मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २ हजार ३० सदनिकांची ऑनलाईन सोडत
मुंबई : ‘स्वप्न पूर्ण करणारे शहर’ म्हणून ओळख असलेल्या मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे असे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन म्हाडाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार होत असल्याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले.
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत उभारण्यात आलेल्या २ हजार ३० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे काढण्यात आली. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री सावे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न आहे. सर्वासाठी घरे हे स्वप्न साकार होण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना’, ‘मोदी घरकुल आवास योजना’ सुरू केल्या आहेत. या माध्यमातून अल्प, मध्यम उत्पन्न गटातील सर्वसामान्यांना घरे वाटप करण्यात येत आहेत. राज्यात साडे सात लाख घरे बांधण्यात आली असून यातली अडीच लाख घर ही मुंबईमध्ये बांधली गेली आहेत. आजच्या या लॉटरीसाठी दोन हजार ३० घरांसाठी १ लाख १३ हजार पेक्षा जास्त अर्ज आले होते. आजची ही सोडत मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णत: ऑनलाईन अशा संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्रिया राबविण्यात आली आहे. नाशिक, पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या शहरात पारदर्शकपणे लॉटरी प्रक्रियेमार्फत लोकांना घरे मिळाली आहेत. मुंबई शहर आणि परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे घरांची मागणी ही वाढत आहे. मुंबईत ही दुसरी सोडत असून लवकरच आणखी घरांची सोडत होईल. अभ्युदय नगर, कामाठीपुरा, शहरातील जुन्या वस्त्या येथील पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागत आहे. राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच आणले जाणार असून गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या व टिकाऊ घरांवर भर दिला जाणार असल्याचे मंत्री सावे यांनी यावेळी सांगितले.
मराठी कलाकारांचे मुंबईतील घराचे स्वप्न म्हाडामुळे साकार
गौरव मोरे, शिव ठाकरे, गौतमी देशपांडे, निखिल बनेला म्हाडाची लॉटरी
मुंबईत स्वत:च्या हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. त्यासाठी प्रत्येकजण जशी जमेल तशी मेहनत घेतच असतो. मुंबईतील घरांचे भाव आकाशाला भिडले असतानाच म्हाडाची लॉटरी ही सर्वसामान्यांसाठी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठीची सुवर्णसंधी असते. त्यामुळे अवघ्या काही घरांसाठी लाखोंच्या संख्येने लोक अर्ज करत असतात. यामध्ये कलाकारही मागे राहत नाही. मराठी मालिकामध्ये अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कलाकारांचे मुंबईतील हक्काच्या घरांचे स्वप्न म्हाडामुळे साकार झाले आहे.
मुंबईत स्वतःचे घर हवे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी अनेक जण महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या घरांना पसंती देतात. मुंबईतील विविध भागात म्हाडाने २०३० घरांसाठी जाहिरात काढली होती. म्हाडाच्या घरासाठी प्रत्येक क्षेत्रातील लोकांना संधी असते. यामध्ये पत्रकार, कलाकार यांचाही समावेश असतो. त्यामुळे म्हाडाच्या घरासाठी यंदाही अनेक मराठी कलाकारांनी अर्ज केला होता. त्यामध्ये काही मराठी कलाकारांच्या नशिबात हे घर आले आहे. दरम्यान म्हाडाच्या गोरेगावातील केवळ दोनच घरासाठी तब्बल २७ कलाकारांनी अर्ज केले होते.
मराठी कलाकारांना म्हाडाची लॉटरी लागली असून यामध्ये गोरेगावचे घर अभिनेत्री गौतमी देशपांडे हिला मिळाले आहे. त्याचप्रमाणे कन्नमवार नगरमधील घर हे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता निखिल बने याला मिळाले आहे. त्याचप्रमाणे पोवईमधील दोन्हीही घरं ही मराठी कलाकारांच्या नशिबात आलेली असून अभिनेता गौरव मोरे आणि शिव ठाकरे यांना ही घरे मिळाली आहेत.
अभिनेता गौरव मोरे आणि बिग बॉस विजेता शिव ठाकरे यांना म्हाडाच्या सोडतीमध्ये पवईला घर लागले आहे. पवईमधील म्हाडाच्या एचआयजी श्रेणीतील घरांसाठी दोघांकडूनही अर्ज करण्यात आला होता. पवईतील या उच्च श्रेणीतील घरांची किंमत जवळपास १ कोटी ७८ लाख इतकी होती.
गोरेगांवमधील घरासाठी तब्बल २७ मराठी कलाकारांचे अर्ज आले होते. पण यामध्ये अभिनेत्री गौतमी देशपांडे हिला ही लॉटरी लागली. यामध्ये बिग बॉस मराठीचा विजेता विशाल निकम, लेखक निर्माता निपुण धर्माधिकारी, अभिनेत्री गौतमी देशपांडे, नारायणी शास्त्री,अभिनेत्री किशोरी विज, रोमा बाली, तनया मालजी, अनिता कुलकर्णी, संचित चौधरी, शेखर नार्वेकर यांचा समावेश होता.