मुंबई : ‘नवरा माझा नवसाचा २’ (Navra Maza Navsacha 2) चित्रपट २० सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा पाचवा आठवडा सुरु झाला आहे. जेव्हापासून या सिनेमाची घोषणा झालेली अगदी तेव्हापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली. पुढे जसजसे सिनेमाचे टीझर आणि ट्रेलर येत गेले तसे या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहू लागले. चित्रपटाने आतापर्यंत तब्बल २१ कोटींपेक्षाही अधिक गल्ला जमवला आहे.
सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवादलेखन संतोष पवार यांचे आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे यांच्यासह मोठी स्टारकास्ट आहे. नवस फेडण्यासाठी जातानाचा रेल्वे प्रवास, त्यात होणाऱ्या गमतीजमती हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. सोनू निगम, जॉनी लिवर, श्रिया पिळगांवकर हे पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत असून प्रेक्षकांना हे सरप्राइज पसंतीस पडले आहे.
एकोणीस वर्षानंतर पुन्हा एकदा गणपतीपुळेला निघालेला हा प्रवास थिएटरमध्ये सुद्धा चांगली गर्दी करतोय ही नक्कीच मराठी सिनेसृष्टीसाठी आनंदाची बाब आहे.