, पैठणी व अन्य महागड्या साड्यांच्या दुकानांमध्ये भाऊरायांनी गर्दी केली होती. बहिणाबाईदेखील भावाच्या ओवाळणीची परतफेड म्हणून भावाच्या घरामध्ये नसलेली वस्तू खरेदी करताना पाहावयास मिळाली. पाडव्यानिमित्त नवराबीजेचा सण दरवर्षी पती-पत्नीकडून उत्साहाने साजरा केला जातो. याशिवाय मोठा दागिना महागाईमुळे खरेदी करणे शक्य नसले तरी अनेक महिला अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी पाडवा, गुढी पाडव्यानिमित्त वन ग्रॅम सोन्याचे नाणे खरेदी करत असल्याने सराफांच्या दुकानांमध्ये दिवाळी पाडवानिमित्ताने सोन्याची नाणी विक्रीचीही उलाढाल वाढली आहे.
विधानसभा निवडणुकांचा कालावधी असल्याने निवडणूक लढवू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मात्र ही दिवाळी त्रासदायी ठरत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजकीय कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, महिला बचत गटाच्या सदस्यांना, सामाजिक क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्त्यांना, त्या त्या परिसरात जनाधार असणाऱ्या ठरावीक चेहऱ्यांना ‘खूश’ ठेवण्यासाठी, प्रचारात त्यांनी सक्रिय होण्यासाठी, त्या त्या भागातील जनाधार आपल्याकडे वळविण्यासाठी संबंधितांना दिवाळीच्या ‘आर्थिक’ फराळाचे वाटप करताना उमेदवारांची दमछाक होत आहे. दिवाळीचे निमित्त करून आर्थिक तंगीचे कारण पुढे करत उमेदवारांकडे चेहरा पाडून येणाऱ्या घटकांची दिवाळी चांगली करण्यासाठी उमेदवारांना आपल्या खिशाला झळ देण्याची वेळ आलेली आहे. आर्थिक तंगीचे, महागाईचे कारण पुढे करत हिशोब करण्यात व्यस्त असणारा अल्प उत्पन्न घटकातील तसेच मध्य उत्पन्न गटातील घटक दिवाळीनिमित्त खर्चाची उधळण करताना पाहावयास मिळत आहे. अनेकदा दिवाळीसाठी खर्च करण्यासाठी, दिवाळी साजरी करण्यासाठी काही घटकांनी कर्ज काढतानाही मागे-पुढे पाहिले नसल्याची उदाहरणे ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहेत. दुचाकी व चारचाकी वाहनाने दिवाळी कालावधीत विक्रीने उच्चांक गाठला असल्याने वाहन पॉर्किंगची व प्रदूषणाची नव्याने समस्या निर्माण होणार असली तरी दिवाळी कालावधीत त्याचे कोणालाही सोयरसुतक नाही. दिवाळी ही दिवाळकाढी ठरत असली तरी उत्साहापुढे याचे कोणालाही काहीही सोयरसुतक नाही. दररोज वाढणाऱ्या इंधनाच्या किमती, सोन्या-चांदीच्या वाढत्या किमती, सदनिकांच्या वाढत्या किमती, शेअर बाजारातील घसरण, राजकारणातील चढउतार यावर दररोज मोठ्या प्रमाणावर चर्चा झडत असल्या तरी दिवाळी कालावधीत या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. अनेक बिल्डरांच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा शुभारंभ दिवाळी-दसरा कालावधीत झाला असला तरी सदनिका खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांचा पुढाकार पाहता दिवाळीनिमित्ताने अर्थकारणाला खऱ्या अर्थांने गती मिळाली आहे. दिवाळी साजरी करताना संवेदनशील प्रवृत्तींनी माणुसकी जोपासल्याचे पाहावयास मिळत आहे. अनेक वृद्धाश्रम, अनाथाश्रमांमध्ये दिवाळी कालावधीत त्या वृद्धांच्या, अनाथ बालकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा यासाठी माणुसकी जिवंत असणारे घटक दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अनाथाश्रम, वृद्धाश्रमामध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी आले आहेत.