Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Shivneri Sundari : एसटीच्या नव्या अध्यक्षांनी शिवनेरी सुंदरीची भुरळ सोडून कर्मचारी व प्रवाशांच्या समस्येकडे लक्ष द्यावे

Shivneri Sundari : एसटीच्या नव्या अध्यक्षांनी शिवनेरी सुंदरीची भुरळ सोडून कर्मचारी व प्रवाशांच्या समस्येकडे लक्ष द्यावे

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांची मागणी

मुंबई : एसटीचे कर्मचारी हे 'ब्रँड ॲम्बेसेडर' व 'सुंदरी' पेक्षा चांगली सेवा प्रवाशांना देत असून 'शिवनेरी सुंदरी'ची भुरळ सोडून नवीन अध्यक्षांनी एसटी कर्मचारी व प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

महामंडळाच्या संचालक मंडळाच्या ३०४व्या सभेत महामंडळाचे नवीन अध्यक्ष भरत गोगावले यांनी शिवनेरी सुंदरीची नेमणूक करण्याची घोषणा केली असून ती परिस्थितीला अनुसरून नाही. आजही कर्मचारी व प्रवाशांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. व ते केल्यास उत्पन्न वाढ होऊन प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा देता येतील.

शिवनेरी बाबतीत बोलायचे झाल्यास ही सेवा महामंडळातील अत्यंत चांगली व फायदेशीर सेवा असून साधारण १२० इलेक्ट्रिक व डिझेल वरील बस या सेवेत आहेत. एसटीच्या वेगवेगळ्या सेवांच्या तुलनेत या सेवेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून या सेवेचे सरासरी भारमान हे ८० टक्के इतके आहे. या सेवेत अजून गाड्या वाढविण्याची गरज असून त्याची व्याप्ती निव्वळ पुणे, मुंबई, ठाणे या पुरती मर्यादित न ठेवता राज्यभर वाढवली पाहिजे. आजही मागणीच्या तुलनेत सर्वच सेवेतील गाड्या कमी पडत असून त्यात प्रवाशांना अजून सेवा सुविधा दिल्या पाहिजेत.

एसटी कर्मचारी व अधिकारी हे अत्यंत चांगले काम करीत असून जुन्या झालेल्या गाड्या घेऊन त्यांनी महामंडळ नफ्याच्या जवळ पोहोचवले आहे. ब्रँड ॲम्बेसेडर व शिवनेरी सुंदरीवर खर्च करण्यापेक्षा वाढीव वेतनाचा फरक, महागाई भत्त्याची थकबाकी व वार्षिक वेतनवाढ प्रलंबित थकबाकी द्यावी. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्य वाढून उत्पन्न वाढेल व ते ब्रँड ॲम्बेसेडर व शिवनेरी सुंदरी पेक्षा प्रवाशांना चांगल्या प्रकारे सेवा देतील यात शंका नाही, असेही बरगे यांनी म्हटले आहे.

विमान सेवा ही सलग सेवा असून तिला शक्यतो थांबे नसतात. त्यामुळे त्यांना खान पान देण्यासाठी हवाई सुंदरीची गरज असते. एसटीची कुठलीही सेवा ही थांब्याशिवाय नसून शिवनेरीच्या पुणे, मुंबई या सेवेत सुद्धा गाड्या चहा पाण्यासाठी थांबत असतात. त्यामुळे या गैरलागू योजनेचा फेरविचार करावा, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

Comments
Add Comment