जळगाव : जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा सापडत असून अनेक जणांना अटक (Fake notes seized) करण्यात आलीय. बनावट नोटांचे धागेदावर मध्य प्रदेशपर्यंत पोहचले आहेत. पोलिसांनी जामनेर येथील आणखी दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १३५०० रुपयांच्या २७ बनावट नोटा जप्त केल्या आहे. या चार संशयितांना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.यावल येथील चेतन सावकारे व नईम शेख या दोघांना अटक करण्यात आली होती.
तपास केल्यानंतर नरजील नासीर खान (वय ३०, रा. मदनीनगर घरकुल, जामनेर) व गनी मजीद शेख (वय ४७, रा. तोंडापूर, ता. जामनेर) या दोघांचा सहभाग आढळला. त्यांनाही अटक केली असून नजरीलकडून पोलिसांनी ५०० रुपयांच्या २७ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच बऱ्हाणपूर येथून हकीम मोहम्मद अमीन व जुबेर असरफ अन्सारी यांच्याकडून नोटा घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोघांचा शोध घेतला असता जुबेर बेपत्ता आहे. तर हकीम हा दुसऱ्या एका गुन्ह्यात खंडवा कारागृहात आहे.