हैदराबाद : अनेकांना बाहेरचे पदार्थ खाण्याची आवड असते. मात्र रस्त्याच्याकडेला उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे आरोग्याला धोकादायक असते. याआधीही शोरमा, पाणीपुरी, मोमोज, चायनीज अशा पदार्थांतून विषबाधा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर आता तेलंगणातही अशीच घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.
हैदराबाद येथील बंजारा हिल्स परिसरात रस्त्यावरील एका फेरीवाल्याकडून मोमोज खाल्ल्याने एका महिलेला विषबाधा होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
हैदराबाद येथील रेशमा बेगम (३१) त्यांच्या मुलांसह मोमोज खाण्यासाठी गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येत खालावली. पीडित महिलेला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तब्येत जास्त खराब झाल्याने उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.
याप्रकरणी तपासादरम्यान, इतर भागातील २० रहिवाशांना देखील अन्न विषबाधामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांनी सगळ्यांनी एकाच स्टॉलवरून मोमोज खाल्ल्याचे समोर आले. पोलिसांनी स्टॉल चालवणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.