शमीचे भारतीय संघांत पुनरागमन लांबणीवर
नवी दिल्ली : आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात मोहम्मद शमीला निवडण्यात आलेले नाही. त्यानंतर आता शमीने एक पोस्ट शेअर करत बीसीसीआयची माफी मागितली आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात २२ नोव्हेंबरपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठीही महत्त्वाची आहे. मात्र, या मालिकेसाठी भारतीय संघात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला संघात संधी मिळालेली नाही. यामागील कारण म्हणजे त्याची तंदुरुस्ती आहे. शमी गेल्या एक वर्षापासून पुनरागमनासाठी मेहनत घेत आहे. मात्र, त्याला पुरेशी तंदुरुस्ती राखण्यात अपयश आले आहे. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही निवडण्यात आलेलं नाही. त्याच्याआधी या दौऱ्यासाठी प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा या वेगवान गोलंदाजांना संघात संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, यानंतर आता शमीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने क्रिकेट चाहत्यांची आणि बीसीसीआयचीही माफी मागितली आहे. शमीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की तो जिममध्ये ट्रेनिंग करत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय की ‘दिवसेंदिवस गोलंदाजी करण्यासाठी लागणारी तंदुरुस्ती मिळण्यासाठी मेहनत घेत आहे.’ ‘सामना खेळण्यासाठी आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी सज्ज होण्याच्या हेतूने मेहनत करत आहे. सर्व क्रिकेट चाहत्यांची आणि बीसीसीआयची माफी मागतो, पण मी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज होईल. सर्वांना खूप प्रेम.’ अनफिट मोहम्मद शामी. आम्हाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर घेऊन जायचा नाही; शमी भारताकडून अखेरचा नोव्हेंबर २०२३ मध्ये वनडे वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळला होता. त्यानंतर टाचेच्या दुखापतीमुळे तो मैदानातून बाहेर होता. अखेर यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्याला टाचेजवळ शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. यातून तो सावरत असतानच त्याच्या गुडघ्यालाही दुखापत झाली. त्यामुळे त्याचे पुनरागमन लांबले.
काही दिवसात रणजी ट्रॉफीसाठी खेळणार
भारतीय संघाला अपेक्षा आहे की शमी लवकरच पूर्ण तंदुरुस्त होऊन पुनरागमन करेल. सध्या अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की शमी येत्या काही दिवसात रणजी ट्रॉफीमधील सामने खेळेले. यातून जर त्याने त्याची तंदुरुस्ती सिद्ध केली, तर तो भारतीय संघातही पुनरागमन करेल. शमीने त्याच्या कारकिर्दीत ६४ कसोटी सामने खेळले असून २२९ विकेट्स घेतल्या आहेत, तर १०१ वनडे सामन्यांत १९५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये २४ विकेट्स घेतल्या आहेत.