अॅड. रिया करंजकर
गावाकडे व्यवस्थित नोकरी-धंदा मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातील पिढी दिवसेंदिवस शहराकडे येत आहे. शहरात मिळेल ती नोकरी करून आपली आणि आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत. थोडे स्थिर झाल्यानंतर आपल्या कुटुंबालाही शहरांमध्ये बोलवतात. सुनील पाल हा नोकरी-धंद्यासाठी मुंबईमध्ये आला. तो आपल्या नातेवाइकांकडे राहून आपला उदरनिर्वाह करत होता. थोडासा स्थिरस्थावर झाल्यानंतर त्याने आपली पत्नी आणि तीन मुलांना शहराकडे बोलावले. भाड्याची खोली घेऊन सुनील आपल्या परिवारासह राहू लागला. तो कमवत असलेल्या पगारामध्ये उदरनिर्वाह होत नव्हता. कारण पहिला तो आपल्या नातेवाइकांकडे एकटाच भाड्याने राहत होता पण आता परिवाराला बोलावल्यानंतर घराचे भाडे, मुलांचे शिक्षण या सर्व गोष्टी त्याला पाहाव्या लागत होत्या. म्हणून त्याची पत्नी आशा हिने घरकाम करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून आपले घर व्यवस्थित चालेल आणि मुलांचे शिक्षणही व्यवस्थित होईल. हळूहळू तिला घरकामामध्ये पैसा येऊ लागला. दोघांच्या पगारातून पैसा जमा होऊ लागला. त्यांना नातेवाइकांकडून समजले की, एके ठिकाणी दहा लाखांपर्यंत घर मिळते म्हणून त्या ठिकाणी ती दोघं गेली आणि व्यवस्थित सगळी चौकशी करून त्यांनी ते घर घेण्याचे ठरवले.सुनीलला मनात असे वाटू लागले की, आपली पत्नी आपल्याबरोबर मेहनत करते म्हणून आज आपण या परक्या शहरांमध्ये कुठेतरी स्वतःचे घर घेण्याचा विचार करतोय. म्हणून त्याने निर्णय घेतला की, आपले घर आपल्या पत्नीच्या नावावर असेल. तसे त्यांनी आपले आई-वडील आणि भावांनाही सांगितले. घर घेत असल्याचे समजताच सुनीलबरोबर सर्व भावंडं आणि आई-वडीलही भांडू लागली. त्यांचे नातेवाईकही त्याला सांगू लागले की, तुझ्या पत्नीच्या आशाच्या नावावर तू घर घ्यायचे नाही. तू कमवतोयस त्याच्यामुळे तु तुझ्या नावावर घर घे. सुनील म्हणाला की, मी कमवत असलो तर काय झाले मागे पुढे काय झाले तर घर तिच्याच नावावर होणार आहे. त्यामुळे मी आताच तिच्या नावावर घर करतो. कोणत्याही नातेवाइकांचे न ऐकता सुनीलने घर आशाच्या नावावर केले. नवीन घरामुळे सुनीलचे भाऊही आपला हिस्सा मागत होते. त्यावर सुनीलने भावांना समजावून सांगितले की, हे घर मी माझ्या कष्टातून कमवून घेतले आहे. या मतावर भाऊ म्हणाले की, हे घर तू जरी कष्ट करून घेतले असले तरी हे घर शहरात असल्यामुळे आम्हालाही या घराचा हिस्सा हवा आहे. सुनीलच्या बहिणीचीही तीच मागणी होती. सुनीलची बहिणीने हे घर आशाच्या नावावर आहे ते तू तुझ्या नावावर कर असा सुनीलच्या मागे तगादा लावला होता. आशा ज्या ठिकाणी काम करायची ती मालकीण वकील होती. आशाने सर्व गोष्टी वकीलबाईंच्या कानावर घातल्या. तेव्हा वकीलबाईंनी आशाला सांगितले की, आशा घर जर नवऱ्याच्या नावावर असेल तर नवऱ्याला मागे-पुढे काही झाले तर त्या घरावर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा हक्क येतो. त्यामुळे सुनीलचे भाऊ सुनीलला जर पुढे-मागे काही झाले तर त्यांना ते घर बळकावता येईल यासाठी ते घर त्याच्या नावावर करण्यासाठी तगादा लावत आहेत. नवीन घेतलेले घर तुझ्या नावावर असल्याने सुनीलचे चार भाऊ आणि बहीण सुनीलकडे हिस्स्यासाठी भांडत होते. जे घर सुनीलने कष्टाने कमावलेले होते.
सुनील आपली पत्नी, दोन मुली एक मुलगा असे त्या घरात राहत होते. सुनील आणि आशाने कष्ट करून दहा लाख रुपये जमवून त्यांनी ते घर विकत घेतले होते. त्या घरासाठी सर्व भावंडे भांडत होती. शेवटी सुनीलने आशाच्याच नावावर घर ठेवायचे ठरवले. कारण आजकाल कधी कोणाला काय होईल सांगता येत नाही. आपल्या मुलांचे पुढे काय होईल, आपली भावंडे आताच एवढी भांडतात तर नंतर काय करतील हा विचार मनात आला. आपल्या मुलांचा विचार करून सुनीलने नातेवाइकांशी वैर पत्करले. पण त्या घरावर स्वतःचे नाव न चढवता आशाचे नाव त्यांनी कायम ठेवले.आपला भाऊ ऐकत नाहीये म्हणून रात्रंदिवस सुनीलचे भाऊ त्याला फोन करून त्रास देऊ लागली. नको नको ते बोलू लागले. शेवटी वैतागून सुनीलने सर्वांचेच नंबर ब्लॉक करून टाकले. कष्टाने सुनीलने घेतलेल्या घराचा हिस्सा मात्र भावंडे मागत होती. जो कष्ट करतो त्याचे कष्ट दिसत नाहीत, पण त्या कष्टातून घेतलेली वस्तू मात्र लोकांच्या डोळ्यांत
खूपत असते.(सत्यघटनेवर आधारित)