नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे मंगळवारी निकाल लागले. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने दमदार कामगिरी केली, तर हरयाणात एकहाती सत्ता मिळवली. विशेष म्हणजे, हरयाणात भाजपने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. दरम्यान, या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयातून कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि आभार मानले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
भाजप मुख्यालयातून पंतप्रधान मोदी म्हणाले की, हरयाणातील जनतेने आज एक नवा इतिहास रचला आहे. यावेळी हरियाणातील जनतेने जे केले, ते अभूतपूर्व आहे. हरयाणाच्या लोकांनी चमत्कार केला आणि भाजपला सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली. आज नवरात्रीचा सहावा दिवस, म्हणजेच माँ कात्यायनीचा दिवस आहे. आई हातात कमळाचे फुल धरून आपल्याला आशीर्वाद देते. अशा या शुभदिनी हरियाणात सलग तिसऱ्यांदा कमळ फुलले आहे.
आज हरियाणाने काँग्रेसला स्पष्ट संदेश दिला आहे की, देशविरोधी राजकारण चालणार नाही. हरयाणातील प्रत्येक समाजाने, प्रत्येक कुटुंबाने एकजुटीने मतदान केले. देशभक्तीने भरभरून मतदान केले. हरयाणाने देशभक्तांमध्ये फूट पाडण्याचा डाव हाणून पाडला. भारताची शांतता नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय षड्यंत्र रचले जात आहेत, काँग्रेससारखे राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचे साथीदार या खेळात सामील आहेत, असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी केला.