नवी दिल्ली : जम्मूतील अखनूर सेक्टरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांत चकमक सुरु आहे. सुरक्षा दलांनी आज सकाळी अखनूर सेक्टरमधील एका गावाजवळ जंगलात लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना ठार केले. येथील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) गेली २७ तास चकमक सुरु असून येथील चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या तीन झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अखनूर सेक्टरमध्ये दहशतवादविरोधी कारवाईत भारतीय सुरक्षा जवानांनी मंगळवारी दोन दहशतवाद्यांना ठार केले. सोमवारी सुंदरबनी सेक्टरमधील असन मंदिराजवळ दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर चकमक सुरू झाली होती. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दलांनी सोमवारी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. त्याच्याकडील शस्त्र जप्त केले होते.