सोलापूर : महाराष्ट्रात पर्यटन विकसित करुन त्याद्वारे स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण करण्यास मोठा वाव असल्याची वस्तुस्थिती लक्षात घेता त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल- रुख्मिणी मंदिर, पंढरपूर येथे यात्रा कालावधी दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात उभा करण्यात येणारा दर्शनमंडप आणि दर्शनरांगेसाठी जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांनी १६ जुलै रोजी पत्रान्वये शासनास प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्तावास मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.
मिळालेल्या मान्यतेनुसार, श्री विठ्ठल- रुख्मिणी मंदिर, पंढरपूर येथे कायमस्वरुपी दर्शनमंडप आणि दर्शनरांग करणेकरीता शासन निर्णय नुसार १२९.४९ कोटी रकमेच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता तर १३ कोटी इतका निधी वितरीत करण्यासही यात मान्यता देण्यात आलेली आहे.
कसं असेल प्रकल्पाचे विवरण?
दर्शन मंडप – मुलभूत सुविधा व इलेक्ट्रिकल वर्क सहित ८७ कोटी ३१ लाख तर दर्शन रांग (स्कायवॉक) सर्व सुविधायुक्त व इलेक्ट्रिकल वर्क सहित ४२ कोटी १८ लाख इतक्या निधीस प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून या कामाकरीता १३ कोटीचा निधी सन २०२४-२५ या वर्षात वितरित करण्यास मान्यता मिळालेली आहे.
जिल्हाधिकारी यांचा सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दर्शन मंडप व स्काय वॉकचा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच पंढरपूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनाची सुलभ व्यवस्था व्हावी यासाठी अत्यंत नियोजनबद्धरित्या हा आराखडा तयार केला. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी हा आराखडा प्रथम पालकमंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीत मंजूर करून घेतला. त्यानंतर १७ ऑगस्ट २०२४ रोजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीत हा आराखडा प्राथमिक दृष्ट्या मंजूर झाला. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी या समितीने या आराखड्यास मंजुरी दिली व २४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आराखड्याला अंतिम मंजुरी दिलेली आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेला दर्शन मंडप व दर्शन रांगेचा प्रश्न आता लवकरच सुटणार असून यामुळे महाराष्ट्र राज्य सह देशभरातील विठ्ठल भक्तांना श्री विठ्ठलाचे दर्शन सहज व सुलभ होणार आहे.