रत्नागिरी : कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना होणारा वानर आणि माकडांचा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर त्यांना आळा घालण्यासाठी माकडांचे निर्बीजीकरण करण्याचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने भातपीक हंगामात शेतकरी त्रस्त झाले आहेत. निर्बीजीकरणाची मोहीम लवकरच राबविली जाणार आहे.
राज्य शासनाकडून हिरवा कंदील दिल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातील माकडांची वानरांची धरपकड करून निर्बीजीकरण मोहीम वन विभागामार्फत राबवली जाणार आहे. जिल्हा वन विभागामार्फत राज्य शासनाकडे माकड-वानर यांच्यापासून होणारा उपद्रव दूर करण्यासाठी या प्राण्यांचे निर्बीजीकरण करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. गोळप येथील शेतकरी अविनाश काळे आणि बागायतदार यांनी माकड-वानर यापासून होणाऱ्या उपद्रवाबद्दल आवाज उठविला होता. सुपारी, आंबा, भात शेती, भाजीपाला आदी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माकडांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे शेतीपिकांवरील, फळबागांवरील माकडांचा उपद्रव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
वानर आणि माकडांमुळे होणाऱ्या नुकसानीची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार, लोकप्रतिनिधींबरोबरच कोकण कृषी विद्यापीठ आणि वनअधिकारी यांची एक समिती स्थापन केली होती. अन्य राज्यांमध्ये माकडांची संख्या वाढल्यानंतर त्यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून माकडांचे निर्बिजीकरण केले होते. यामुळे चांगले परिणाम दिसून आले असून त्या पार्श्वभूमीवर कोकणातही हा उपक्रम राबविला जाऊ शकतो.
समितीमध्ये मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या अध्यक्षतेखाली कोकणातील आमदार, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक, कृषी आयुक्त आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी यांचा अभ्यासगट नियुक्त करण्यात आला होता. जिल्हा वन विभागाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये माकड, वानर यांची प्रगणना करण्याची मोहीम हाती घेतली होती. वन विभाग आणि स्थानिक नागरिक यांच्या वतीने ही पाहणी करण्यात आली होती.
वन विभागाने या सर्वेक्षणाचा तपशील केरळ येथील एका संस्थेला दिला आहे. वन विभाग राज्य शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात माकडांची धरपकड करून निर्बीजीकरण करणार आहे. यासाठी पिंजरे तयार करण्यात येणार आहेत. भातपिकाच्या कापणीचा हंगाम सुरू झाला आहे. माकड-वानर यांनी उपद्रव देण्यास सुरुवात केली आहे. तो दूर करण्यासाठी निर्बीजीकरण लवकर सुरू करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.