Sunday, October 6, 2024

शिक्षा

मुलांना शिक्षा केली की, ते सुधारतील. हे बऱ्याच वेळा आपण ऐकलं आहे. असे म्हटल्यावर बऱ्याच जणांना त्यांचे बालपण आठवेल, आई-वडिलांनी, शिक्षकांनी, घरातल्या मोठ्यांनी वेळोवेळी शिक्षा केली म्हणून आम्ही सुधारलो, शिकलो, मोठे झालो, आयुष्यात काही बनलो. “छडी वाजे छमछम विद्या येई घमघम” हेच खरं असेही काहीजण म्हणतील. पण शिक्षा केल्याने मुले अभ्यास करतात हा भ्रम आहे.

आनंदी पालकत्व – डाॅ. स्वाती गानू

नुकतीच माझी एका नामवंत, मोठ्या, फक्त मुलांच्या शाळेतून खेड्यातील कौलारू इमारत असलेल्या पण प्रसिद्ध अशा फक्त मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून बदली झाली. शाळा सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी भरायची. शाळा भरल्याची बेल झाली की, शाळेचे भले मोठे गेट बंद व्हायचे. उशिरा आलेल्या मुली बाहेर राहायच्या. असेंब्ली संपली की, गेट उघडून पिटीचे सर विद्याथिर्नींना आत घ्यायचे आणि मैदानाला फेरी मारणे, मैदान स्वच्छता करायला सांगायचे किंवा उठाबशा काढायला लावायचे. मात्र त्या दिवशी सरांनी मला ग्राऊंडवर याच असा आग्रह धरला. मॅडम या ठरावीक बारा मुली रोज उशिरा येतात. त्यांची बस शाळा भरण्यापूर्वी बरोबर पोहोचते. इतर मुली येतात आत पण या मात्र नंतरच्या बसने रोज उशिरा येतात ते तक्रारवजा सुरात म्हणाले.

शाळेत शिस्तीच्या बाबतीत आम्ही सगळेच कडक होतो. आपण उशिरा आलो. वीस-पंचवीस उठाबशा काढल्या की झाले असे वाटून बेजबाबदारपणे वागण्याऱ्या या मुलींमुळे इतर मुलीही तशाच वागू शकत होत्या. या विचारातून त्यांना अधिक कडक शिक्षा करा असा सरांचा आग्रह होता. “तुम्हाला रोज शिक्षा होते तरीही तुम्ही उशिरा शाळेत येता. शिक्षा होण्याचे तुम्हाला काहीच वाटत नाही का? आज सर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त कडक शिक्षा करतील. बसही असते योग्य वेळी. रोज काही बस चुकत नाही मी थोडं रागावूनच म्हटले. मुली मान खाली घालून उभ्या होत्या. शिक्षेला सुरुवात होणार तेवढ्यात त्यातील एक पाचवीतली धिटुकली मान वर करून म्हणाली, मोठ्या मॅडम आमच्या परिसरात आठ दिवसांतून एकदाच पाणी येते. कितीही प्रयत्न केला तरी ते पुरत नाही. जवळच्या विहिरीचे नाही तर कधी नदीचेही पाणी आणावे लागते. पाणी भरल्याशिवाय घरातून बाहेर अगदी शाळेलाही जायचे नाही असे आई म्हणते. तिचेही बरोबर आहे. ती पाण्याला गेली तर घरचा स्वयंपाक कोण करणार?

छोट्या कुसुमचे बोलणे ऐकून मी निशब्द झाले. मुली शाळेत उशिरा येतात म्हणून त्यांना शिक्षा करण्याचा आम्हाला अधिकारच नव्हता. घरातल्यांची सगळ्यांची तहान भागवताना शाळेला होणारा उशीर, त्यानंतरची शिक्षा आणि तीही कुठलीही चूक नसताना. मी मुलींना विशेष बाब म्हणून नंतरच्या बसने येण्याची सवलत दिली. तेव्हा मला वाटले की, आपण सगळेजण तक्रार करत असतो, मुले ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत, नीट वागत नाहीत, सवयी बदलत नाहीत, शिस्त पाळत नाहीत. मग चढ्या आवाजात म्हणतो, ऐकत नाहीस म्हणजे काय? तुला शिक्षाच करायला हवी मग बघ कसा सुधारतोस. शिक्षा करायला आपण सदैव तयार असतो. आपण पालकत्वाच्या सिंहासनावर बसलेले असतो. आपण मोठे असतो. आपल्याकडे ताकद असते. मग आपण पाॅवरगेम खेळतो. आपल्याला वाटतं की, मुलांना शिक्षा केली की ते सुधारतील. पण हे पूर्णपणे चूक आहे.

असे म्हटल्यावर बऱ्याच जणांना त्यांचे बालपण आठवेल, आमच्या आई-वडिलांनी, शिक्षकांनी, घरातल्या मोठ्यांनी वेळोवेळी शिक्षा केली म्हणून आम्ही सुधारलो, शिकलो, मोठे झालो, आयुष्यात काही बनलो. “छडी वाजे छमछम विद्या येई घमघम” हेच खरं असेही काहीजण म्हणतील. पण शिक्षा केल्याने मुले अभ्यास करतात हा भ्रम आहे. समजा मूल काही नवं शिकत असेल, अभ्यास करत असेल किंवा खेळण्यात रमलं असेल आणि हे करताना तो/ती सारखा चुका करत असेल तर तुम्ही त्याला रागावता, चिडता, धमकावता, हात उगारता, काही कडक शिक्षा म्हणून मारताही पण ज्याक्षणी यापैकी काही तुम्ही करता तेव्हा आतापर्यंत जो रक्तपुरवठा मेंदूच्या बौद्धिक गोष्टीसाठी वापरला जात होता तो ताबडतोब भावनिक मेंदूकडे वळतो आणि मारहाण व्हायला सुरुवात होणार हे कळलं की मूल त्या शिक्षा करणाऱ्या व्यक्तीपासून स्वतःला फक्त वाचवण्याचा प्रयत्न करते आणि यावेळी हा रक्तपुरवठा सरपट मेंदू म्हणजेच आपण अप्रगत होतो. तेव्हाच्या मेंदूकडे जातो. स्वतःला वाचवताना त्याने नवे काही शिकण्याची तुमची मूळ अपेक्षा पूर्णपणे बाजूला पडते. कारण मूल फक्त बचावाचाच विचार आणि प्रयत्न करत असते.

मूळ प्रश्न उरतोच की, मग शिक्षा करूच नये का? होय शिक्षा करू नये कारण शिक्षा केल्याने मुले अभ्यास करत नाहीत. शिक्षेचे असोसिएशन धाकाशी आहे. भीतीपोटी, धाकापोटी, किंबहुना मार बसू नये म्हणून हे होतंय. त्यापेक्षा मूल चुकलं, वाईट वागलं, कधीकधी आक्रस्ताळेपणाने वागलं, अभ्यास केला नाही तर आपली नाराजी जरूर व्यक्त करावी. मुलांना शिक्षा करण्यापेक्षा एक स्टार चार्ट तयार करावा. चार्टच्या डाव्या बाजूला सोमवार ते रविवार अशी वारांची नावे लिहावीत. त्याच्या शेजारी मुलांच्या बाबतीतल्या अपेक्षित गोष्टी लिहाव्या. जसे : लवकर उठणे, अभ्यास करणे, कामे करणे, हट्ट न करणे, नीट जेवणे इ. त्यासाठी स्टारचे स्टिकर्स आणावे. मुलांनी त्या त्या दिवशी तसे केले की तो स्टार तिथे चिकटवावा.

मुलं आठवडाभर तशी वागली की न चुकता एक टोकन गिफ्ट जरूर द्यावं. मुलं चुकली तर, ती शांत झाल्यानंतर आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवावं. मात्र शारीरिक शिक्षा केल्याने मनात कायमची भीती, असुरक्षिततेची भावना, स्वप्रतिष्ठेचे खच्चीकरण होते आणि मुलांचा आत्मविश्वास कमी होत जातो हे नक्कीच. कधीकधी तर ती तुमच्या रागावण्याला, मारण्याला जुमानत नाहीत. म्हणून शिक्षा करण्यापेक्षा आपलं चुकलंय, चुकतंय याची जाणीव देण्यासाठी त्यांना विधायक, क्रिएटिव्ह असे काही करायला लावावे ज्यातून मुलांना चूक केल्याबद्दल समज मिळेल. जसे की, त्यांची कपाटे आवरणे, कविता पाठ करणे, हस्तकलेच्या वस्तू तयार करणे, किचनमध्ये एखादे काम करायला लावणे असे काही.

अखेरीस शिक्षा करण्याचा हेतू आणि शिस्त लावण्याचा हेतू यातला फरक समजून घ्यावा लागेल. हा फरक कळला की, मग लक्षात येईल की, शिक्षा केल्याने शिस्त लागत नाही, प्रश्न सुटत नाही फक्त भीती, धाक वाटतो. राग तसाच धुमसत राहतो. अमुक एक गोष्ट का करायची नाही यामागे केवळ शिक्षेचा संबंध जोडला जातो. म्हणूनच म्हणतात की,

Discipline is helping child solve a problem,
Punishment is making a child suffer for having a problem,
So to raise problem solvers focus on solutions not retribution.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -