ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
गीता ही भगवंताची शब्दमय मूर्तीच आहे’ असे म्हणून ज्ञानदेव गीतेचा गौरव करतात. पुढे ते म्हणतात, ‘अर्जुनाच्या निमित्ताने श्रीकृष्णांनी सर्व जगावर कृपा केली आहे गीतारूपाने!’ अठराव्या अध्यायाचा समारोप करताना ते हा विचार मांडतात. त्यासाठी रम्य असे दाखले योजतात. आता ऐकूया आपण हे दाखले.
‘जसा पूर्ण कलायुक्त चंद्र चकोराच्या निमित्ताने प्रकाशित होऊन तिन्ही लोकांच्या तापाची निवृत्ती करतो.’ ही ओवी अशी –
‘चकोराचेनि निमित्तें। तिन्ही भुवनें संतप्तें।
निवविलीं कळावंतें। चंद्रें जेविं॥ ओवी क्र. १६८७
या दृष्टान्तातील अर्थसुंदरता पाहावी की शब्दसौंदर्य पाहावं, असा प्रश्न पडतो.
पूर्णकलायुक्त चंद्र म्हणजे भगवान श्रीकृष्ण, जे सर्वज्ञानगुणसंपन्न आहेत. त्यांच्या ठिकाणी चंद्राप्रमाणे शीतलता आहे. चकोर असे अर्जुनाला म्हटले आहे, कारण चकोर पक्षी केवळ चंद्रबिंदूंचे सेवन करतो अशी कवीकल्पना आहे. त्याप्रमाणे अर्जुन हा श्रीकृष्णांकडून मिळणाऱ्या ज्ञानाचे सर्वस्वी सेवन करतो आहे. अर्जुनाच्या निमित्ताने सर्व लोकांचा ताप दूर होतो आहे. ‘तिन्हीं भुवनें संतप्त’ या शब्दयोजनेतून सांसारिक अडचणींनी तापलेले जग किती प्रभावीपणे साकार होतं! तर पुढे येणाऱ्या ‘निवविलीं कळावंतें। चंद्रें जेविं।’ या शब्दांतून जगाचा तो ताप दूर होऊन शांत होणे, निवणं समर्थपणे व्यक्त होतं. आता पाहूया यापुढील मनोवेधक कल्पना!
‘अथवां गौतमाच्या निमित्ताने, कळिकाळरूप ज्वराने पीडित झालेल्या जीवांच्या दोषाची निवृत्ती होण्याकरिता श्रीशंकरांनी गंगा या मृत्युलोकी पाठवून दिली.’ ओवी क्र. १६८८
सर्व ऋषींच्या सांगण्यावरून गौतमऋषींनी गंगा पृथ्वीलोकी आणली. त्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्या गंगेमुळे सगळ्या लोकांना त्यांचा तापहरण करणारे पवित्र तीर्थ लाभले. त्या गौतम ऋषींप्रमाणे अर्जुन होय. त्याची भक्ती, निष्ठा त्यांच्याप्रमाणेच दृढ आहे, तसेच त्याची परोपकारी वृत्ती आहे. श्रीशंकरांप्रमाणे सामर्थ्यशाली श्रीकृष्ण होत, गीता ही गंगेप्रमाणे लोकांचे भवताप हरण करणारी होय.
यानंतरचा दाखला माउलींचा आवडते, गाय आणि वासरू यांच्यातील वत्सलतेचा आहे. ‘पार्थरूपी वत्साचे निमित्त करून श्रीकृष्णरूपी गायीने गीतारूप दूध देऊन सगळ्या जगाला संतोषित केले.’ ओवी क्र. १६८९
दूध देणारे अनेक पशू आहेत; परंतु गाईला आपण साक्षात ‘गोमाता’ म्हणून पाहतो. तिच्या ठिकाणी विलक्षण सात्त्विकता असते. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांना गाईची उपमा देण्यात किती अर्थ आहे! या गाईकडून मिळालेलं दूध म्हणजे गीता! गाय सत्त्वगुणी, साहजिकच तिच्याकडून मिळालेल्या दुधामुळे सत्त्वगुणांचे पोषण होते. त्याप्रमाणे गीतेच्या अभ्यासाने मानवांमधील सत् प्रवृत्तीची वाढ होते.
चंद्र-चकोर, शंकर-गौतम, गाय-वासरू असे हे ज्ञानदेवांनी योजिलेले दाखले श्रीकृष्ण-अर्जुन यांच्यासाठी! त्यातही किती विविधता आहे! एक निसर्गातील, एक पुराणातील, तर एक रोजच्या जगण्यातील असे हे दाखले आहेत. ते देऊन श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या निमित्ताने सर्व जगाला गीता देऊन कृपा केली, हा विचार ज्ञानदेव किती सुंदरपणे साकारतात!
म्हणून यातून शिकवण मिळते,
शिकवावं कसं? तर ज्ञानदेवांप्रमाणे…
सोपं आणि सुंदर करून!