Sunday, October 6, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPolitics : राज्यात चौथ्या आघाडीची शक्यता!

Politics : राज्यात चौथ्या आघाडीची शक्यता!

अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी सोबतच तिसरी आघाडीनेही पुढचे पाऊल टाकले आहे. त्यात आता आणखी एक नवी आघाडी होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांना सोबत घेण्याची चाचपणी केली जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असा पर्याय असतानाच तिसऱ्या आघाडीचाही पर्याय पुढे आला आहे. राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ नावाने तिसरी आघाडीने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यासाठी स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू, महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरअण्णा धोंडगे, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, नारायण अंकुशे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर या नेत्यांनी ‘परिवर्तन महाशक्ती’ या आघाडीची घोषणा केली आहे.

दरम्यान, आता राज्यात आणखी एक पर्याय पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यात ही आघाडी होण्याची शक्यता आहे. तशी चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. अपक्ष असूनही या निवडणुकीत मतदारांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला होता. तब्बल अडीच लाखांवर तुपकरांना मतदान झाले होते. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा, बुलढाणा, मेहकर आणि चिखली या मतदारसंघात तुपकर यांना चांगली मते मिळाली होती. तर तुपकरांशिवाय तिसरी आघाडी अपूर्ण असल्याचं मत आंबेडकर यांनी व्यक्त केले होते. तर रविकांत तुपकर हे तिसऱ्या आघाडीत जाणार नसल्याचं त्यांनी अकोल्यात स्पष्ट केलं होतं.

पश्चिम विदर्भात तुपकर यांचा प्रभाव!

रविकांत तुपकर हे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन नेहमी रविकांत तुपकर हे आक्रमक पध्दतीने आंदोलन करतात. शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी त्यांची महत्वाची भूमीका राहिला आहे. लोकसभा निवडणुकीपासून राजू शेट्टी यांच्यापासून दूर गेलेले तुपकर यांनी स्वतःच्या बळावर बुलढाणा लोकसभा निवडणुक लढवली. त्यांना यश जरी आलं नसलं तरी चांगली मतं त्यांना मिळाली.

दरम्यान, शेतकऱ्यांचा लढवय्या चेहरा म्हणून बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ यासह पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांवर त्यांची चांगली पकड आहे. त्यामुळे याचा वंचितला मोठा फायदा होऊ शकतो. या जिल्ह्यात वंचितचा देखील मोठा प्रभाव आहे. अकोला जिल्हा हा वंचितचा गड मानला जातो. आगामी काळात काही मतदारसंघासाठी दोघेही एकत्र आल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर आणि तुपकर यांच्यातील संभाव्य राजकीय मैत्रीसंदर्भात प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. मात्र अद्यापही रविकांत तुपकर आणि प्रकाश आंबेडकरांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा झाली नसल्याची माहिती आहे. परिणामी दोन्ही नेत्यांच्या प्रस्तावित युतीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -