Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाज“जीनेवाले झुमके मस्ताना होके जी...”

“जीनेवाले झुमके मस्ताना होके जी…”

नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे

कुलजीत पाल यांच्या ‘वासना’(१९६८)चे दिग्दर्शक होते टी. प्रकाशराव. प्रमुख भूमिकेत होते राजकुमार, पद्मिनी, कुमुद छुगानी आणि बिस्वजीत चॅटर्जी, तर सहकलाकर होते-सईदा खान, रामायण तिवारी, डेव्हिड, मुक्री, लक्ष्मी छाया, हेलन आणि मनोरमा. कथा होती अत्यंत लोकप्रिय कादंबरीकार गुलशन नंदा यांची!

कैलाश (राजकुमार) एक यशस्वी व्यावसायिक आहे, तर पत्नी पद्मिनी एक नृत्यांगना. नृत्याची आवड म्हणून जाहीर कार्यक्रम करणारी पद्मिनी कार्यक्रमाचे मानधन अनाथ मुलांच्या कल्याणासाठी धर्मदाय संस्थांना दान करत असते. मात्र नाचाचे जाहीर कार्यक्रम आपल्या प्रतिष्ठेला शोभत नाहीत असे राजकुमारला वाटते. तो तिला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असतो. ‘तुला जितके मानधन मिळते त्यापेक्षा जास्त पैसे मी तुला देईन. त्यातून ते अधिक दानधर्म करत जा मात्र कार्यक्रम करू नकोस’ अशी त्याची विनंती ती अव्हेरते. त्यातून त्यांचे संबंध बिघडायला सुरुवात होते.

दोघातला दुरावा वाढत जाऊन राजकुमार दारूच्या व्यसनाच्या आहारी जातो. पुढे तर कोठ्यावरही जाऊ लागतो. एकदा आपल्या व्यसनाचे समर्थन करतानाचा त्याचा संवाद फार तत्त्वज्ञानात्मक झाला होता. तो कोठीवरच्या नर्तिकेला म्हणतो,‘सलौनी, जशी तू ही नृत्याची मैफल, तिथला दारूचा वास, त्यावर मिळणारी ‘वाहवा’ याची सवय सोडू शकत नाहीस, तसा मीही दारू सोडू शकत नाही. खरे तर कुणीच काही सोडू शकत नसते. आपण सगळे कैदी असतो वेगवेगळ्या गोष्टींचे! श्रीमंत माणूस संपत्तीचा, गरीब आपल्या उपरेपणाचा, प्रेमिक प्रेमाचा, सेवक कर्तव्याचा, पूजारी आपल्या भक्तीचासुद्धा कैदीच असतो.’

पुढे राजकुमारच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या मुलाचे मित्र त्याला क्लबमध्ये नेऊन दारू पाजतात आणि मद्यधुंद अवस्थेत तो घरी येतो. ते दृश्य पाहून आई धास्तावते. तिला पुढील भयानक शक्यतांची जाणीव होते आणि ती दीपकला वडिलांच्या फोटोसमोर नेऊन त्यांच्या जीवनाचा कसा करूण अंत झाला ती कथा सांगते. पश्चाताप होऊन मुलगा कधीही दारू न पिण्याची शपथ घेतो अशी साधीसरळ कथा. चित्रगुप्त यांचे संगीत आणि साहिरची अर्थपूर्ण गाणी यामुळे सिनेमा सुश्राव्य झाला होता.

साहीरने तबियतने लिहिलेली गाणी ‘आज इस दर्जा पिला दो के ना कुछ याद रहे’, ‘इतनी नाजूक ना बनो, हाय, इतनी नाजूक ना बनो’, ‘ये परबतोके दायरे ये शामका धुवा, एैसे में क्यो न छेड दे दिलोंकी दास्तान’ आणि चित्रगुप्त
यांनी दिलेले कर्णमधुर संगीत केवळ अविस्मरणीय होते.

जेव्हा दीपक क्लबमध्ये पहिल्यांदाच दारू पितो तेव्हा कॅबेरा नृत्यांगना हेलनच्या तोंडी साहिरने एक जबरदस्त गीत दिले होते. साहीरजींनी ज्यावर गाणे लिहिले नाही असा एकही प्रसंग हिंदी सिनेमात नसेल. त्यांनी १९६५च्या ‘वक्त’मध्येसुद्धा असेच क्लबमधले एक गाणे लिहिले होते. ते तर अजरामर आहे –

‘आगे भी जाने ना तू,
पीछे भी जाने ना तू,
जो भी हैं, येही एक पल हैं.’

साहिरने अख्खा चार्वाक एका त्या गाण्यात दाबून बसवला होता. नंतर कदाचित ‘त्याला कळ लागली असेल’ असे वाटून साहीरनेच ३ वर्षांनी त्याला बुधल्यातून बाहेर काढून ‘वासना’मध्ये पुन्हा संधी दिली. मात्र यावेळी आशाऐवजी गायिका होती लतादीदी. गाण्याचे शब्द होते –

‘जीनेवाले झूमके मस्ताना होके जी,
आनेवाले सुबहसे बेगाना होके जी.’

नर्तिका स्वच्छंदी जगण्याचा सल्ला देताना म्हणते ‘उद्या सकाळी काय होईल याचा विचार म्हणजे आपल्या कृतीच्या परिणामांची तमा, ती मुळीच बाळगू नकोस. हवे तसे जग आणि जीवनाचा आनंद घे.’

पुढे ती सारासार विवेकही सोडून द्यायचे समर्थन करते. ‘काय चांगले काय वाईट याचा विचार करशील, तर जीवनातील अद्भुत गोष्टींच्या आस्वादापासून वंचित राहशील. तू विचार करूच नकोस. बस, तारुण्याच्या जादूचा अनुभव घे.’

‘अच्छा बुरा क्या है, जाने भी दे,
नित नया जादू छाने भी दे.’

साहीर तो ज्या पात्रासाठी गीत लिहितो आहे त्याच्या वागण्याचा तर्कही देतो. तो म्हणतो, तारुण्य क्षणभंगुर आहे. ते एकदा हातातून गेले की कधीही परत मिळत नसते. मग बाकी सगळे असले तरी तू तुझी स्वप्ने पूर्ण करू शकणार नाहीस.

‘जाके ये जवानी आनी नहीं,
दिलोंको मुरादे पाने भी दे.’

आणि म्हणून स्वत:ला आयुष्याच्या सौंदर्यापुढे झोकून दे. उद्याचा विचार न करता फक्त आजचा मनमुराद आनंद घे.

‘शोखीभरे हुस्नका नजराना होके जी,
आनेवाले सुबहसे बेगाना होके जी.’

जीवनात कधीकधी माणसाला मृत्यूचा विचारही सतावतो. हे रंगीबेरंगी स्वप्नांनी भरलेले आणि भारलेले यौवन तर टिकणारे नाहीच पण आयुष्यही संपणार आहे. ही जाणीव माणसाला निराश करते. साहीर म्हणतो, मृत्यू कुठे आला आहे, आज जीवन आहे, तारुण्य आहे तर जगण्याचा पूर्ण आनंद घे ना, लोकलज्जेचा विचारही करू नकोस. तारुण्यातले स्वाभाविक हवे ते प्रमाद घडू दे, वाटेल त्या चुका कर, सगळे संकेत नि:संकोच मोडून टाक.

तू स्वत:च असा आसक्तीचा, सुखाचा काठोकाठ भरलेला चषक बनून जा की तुझे प्रिय येऊन स्वत:च तुझे चुंबन घेतील.

‘जीनेका मजा ले, मरता है क्यों,
ठंडी ठंडी आहे, भरता है क्यों,
लोगोकी निगाहे कुछ भी कहे,
किये जा खताये डरता है क्यों.
चूमे जिसे होठ वो पैमाना होके जी,
आनेवाले सुबहसे बेगाना होके जी.’

जीवनाची क्षणभंगुरता साहीर किती वेगळ्या पद्धतीने मांडतोय पाहा. तो म्हणतो, ‘तुझे श्वास मोजलेले आहेत. विचार कर, जीवनातल्या अमर्याद प्रलोभानांपुढे, सुखांपुढे किती कमी आहेत ते! तू ह्या जगात काही कायमचा राहायला आलेला नाहीस. उलट प्रत्येकाला इथून फक्त जावेच लागणार आहे. त्यामुळे एक क्षणही वाया घालवू नकोस. आनंद घे. असा जग की मनसोक्त जगण्याचे तुझे उदाहरण एखाद्या परीकथेसारखे लोकांच्या कायम स्मरणात राहील.

‘गिनींचुनी सांसे लाया है तू,
जानेको जहाँमें आया है तू,
दोनोंके लिए है गिनतीके दिन,
मैं हु परछाई, साया है तू.
करे जिसे याद वो अफसाना होके जी,
आनेवाले सुबहसे बेगाना होके जी.’

काहीवेळा चक्क सुंदर भजने लिहिणाऱ्या साहीरने अशी वेगळाच विचार देणारी गाणीसुद्धा लिहून एक विक्रमच केला आहे. आज अशी चार ओळीत अख्खे तत्त्वज्ञान बसवणारी साहित्यरत्ने काळाच्या पडद्याआड गेली आहेत.

पण जाताना त्यांनी दिलेला ‘जगताना नाचत, डोलत आनंदाने जगा, उद्याची चिंता करू नका’ हा संदेश आचरणात आणायला काय हरकत आहे? अर्थात ज्याला त्याला आवडतील त्या मर्यादा पाळून!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -