दिवाळीत खरेदीकडे ग्राहकांची बाजारात गर्दी दिसून येत आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी धनयत्रोदशीला लोक मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करतात. त्यामुळे सोन्याची आतापासून बुकींग करायला लोकांनी सुरुवात केली. सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याचे दर सुद्धा वाढताना दिसतो. भारतात सोन्याच्या किंमतीने विक्रमी उच्चांक गाठला. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७७,९०० रुपये होता. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याच्या वाढत्या भावामुळे आता ग्राहकांच्या खिशाला चटका बसणार आहे.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७१,४०८ रुपये होती तर २४ कॅरेटसाठी ७७,९०० रुपये होती. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९५७ रुपये होती म्हणजेच चांदी ९०,९५० रुपये प्रति किलो होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, सोने चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही पण शुक्रवारच्या विक्रमी दरानेच सोने चांदी विकली जात आहे. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती $२,७११.९९ प्रति औंसपर्यंत वाढल्या आहेत. भारतात सोन्याचे भाव भरमसाठ वाढण्यामागे देशांतर्गत कारणांपेक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरू लागल्यात नुकतेच अमेरिकेच्या फेडरल बँकेने अर्थात सोप्या भाषेत तिथल्या रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये ५० बेसिस पॉइंट (bps) ची कपात केली आहे. येत्या काही महिन्यांत आणखीही कपात केली जाईल, असा अंदाज आहे. एकीकडे अमेरिकेत हे घडत असताना तिकडे इस्रायल व हेझबोला यांच्यातला तणाव व रशिया-युक्रेन युद्ध या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सोन्याची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अमेरिकेतील व्याजदर कपातीमुळे डॉलरची किंमत घटली. त्यामुळे पत सुधारण्यासाठी अनेक देशांमधील बँका सोन्याची खरेदी करू लागल्या.