संवाद – गुरुनाथ तेंडुलकर
एका लहानशा गावात घडलेली गोष्ट.
एका धोब्याचे गाढव दुपारच्या वेळी चरताना पाय घसरून एका खोल खड्ड्यात पडले. खड्डा कसला, एक सुकलेली लहानशी विहीरच होती ती. गाढवाने बाहेर पडण्याचे खूप प्रयत्न केले. बरीच धडपड केली. ओरडून गोंधळ माजवला.
गावातली बघी पोरंटोरं त्या खड्ड्याभोवती जमा झाली. काही टारगट पोरं म्हणाली, ‘चला बरं झालं. थोडी गंमत करूया. गाढवाला जिवंत पुरून टाकूया. संध्याकाळी धोबी गाढव शोधत येईल.’‘नाहीतरी यावेळी त्या धोब्यानं होळीसाठी वर्गणी देताना जरा काचकूचच केली होती.
बरं झालं.`आधीच त्या धोब्यावर पोरांचा राग. त्यात ही अशी संधी आयती चालून आलेली.
झालं… पोरांनी खड्ड्यात पडलेल्या त्या गाढवावर मूठ मूठ माती टाकायला सुरुवात केली. काही पोरं म्हणाली, ‘अरे अशी मूठ मूठ माती टाकत राहिलो तर संपूर्ण खड्डा भरताना पुढचा शिमगा उजाडेल.’ ‘मग? मग काय फावडं आणा घमेलं आणा.’ काही पोरांनी फावडं, घमेली आणली. जवळच कुठंतरी बांधकाम सुरू होतं. काही पोरं तिकडे धावली आणि पोत्यातून वाळू आणली. जणू त्या गाढवाची जिवंत समाधी बांधण्याचा त्यांनी चंगच बांधला होता. पोरं माती टाकत होते. वाळू ओतत होते. गाढव जोरजोरात रेकत होतं. गाढवाचं रेकणं ऐकून पोरांना अधिकच चेव चढत होता.
बिचारं मुकं जनावर करणार काय? ओरडण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. गाढव ओरडतंय आणि पोरं अधिक जोरानं माती टाकताहेत. थोडा वेळ गेला गाढव ओरडायचं थांबलं. आता त्याला देखील कळलं असावं की, आता येईल त्या परिस्थितीला तोंड देण्यावाचून गत्यंतर नाही.
गाढव ओरडत नाही हे पाहून काही पोरांनी खड्ड्यात वाकून पाहिलं…
‘काय रे गाढव मेलं बिलं तर नाही ना?’ एकानं विचारलं. ‘नाय यार. इतक्यात कसलं मरतंय? त्याला अख्खा पुरायला हवा. आताशी तर कुठे गुढग्याच्यावर खड्डा भरलाय. चल अजून माती टाक.’
बिचारं गाढव डोळे मिटून तो माती आणि वाळूचा मारा सहन करीत होतं. त्याच्या गुढग्याच्या वरपर्यंत मातीचा थर जमा झाला होता आणि अचानक…
अचानक गाढवानं सर्व ताकदीनिशी उसळी मारली आणि ते मातीच्या ढिगाऱ्यावर आलं. आता गुढग्यापर्यंत उंच असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर चढलं आणि जोरात ओरडलं. पायापर्यंत पुरलेल्या गाढव मातीच्या ढिगाऱ्यातून अंग काढून वर
चढलं होतं.
आपले श्रम वाया गेले म्हणून पोरांना अधिकच चेव चढला. त्यांनी आणखीन जोरात माती आणि वाळू टाकायला सुरुवात केली. पुन्हा तोच प्रकार गाढव पायापर्यंत माती साठली की एकदम चौखूर उडी मारून वर यायचं आणि जोरात रेकायचं.
पुन्हा पोरं माती टाकायचे पुन्हा तोच प्रकार. गाढवाला कसंही करून पुरून टाकायचा चंग बांधलेल्या पोरांच्या हे लक्षातही आलं नाही की, आपण माती टाकून खड्डा बुजवतोय आणि पाचव्या खेपेला ते गाढव एकदम उसळलं. त्यानं जीवाच्या आकांतानं उडी मारली ती खड्याबाहेर.
खड्याबाहेर पडून ते चौखूर धावतच सुटलं. पोरं पाहातच राहिली…
एका गावात घडलेली ही एक सत्यघटना. गाढवाची ही कथा अनेकदा आपल्या आजूबाजूला आपण पाहतो. परिस्थितीच्या खड्ड्यात सापडलेल्या माणसावर चहूंबाजूनी टीका केली जाते. त्याच्या प्रत्येक कृतीला लोक हसतात, नावं ठेवतात. आपण देखील अशा प्रकारच्या अनुभवातून कधी ना कधी तरी गेलेलो असतो.
सुखाच्या वेळी गोड बोलणारे, खायला- प्यायला एकत्र जमणारे दुःखाच्या प्रसंगी लांब पांगतात. बिकट परिस्थितीशी सामना करताना तो एकट्यालाच करावा लागतो, हा सर्वमान्य अनुभव.
नेहमीबरोबर असणारी माणसं अशावेळी एकाकी टाकून निघून जातात. मदत तर सोडाच पण उलट हीच माणसं टीका करायला पुढं सरसावतात.
‘कुणी सांगितलं होतं?’
‘भोगा आपल्या
कर्माची फळं.’
‘तरी मी सांगतच होतो…’
‘आता खड्यात पडला म्हणून कोकलतोय. त्यावेळी आम्हाला विचारलं
असतं तर…’
‘बरं झालं चांगली अद्दल घडली… ’
लोक टीकेची माती टाकत असतात. आपण सर्वसामान्य माणसं त्या टीकेनं खचतो, कोसळतो. निराश होतो. काहीजण तर कायमचे उन्मळून पडतात. अनेकजण टीकेचा मारा सहन न झाल्यानं कायमचे उद्ध्वस्त होतात. काहीजण स्वतःला एका कोषात बंद करून घेतात. कोंडून घेतात. बाहेरच्या जगापासून दूर पळतात. कधी कधी तर अशा प्रकारच्या टीकेला तोंड देण्यापेक्षा मृत्यू अधिक जवळचा असं म्हणून आत्महत्यासुद्धा करतात.
पण… पण त्या टीकेचा विधायक पद्धतीनं उपयोग करून घेतला तर…
तर प्राप्त परिस्थितीच्या खड्ड्याबाहेर येण्याचे काम करण्यासाठी ही टीकाच उपयोगी पडते. पण त्यासाठी आधी शांत डोक्याने ती टीका सहन करावी लागते. केवळ आपल्यावर चारही बाजूंनी टीका होतेय म्हणून गांगरून गेले तर काहीच होणार नाही. ती टीका का होतेय याचं सुयोग्य विश्लेषण करून त्यातून शातं चित्ताने विचार केला तर बिकट परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच सापडतो.
तुकाराम महाराज म्हणतात, ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ त्याच्यामागे देखील हाच हेतू… निंदा करणाऱ्या व्यक्तीचा राग करण्यापेक्षा त्याच्या बोलण्यात खरंच काही तथ्य आहे का हे बारकाईने तपासून पाहिले तर अनेकदा आपले स्वभावदोष आपल्याला दिसतात. सुखाच्या प्रसंगी स्तुती करणारी मंडळी अनेकदा तोंडदेखलं गोड बोलणारी असतात. आपल्या दोषांनाही ते गुणच आहेत अशा तर्हेने भासवतात. पण ज्याला आपण आपले गुण समजत होतो ते गुण नव्हते हे केवळ प्रतिकूल परिस्थितीतच ध्यानी येऊ शकते.
सुखाच्या कालखंडात ‘मी करतोय ते बरोबरच आहे.’असे प्रत्येकाला वाटत असते. आपल्या आजूबाजूचे मित्र आणि सोबती देखील अशाप्रसंगी त्याला उत्तेजन देऊन खतपाणीच घालतात. पण प्रतिकूल परिस्थितीत मात्र…
एक सत्यघटना सांगतो. आमचे एक स्नेही. तात्या आजगांवकर. तात्यासाहेबांनी शेअरमार्केटमध्ये अमाप पैसे कमावले. तात्यांना नशिबाने हात दिला आणि हां हां म्हणता शेअर बाजारात त्यांचे नशीब फळफळलं…
गिरगांवात चाळीत सिंगल रूममध्ये राहणारे शिवाजी पार्कला तीन खोल्यांचा स्वतंत्र ब्लॉक घेऊन राहू लागले. तात्या ‘तात्यासाहेब’ झाले पण.
पण पुढे काय झाले कुणास ठाऊक?
‘हर्षद मेहता’ तेजीच्या कालखंडात तात्यांचा अनुभव तोकडा पडला. शेअर मार्केटचा अंदाज फसले. प्रचंड नुकसान झाले. तात्यासाहेबांना पुन्हा गरिबीचे दिवस पाहावे लागले. तात्यांच्या पैशावर मजा मारणारे नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून टीकेची झोड उठली.
‘कुणी सांगितलं होतं या असल्या नसत्या उठाठेवी करायला…?’
तात्यासाहेबांना माणसांची खरी ओळख पटली. तात्यासाहेबांनी नवी तंत्रं शिकायला सुरुवात केली. नव्याने सुरुवात केली. तेजी आणि मंदी दोन्हीमध्ये पैसे कसे कमावायचे याचे तंत्र आत्मसात केले आणि गेलेले सारे वैभव पुन्हा परत मिळवले. एवढंच नव्हे तर दामदुपटीने कमावले. पुन्हा ताठ मानेने तात्यासाहेब उभे राहिले. पण आता…
आता तात्यासाहेब फार सावधपणे वागतात. झालेल्या चुकांतून ते बरंच शिकलेत. ‘कठीण समय येता कोण कामास येतो?’ या उक्तीचा त्यांनी पुरेपूर अनुभव घेतलाय.
‘आपले कोण?’ आणि ‘परके कोण?’ हे त्यांना चांगलंच उमजलंय आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे शेअर बाजारात कोणत्या प्रकारचे धोके असतात आणि ते कसे टाळावेत हे चांगलंच समजलंय.
लोकांच्या निंदेतून तात्यासाहेब बरंच काही शिकले. निंदा करणारे अजूनही निंदा करतात हा भाग निराळा.
अर्थात निंदा करणारा माणूस तरी स्वतः निर्दोष कुठे असतो? वास्तविक निंदा करणे हाच मोठा दोष. पण तो दोष त्याच्या स्वतःच्या लक्षात कधीच येत नाही. निंदा करणारी माणसे स्वतःचे दोष न पाहता केवळ दुसऱ्यावर टीकाच करतात. पण या टीकेमुळे होते काय? टीका करणारी माणसे आहे तिथेच राहतात आणि ज्यांच्यावर टीका केली जाते त्यांचा मात्र उत्कर्ष होण्याची शक्यता कैक पटींनी वाढते.
निंदा करणारी मंडळी अप्रत्यक्षपणे आपल्यातील दोष दाखवून सुधारायला मदत करीत असतात. त्यांच्या टीकेकडे जरा अंतर्मुख होऊन विचार केला, तर आपल्याला आपल्यातील दोष दिसू लागतात. या दोषांची जाणीव झाली म्हणजे ते दोष दूर करून तिथे गुणांची स्थापना कशी करायची ते समजते. दोष गेले आणि तिथे गुण निर्माण झाले म्हणजे परिस्थितीवर सहजतेने मात करता येते. कर्तृत्वाला झळाळी मिळते, यश पूर्वीपेक्षा अधिक उजळून निघते. सोन्याच्या बाबतीत जसे मुशीतून तापवलेले सोने त्यातील हिणकस भाग जळून गेल्यामुळे अधिक चमकदार होते तसेच टीकेला तोंड देऊन परिस्थितीवर मात केलेल्या माणसाचे व्यक्तिमत्त्व अधिक व्यापक होते. जीवन उजळून निघते. आयुष्य अधिक तेजस्वी होते. तुम्हाला काय वाटते?