नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नवी दिल्लीत आहेत. बाळासाहेब थोरात यांनी नवी दिल्लीत बोलताना महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला सांगितला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात देखील थोरात यांनी भाष्य केलं आहे. मित्रपक्षांना आम्ही १८ जागा दिलेल्या आहेत. आता तीन राजकीय पक्षांचा फॉर्म्युला ८५-८५-८५ वरुन ९०-९०-९० वर पोहोचला असल्याचं त्यांनी म्हटलं.
बाळासाहेब थोरात म्हणाले की आम्ही चर्चा करत आहोत, आमचे उमेदवार सक्षम आहेत त्यांच्याबाबत चर्चा झाली आहे. सीईसी पुढे ही नाव आम्ही ठेवणार आहे. महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत कोठेही करणार नाही, असं देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. राज्याची निवडणूक आहे, त्यामुळं काही अडचणी असतात त्या आम्ही सोडवत असतो, असं देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
बाळासाहेब थोरात यांनी पुढे म्हटलं की १८ जागा आम्ही मित्रपक्षांना ठेवल्या आहेत. त्यातून किती सुटतील बघू असं देखील ते म्हणाले. आमचा ८५-८५-८५ चा फॉर्म्युला आता ९०-९०-९० झाला आहे. काँग्रेस १०० च्या पुढे जाणार का याची अजून बेरीज केली नाही, असं देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
काँग्रेसनं काल पहिल्यांदा ४८ जागांची यादी जाहीर केली. यामध्ये विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. महाविकास आघाडीकडून कालपर्यंत १५८ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४५, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं ६५ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीतील उर्वरित जागांवर उमेदवार कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आग्रहानंतर उद्धव ठाकरे आता उमेदवारांच्या यादीत बदल करणार
शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केलेल्या ६५ उमेदवारांच्या यादीमध्ये काही मोजक्या तीन ते चार उमेदवारांच्या नावात बदल होणार असल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडीमध्ये काही मोजक्या जागांवर तिढा कायम असताना त्या तिढा असलेल्या जागांवरसुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर केली असल्याची माहिती मिळत आहे. पहिल्या उमेदवार यादीमध्ये जाहीर केल्या गेलेल्या तीन ते चार उमेदवारांच्या नावात बदल होणार आहे.
तीन ते चार जागांवर काही ठिकाणी काँग्रेसचे आणि काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे आग्रही आहेत. त्यामुळे उमेदवारी संदर्भात पुन्हा एकदा पुनर्विचार केला जावा, अशी मागणी महाविकास आघाडीत ठाकरेंसोबत असलेल्या मित्रपक्षांनी केली आहे. त्यामुळे ठाकरे जाहीर केलेल्या यादीतील काही नावांमध्ये बदल करणार असल्याची माहिती मिळत आहे.