Sunday, October 6, 2024

संसारी असावे सावध…

जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै

जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे, तो म्हणजे “संसारी असावे सावध”. सावध कुठे राहायचे? कर्माच्या ठिकाणी सावध राहायचे. म्हणजे काय करायचे? एकच करायचे. आपण जे करतो त्याने इतरांना दुःख होता काम नये. आपण जे करतो त्याने इतरांना सुखचं मिळाले पाहिजे. आपण जे करतो त्याने इतरांना आनंदच मिळायला पाहिजे. कमीत कमी अशी इच्छा करायला तरी काय हरकत आहे? लोक सुखी व्हावेत, लोक समृद्ध व्हावेत, लोकांची प्रगती व्हावी, त्यांना यश मिळावे अशी इच्छा करायला कोणाच्या पिताश्रींचे काय जाते? लोक हे करत नाहीत, चांगली इच्छा करत नाहीत, या उलट काही वेळेस दुसऱ्याच्या वाईटाची इच्छा करतात. एकमेकांना पाण्यात पाहतात. त्यांना एकमेकांचे भले झालेले पाहावत नाही. एकमेकांची निंदा करतात. कुचेष्टा करतात.

जीवनविद्या मिशनमध्ये येऊनही असे करणारे काही लोक आहेत हे मला माहीत आहे. याचा अर्थ त्यांना जीवनविद्या कळलीच नाही आणि इथे येऊनसुद्धा आमच्या वाट्याला हे का आले असा उलट प्रश्न ते विचारतात. अरे तुम्ही आम्ही सांगितलेले सगळे करता का? संपूर्ण दिवसात एक हजार वेळा विश्वप्रार्थना करता का? संपूर्ण दिवसात एक हजार वेळा विश्वप्रार्थना करणे काही फार कठीण नाही. लक्ष देऊन म्हणा असेही मी सांगत नाही. आत्मविश्वासाने, भक्तीने म्हणा पण म्हणा. किती लोकांना विचारले तर मान डोलावतात, नाही किंवा होय ते तुम्हीच तुमच समजून घ्या. एक हजार वेळा प्रार्थना कशीही केली तरीही ती फळतेच. हे मी का सांगतो आहे.

आपण जीवनात जे काही करतो ते कर्म व निसर्गनियम ह्यांचा जो काही परस्पर संबंध आहे, हे कोणीही लक्षात घेत नाही, म्हणून या सगळ्या अडचणी निर्माण होतात. जीवनविद्येच्या सिद्धांतानुसार तुम्ही एकदा कर्म केले की, निसर्गनियम क्रियाशील होतात. म्हणजेच त्या क्रियेला प्रतिक्रिया देऊ लागतात. क्रिया तशी प्रतिक्रिया. आपण कर्म केले की, त्याची प्रतिक्रिया येणारच. कधी येईल? आज, उद्या येईल. पण प्रतिक्रिया येणारच. पुष्कळ वेळा यावर उपाय असतो तो म्हणजे संवाद. संवाद केला की प्रतिक्रिया सौम्य होते व नियती बळकट होते. हा संवाद म्हणजेच विश्वप्रार्थना.

सांगायचा मुद्दा कर्म महत्त्वाचे हे आपण विसरलो तर आपल्या वाट्याला कर्मभोग येतात. कळले की नाही. कर्म आपल्या जीवनात महत्त्वाचे आहे हे लक्षात घेऊन आपण त्याप्रमाणे काळजी घेतली पाहिजे. संसारी असावे, सावध तर सावध कधी आणि कुठे? कर्म करताना सावध. माझे प्रत्येक कर्म असे असले पाहिजे की, त्यातून इतरांना सुख आणि आनंद मिळाला पाहिजे. आपण हे करतो का, हे प्रत्येकाने बघावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -