मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय रेल्वे या वर्षी १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठ पूजेदरम्यान प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी ६००० पेक्षा अधिक विशेष सेवा चालवणार आहे. रेल्वेद्वारे दरवर्षी सणासुदीच्या काळात विशेष गाड्या चालवल्या जातात आणि या वर्षी प्रवाशांची वर्दळ सामावून घेण्यासाठी गाड्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.
पुढील दोन महिन्यांत, या विशेष गाड्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी अखंडपणे पोहोचवतील. गेल्या वर्षी २०२३ मध्ये, भारतीय रेल्वेने लक्षावधी प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव देणाऱ्या एकूण ४४२९ फेस्टिवल स्पेशल ट्रेन्स चालवल्या. दरवर्षी देशभरातून मोठ्या संख्येने लोक दुर्गापूजा, दिवाळी आणि छठपूजेसाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जातात.
उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांसाठी हे सण केवळ धार्मिक महत्त्वाचे नसून त्यांच्या कुटुंबियांसोबत पुन्हा एकत्र येण्याची एक महत्त्वाची संधीही देतात. सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे बहुतांश गाड्यांची तिकिटे दोन ते तीन महिने अगोदरच प्रतीक्षा यादीत जातात. यावर उपाय म्हणून भारतीय रेल्वे या वर्षी सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा विशेष गाड्या चालवत आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने यावर्षी ५८ गाड्यांच्या ३४६ सेवा अधिसूचित केल्या आहेत. मागील वर्षीच्या जवळपास ४५०० सेवा चालवण्याच्या उत्तम कामगिरीपेक्षाही ही लक्षणीय वाढ आहे.