Friday, December 13, 2024
HomeदेशBJP Candidate List : भाजपा १६० जागा लढणार; केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत...

BJP Candidate List : भाजपा १६० जागा लढणार; केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ११० उमेदवारांची यादी फिक्स

नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपा १६० जागा लढणार असून भाजपच्या ११० जागांवरील उमेदवारांवर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुमारे अडीच तास झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये उमेदवारांच्या निवडीबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला. भाजपाची पहिली यादी शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

महायुतीतील जागावाटपही निश्चित झाले असून त्याबाबत गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भेट घेणार आहेत. त्यानंतर महायुतीतील जागावाटपही जाहीर केले जाणार आहे. हरियाणाच्या नवनियुक्त भाजपा सरकारचा गुरुवारी शपथविधी असल्यामुळे अमित शहा चंडीगडमध्ये असतील. तिथे शिंदे व अजित पवार शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाच्या निवडीसंदर्भातील बैठकीसाठी शहा चंडीगडला गेल्यामुळे बुधवारी होणारा शिंदे व अजित पवार यांचा दिल्ली दौरा रद्द करण्यात आला.

दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयामध्ये सोमवारी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा व अमित शहा यांनी प्रदेश भाजपच्या सुकाणू समितीतील नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आली होती. मोदींच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये अमित शहा, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशीष शेलार, विनोद तावडे, पीयूष गोयल, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, पंकजा मुंडे आदी नेते सहभागी झाले होते.

भाजपा सुमारे १६० जागा लढवणार असला तरी २०१९ मध्ये जिंकलेल्या जागा भाजपाच्या वाट्याला येणार आहेत. अशा जागांवरील उमेदवारांबाबत बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. त्यापैकी ६०-७० उमेदवारांची नावे पहिल्या यादीमध्ये जाहीर केली जाऊ शकतात.

दरम्यान, पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी सहा जागांवर भाजपाने गेल्या निवडणुकीत विजय मिळवला होता. त्या सहापैकी कसबा वगळता इतर पाच ठिकाणच्या विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्याचा निर्णय कोअर कमिटीत घेण्यात आल्याचे समजते.

कसबा विधानसभा मतदारसंघाबाबत पुढील बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत त्यांनी तयारीही सुरू केली आहे. त्याचवेळी भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही या ठिकाणी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे कसब्याच्या उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघातून श्रीनाथ भिमाले इच्छूक आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचवेळी पुणे कँटोन्मेंट मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील कांबळे यांचे ज्येष्ठ बंधू माजी मंत्री दिलीप कांबळे यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या ठिकाणाहून सुनील कांबळे यांचा रस्ता मोकळा करण्यात आला आहे. विधान परिषदेसाठी इच्छुक असलेले राजेश पांडे यांना राज्य वखार महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.

पुण्यातील जागांवर चर्चा झाल्याने ‘कोथरूड’मधून चंद्रकांत पाटील, ‘पर्वती’तून मिसाळ, ‘शिवाजीनगर’मधून सिद्धार्थ शिरोळे, पुणे कँटोन्मेंटमधून सुनील कांबळे, तर खडकवासल्यातून भीमराव तापकीर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

परंतु, कसबा आणि वडगाव शेरी या मतदारसंघांच्या उमेदवारीबाबत बैठकीत चर्चा झाली असली, तरी त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -