नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखोईचे टेक ऑफ आणि सी २९५चे लॅण्डींग यशस्वी
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायुदलाचे सी २९५ हे विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. या विमानांना वॉटर कॅनानद्वारे अनोखी सलामी देण्यात आली. याबरोबरच लढाऊ सुखोई ३० (Sukhoi) विमानानेही यशस्वी टेक ऑफ केले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुखोई ३० या लढाऊ विमानानेही फ्लायपास केला. लँडींग करणाऱ्या सी २९५ विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
View this post on Instagram
यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडको महामंडळाचे अध्यक्ष, संजय शिरसाट, खा. श्रीरंग बारणे, खा. सुनील तटकरे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, आ. गणेश नाईक, आ. प्रशांत ठाकूर, आ महेश बालदी, अपर मुख्य सचिव गृह इकबाल चहल, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, विजय सिंघल, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, विभागीय आयुक्त डॉ देशमुख, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सी-२९५ विमान हे गांधीनगरहून तर सुखोई हे पुण्यातून आले होते.
यावेळी माध्यमाशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असे नमूद करून या यशस्वी चाचणीचे महत्त्व अधोरेखित केले. विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. विजयादशमीच्या एक दिवस आधी झालेल्या या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांसाठी मोठा आनंद आहे.
“मार्च २०२५ मध्ये हे विमानतळ नियमित प्रवासी सेवेसाठी सुरू होईल. वेळेआधीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सिडकोने केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल सर्व टीमचे अभिनंदन केले.
हे विमानतळ सर्वसामान्यांसाठी मोठे आश्रयस्थान बनेल तसेच यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला आणखी वेग येईल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. या विमानतळामुळे हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील, तसेच इथे आयटी पार्क आणि व्यावसायिक केंद्रे उभारली जातील, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या विमानतळावरुन दर वर्षी अंदाजे ९ कोटी प्रवासी प्रवास करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शिवडी न्हावाशेवा सी लिंक, मुंबई तसेच नवी मुंबई मेट्रो, दोन खाडी मार्गाने जोडला जात असून तो देशातील एक विशेष प्रकल्प ठरणार आहे.